सैराट मॅरेज ग्रुप
By admin | Published: June 16, 2016 12:00 PM2016-06-16T12:00:31+5:302016-06-16T12:31:22+5:30
काही तरुण दोस्त. आवडलेला सिनेमा पाहून ते नुस्ते चर्चा करत बसले नाहीत. उलट त्यांनी ठरवलं की, जात आडवी आली म्हणून घरच्यांचा, समाजाचा विरोध सहन करत सैरभैर पळणाऱ्या किंवा आत्महत्त्येच्या टोकावरच पोहचणाऱ्या जोडप्यांना मदत करायची.
काही तरुण दोस्त.
आवडलेला सिनेमा पाहून
ते नुस्ते चर्चा करत बसले नाहीत.
उलट त्यांनी ठरवलं की,
जात आडवी आली म्हणून
घरच्यांचा, समाजाचा विरोध सहन करत
सैरभैर पळणाऱ्या किंवा
आत्महत्त्येच्या टोकावरच पोहचणाऱ्या
जोडप्यांना मदत करायची
आणि त्यांची लग्नं लावून द्यायची.
गेल्याच महिन्यात
त्यांनी अशी दहा लग्नं लावूनही दिली.
माणसांशी नाही तर
जातीशी लढायला निघालेल्या
एका ग्रुपची ही गोष्ट..
एक चित्रपट आल्यानंतर त्याचे काही सामाजिक-सांस्कृतिक ‘साइड इफेक्ट’ होऊ शकतात.
‘सैराट’ सिनेमानंतर असंच काहीसं दिसतंय.
जातीपातीचा काच लागून प्रेमाचा बळी आपल्या समाजात जातो हे वास्तव आहेच. अनेकजणांचं प्रेम इच्छा असूनही लग्न या टप्प्यावर पोहचू शकत नाही. पण असं होऊ नये म्हणून आणि वास्तवातल्या प्रेमीयुगुलांचे संसार उभे राहावेत म्हणून काही तरुणांनी एकत्र येत ‘सैराट मॅरेज ग्रुप’ स्थापन केलाय.
पुण्यासह महाराष्ट्रभरात कार्यरत झालेल्या या ग्रुपची संकल्पना मांडणारा तरुण पत्रकार मित्र हर्षल लोहकरे सांगतो, ‘सैराट प्रदर्शित झाला. मला आठवतं, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक बातमी वाचली, विशाल चव्हाण आणि शुभांगी गावडे या पुण्यातल्या प्रेमीयुगुलानं रेल्वेखाली आत्महत्त्या केली. मी अस्वस्थ झालो. फेसबुकवर लिहिलं, ‘आत्महत्त्या करू नका, यातूनही काहीतरी मार्ग निघू शकतो.’ त्यावर एका टीकाकारान कमेण्ट केली की, ‘तुम्ही का नाही यासाठी काहीतरी करत?’ मग यातूनच ग्रुप तयार करण्याची कल्पना सुचली. रविकांत वर्पे, प्रशांत शेलार, नीलेश कळसकर, जगदीश चंदनशिवे, अरुणा यशवंते, सुशांत सोनोने, अभिजित कांबळे, मनीषा महाजन, श्रीरंजन आवटे, अभिषेक भोसले, विशाल पोखरकर हे मित्र सोबत आहेत. यातल्या विशालनं तर नुकताच आरजूशी आंतरधर्मीय विवाह केलाय. या विवाहाला दोन्हीकडची वऱ्हाडी मंडळी वाजतगाजत हजर होती हे विशेष! अनेक तरु ण-तरु णी आपल्या आईवडिलांनी हा सोहळा ‘लाइव्ह’ अनुभवावा म्हणून त्यांना सोहळ्यात घेऊन गेले होते.
याशिवाय सध्या अनेक समविचारी लोक सोबत आलेत. मागच्या एकाच महिन्यात असे दहा विवाह आम्ही लावले. त्यात दोन आंतरधर्मीय आहेत. आम्ही जोडप्यांचं समुपदेशन केलं. त्यातल्या अनेकांना नोकऱ्या मिळण्यासाठी प्रयत्न केले. शिवाय सुरुवातीचे दोन-तीन महिने राहायला मोफत जागा उपलब्ध करून दिली. विदर्भ, मराठवाडा, मुंबई सगळीकडे यासाठीचं नेटवर्कआता आम्ही उभं केलंय. अनेक पत्रकार, कार्यकर्ते सोबत उभे राहिलेत. अर्थात हे सारं करताना आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या मुलांच्या पालकांविषयी आम्ही मनात राग ठेवत नाही. उलट त्यांच्याप्रती सहानुभूती बाळगतो. आम्ही मानतो की विरोध करणारे आई-वडील हे समाजव्यवस्थेतले ‘बळी’ आहेत. खोटी प्रतिष्ठा, नातेवाईक याचं दडपण त्यांच्यावर असतं. आपल्या समाजात धर्म आणि जात हाच व्यक्तींचा ‘कम्फर्ट झोन’ झालाय. त्यामुळे आपली मुलं ही चौकटी ओलांडत आहेत असं दिसलं तर साहजिकच आई-वडील असुरक्षित होतात. त्यांनाही समजून घेत बदलाचा हात पुढे करायला हवाय. आपल्या समाजाचं युनिट मुळात कुटुंब आहे. त्यामुळे असे विवाह स्वीकारणारी कुटुंबं निर्माण व्हायला हवीत हा आमचा प्रयत्न असतो. हे लोकशाही बळकट करणारं राष्ट्रकार्य आहे असं आम्ही मानतो. अशा प्रसंगांमध्ये अनेकदा कायदेशीर हस्तक्षेपही करावा लागतो. अनेकदा पोलीस ‘पुरु षी’ भूमिका घेतात. शेवटी तेही याच भवतालातून आलेत ना! त्यांचंही मनपरिवर्तन होणं गरजेचं आहे. अर्थात आम्ही लावून देतो ते विवाह फक्त आंतरजातीय नाहीत. स्वजातीय प्रेमविवाहही आहेत. यातलं कुणी विवाहसंस्थाच विचारीपणे नाकारत असेल तर त्यांच्या ‘लिव्ह इन’लाही आमचा पाठिंबा असेल,’ असं हर्षल सांगतो.
याच ग्रुपच्या सदस्य अरु णा यशवंते सांगतात, ‘मी स्वत: वीस वर्षांपूर्वी आंतरधर्मीय लग्न केलंय. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करते. माझे पती मंगेश काळे ख्रिश्चन आणि मी बौद्ध. आमच्या वेळीही विरोध झाला होता. पण तो तुलनेनं सौम्य होता. आपण म्हणतोय की आज जागतिकीकरणाच्या युगात समाजव्यवस्था खुली होतेय, बंधनं सैल होताहेत. पण खरंच असं नाही. उलट जाती-धर्माच्या अस्मिता अधिकाधिक टोकदार होताहेत. अगदी थंड डोक्यानं, नियोजनबद्धपणे आपल्याच पोटच्या पोरांचा जीव घ्यायला तथाकथित प्रतिष्ठा त्यांना भाग पाडते. पालक जर मुला-मुलींना विवाहासाठी विरोध करत असतील तर अशा मुलांना मायेचा खंबीर आधार देण्याचा आम्हा दोघांचाही प्रयत्न असतो. पालकांनाही आम्ही समजून घेत त्यांचे समुपदेशन करतो. मी शिक्षिका आहे. टीनेजर मुलांसोबत मी नेहमी असते. त्यांना ‘प्रेम’ व ‘आकर्षण’ यातला फरक संवादी पद्धतीने सांगितला की लगेच कळतो. त्यांच्या जोडीदाराबाबतच्या अपेक्षा अगदी स्पष्ट आहेत. मुलीही महत्त्वाकांक्षी होत असल्यानं त्यांना व्यक्ती म्हणून आदर देणारा जोडीदार पाहिजे असतो. साहजिकच पारंपरिक विवाहसंस्थेच्या तुलनेत त्यांना जोडीदाराची स्वतंत्र निवड जास्त जवळची वाटते आहे.’
अभय टाकसाळ आणि मानसी बाहेती हे अशा विवाहांच्या यशस्वीतेसाठी डोळस प्रयत्न करणारं एक जोडपं. विद्यार्थीदशेपासून एआयएसएफच्या चळवळीत एकत्र काम करताना दोघांची मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. दोघांचीही घरं चळवळीतली. त्यामुळे त्यांच्या आंतरजातीय विवाहाला घरची मान्यता मिळाली. अभय वकील आहे आणि मानसी प्राध्यापक. आजवर वंचित शोषितांच्या हक्काचे अनेक लढे दोघांनी यशस्वीपणे लढलेत. अनेक तरु ण-तरु णींच्या जोडीदार निवडीच्या निर्णयात त्यांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी दोघे उभे राहत आलेत. यासंदर्भातले अनेकरंगी अनुभव दोघांजवळ आहेत.
अभय म्हणतो, ‘वकील किंवा कार्यकर्ता म्हणून माझा सल्ला मागायला येणाऱ्या मुला-मुलींना मी अनेक पातळ्यांवर पारखतो. आधी त्यांनी विवाहाचं कायदेशीर वय पूर्ण केलंय का हे पाहतो. त्यानंतर त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाचं काय हे विचारतो. जातिधर्माबाहेरच्या विवाहात घरच्यांचा विरोध असतोच. तो मिटवता वा सौम्य करता येईल का, हे पाहण्याचा आग्रहही मी धरतो. दोघं आली की त्यांना विचारतो, ‘किती वर्षांपासून ओळखता एकमेकांना? भांडता का एकमेकांशी मोकळेपणानं? एकमेकांशी असलेल्या खुल्या संवादाचं महत्त्व माझ्या लेखी खूप आहे. कारण संवादच नेहमी नात्यातल्या नव्या शक्यता जागत्या ठेवतो. वेळप्रसंगी मुला-मुलींच्या पालकांचंही आम्ही समुपदेशन करतो. यात असंख्य वेळा पालकांची बोलणीही खावी लागलीत.
दुसरं म्हणजे मुलांनाही आम्ही विचारतो की, लग्न करून एकत्र का राहायचं? नव्या नात्याला जन्म का द्यायचा? कारण याबाबतची समज तशीही आपल्या समाजात फारशी आढळत नाही. त्यामुळं प्रेमात पडून विवाह करू म्हणणाऱ्या जोडप्यांचंही विवाहपूर्व समुपदेशन होण्याची खूप गरज असते.’
इथं मानसी, अभयला एका अशाच लग्नाच्या गोष्टीची आठवण करून देते.
ती दोघं लहानपणापासून सोबत होती. एकाच कॉलनीत शेजारीशेजारी राहणारी. खुल्या विचारात वाढलेली. ती त्याच्याहून वयानं मोठी. चळवळीत काम करणारी. पुढे दोघांनी घरच्यांचा विरोध सहन करत सत्यशोधक पद्धतीने लग्न केलं. चळवळ त्यांच्यासाठी सपोर्ट सिस्टम बनली. त्यांना भांडीकुंडी जमवून देत त्यांचा संसार उभा करून दिला. ती नोकरी करू लागली. हा मात्र बराच काळ गेला तरी बेरोजगारच राहिला.
त्या अस्वस्थतेतून आणि आपल्या आईच्या सततच्या सांगण्यावरून यानं तिला सोडून दिलं. नंतर यांनी खूप प्रयत्न केले त्यांना एकत्र आणण्याचे. पण त्यानं दुसरं लग्न केलं. कार्यकर्त्यांनी मग तिचंही दुसरं लग्न लावून दिलं. आता ती सुखात आहे.
मानसी सांगते, ‘घरच्यांचा वा समाजाचा विरोध पत्करून लग्न करू इच्छिणाऱ्या तरु ण-तरु णींनी शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत सजग असलंच पाहिजे. एक जोडपं असं आहे, की मुलीच्या घरी भावंडांमध्ये ती सर्वात मोठी होती. तिच्यावर माहेरचा मोठा आर्थिक भार होता. तिनं आंतरजातीय विवाह केला. दोघांच्याही घरचे अल्पशिक्षित, गरीब. दोघांनी प्रचंड संघर्ष केला. आता लग्नानंतरही तो तिला माहेरी मदत करण्याची पूर्ण मुभा देतो. संपूर्ण स्वातंत्र्य व व्यक्ती म्हणून आदर देतो.
अभय म्हणतो, ‘अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेज कमीच यशस्वी होतात असा एक मतप्रवाह समाजात नेहमीच आढळतो. मात्र वकील म्हणून माझ्याकडे येणाऱ्या केसेस या दोन्ही प्रकारातल्या असतात. त्यांना हा निकष लावणं पूर्णपणे चुकीचं आहे. एका जोडप्याने प्रेमविवाह केला, आता तो वकील आहे, तर ती न्यायाधीश झालीय. पण दोघांमध्ये कधीही ‘इगो प्रॉब्लेम’ येत नाही. शेवटी व्यक्ती म्हणून तुम्ही किती प्रगल्भ आहात यावर नात्याचं यश अवलंबून असतं, विवाहाच्या प्रकारावर नाही. अशा प्रकारच्या विवाहात येणाऱ्या समस्या हा खरंतर केवळ कौटुंबिक नसून सामाजिकही प्रश्न आहे. पण लोक त्याकडं तसं पाहतच नाहीत. आता मुलं-मुलीही बरीच समजदार झालीत. आंतरजातीय लग्न केलं आणि काही धोका वाटला तर ती अनेकदा पोलिसांत संरक्षण मागतात. राज्यघटनेनुसार मिळणाऱ्या कायदेशीर संरक्षणाचं महत्त्व आता तरु णांना उमगलंय.’
मानसी म्हणते, ‘माझ्या माहेरी तर अरेंज इंटरकास्ट प्रकारचीही लग्नं झालीत. चळवळीत नेहमीच मुलांना, विशेषत: नेहमीच सामाजिक दुय्यमत्व वाट्याला आलेल्या मुलींना एक खुलेपण मिळालं. विचार करण्याचं, प्रश्न विचारण्याचं आणि कृतीचं हे खुलेपण या मुला-मुलींनीही प्रगल्भपणे वापरलं. अनेकांचे पालकही त्यामुळे विचारानं बदलत गेले. संवादातून माणूस बदलतो यावरचा आमचा विश्वास अनेकदा प्रत्यक्षात आलाय. आणि विद्यार्थी चळवळ म्हणजे केवळ मैत्री, लग्नच नव्हे तर अनेक संघर्षाचे लढे मोठा जनाधार मिळवत आम्ही यशस्वी केले. अशा लग्नातून जातिअंत होणं हा लांबचा टप्पा आहे. पण किमान एकत्र आलेल्या दोन व्यक्तींनी एकमेकांचा सन्मान राखणं, परस्परांना आर्थिक, सामाजिक स्पेस देत समृद्ध जगणं हे तरी या विवाहांतून साध्य व्हायला हवं. कारण निरोगी, मोकळ्या समाजबांधणीची सुरुवात तिथूनच होते. आणि माणसं मुळात वाईट नसतात. जाती-धर्माचं जोखड त्यांना विकृत वागायला भाग पाडतं या धारणेतून आम्ही समाजबदलाचं काम करतो.’
सिनेमाच्या पडद्यावर परशा-आर्चीच्या स्वप्नाळू प्रेमकथेचा क्रूर शेवट चटका लावतोच. पण तो सिनेमा होता हे समजावता येतं मनाला त्या काळोखात. मात्र आपल्या अवतीभोवती अद्यापही ‘आॅनर किलिंग’ होतं. त्या मरण्या-मारण्याला प्रतिष्ठेचा ठप्पा बसतो. आणि जिथं हे सारं होत नाही तिथंही घरच्यांचा प्रबळ, प्रचंड विरोध मनातल्या मनात गाडूनच टाकतो अनेक जोडप्यांमधलं प्रेम.
मात्र असं होऊ नये म्हणून काम करणारे हे तरुण दोस्त एकप्रकारे माणुसकीचीच लढाई लढताहेत. जातिधर्म हरतील, माणुसकी जिंकेल अशी आशा ठेवायला वाव आहे, एवढंच!
- शर्मिष्ठा भोसले
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
जोडीदार निवडीचा प्रत्येकाला हक्क आहेच!
आंतरजातीय विवाह करायची तयारी असणाऱ्या अनेक जोडप्यांनी बऱ्यापैकी विचार केलेला असतो. काही केवळ आकर्षणापोटी लग्नाचा विचार करतातही. पण त्यांची संख्या कमी आहे.
पण घरून विरोध असताना जे लग्न करायची तयारी दर्शवितात त्यांनी नेमका काय विचार केला आहे हे तपासून पाहण्यासाठी आम्ही विवाहापूर्वी मुलगा आणि मुलगी या दोघांशी स्वतंत्र बोलतो आणि नंतर एकत्रही बोलतो. भवितव्याबद्दलही त्यांचं काय नियोजन आहे हे विचारतो. सर्वच जण काही जातिअंतासाठी असा विवाह करत नसतात, पण त्यातून हे आपसूकच साध्य होणार म्हणून आम्ही त्यांच्यासोबत असतो. जोडीदार निवडीवर शिक्कामोर्तब करण्याआधी मुलींनी व मुलांनी आपापल्या आवडीनिवडी स्वतंत्र लिहाव्या असं आम्ही सांगतो. त्यातून किती-काय जुळतं हे पाहतो. जे जुळत नाही त्याबाबत त्यांच्याशी सविस्तर चर्चा करतो. पुढे काही प्रश्न आले तर ही केलेली चर्चा त्यांना कामी येते. अनेकदा मुलगा वा मुलगी एखाद्या सामाजिक चळवळीशी जोडलेला असतो. मग विवाहानंतर त्याची वा तिची सामाजिकता दुसऱ्याला मान्य आहे का याबाबत स्पष्ट बोलायचा मी आग्रह धरतो.
जेवढी लग्नं लावली त्यातली सगळीच अगदी यशस्वी झालीत. एक दोघांचे प्रश्न निर्माण झालेत ते नातेवाइकांमुळे. समितीने लातूरला २००८ साली आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह संघटन परिषद घेतली होती. त्यानंतर ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हा उपक्र मही सुरू केला. पारंपरिक धार्मिक कुंडली नाकारत ‘आरोग्य कुंडली’ची संकल्पना मांडली. एचआयव्ही तपासणीचा आग्रह आम्ही धरतो. २०१३ साली ‘जोडीदाराची विवेकी निवड’ परिषदेला महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून ८०० ते ९०० मुलं-मुली आणि सोबत एकेक प्राध्यापक आले होते. यात तरुणाईची मनं, मतं आम्ही व्यापक प्रमाणावर घडवू शकलो. पोलिसांची मानसिकता अनेकदा या जोडप्यापेक्षा पालकांनाच सहानुभूती दाखवणारी असते. अशावेळी आम्ही या जोडप्याने कायदेशीर भूमिका कशी घ्यावी हे त्यांना व्यवस्थित सांगतो. मदत करायची म्हणून एकाही जोडप्याकडून आम्ही काहीही फी घेत नाही.
आमचं पालकांना सांगणं एवढंच की, मुलांचा जोडीदार निवडीचा हक्क अबाधित राखावा. एरवी दाखवून/पाहून केल्या जाणाऱ्या लग्नालाही आमचा विरोध नाही. मात्र त्यातही मुला-मुलींना किमान एक तास चर्चा करण्याची मुभा द्यावी, अशी आमची भूमिका आहे.
- माधव बावगे
(महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव. दीर्घकाळापासून चळवळीचा भाग म्हणून ते आंतरजातीय विवाह लावून देतात. आजवर जात-धर्माचा उंबरा ओलांडलेली १९६ लग्नं त्यांनी लावली आहेत.)