साता-याची साथ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 06:06 PM2018-02-14T18:06:07+5:302018-02-15T10:39:39+5:30

कानडी.. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक छोटंसं गाव. आई-वडील शेतकरी. आईची शेती व इतर कामांमुळे तब्येत बिघडलेली असायची.

With Satya | साता-याची साथ

साता-याची साथ

Next

- विकी चंद्रकांत जाधव

गाव सोडताना वाटलं होतं,
शहर जगवेल.
त्या प्रवासानं खरंच उभं केलं!

कानडी.. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक छोटंसं गाव. आई-वडील शेतकरी. आईची शेती व इतर कामांमुळे तब्येत बिघडलेली असायची. आई-वडील आणि माझे दोन लहान भाऊ असं आमचं छोटंसं कुटुंब. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण शेजारच्याच गावात झालं. अकरावी व बारावीपर्यंतचं शिक्षणही गावापासून सात-आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आगनगडी या गावात झालं. तो प्रवासही फार खडतर होता. गावात येण्या-जाण्यासाठी बसची सोय नव्हती. त्यामुळे नेहमी सायकलवरून प्रवास करावा लागत असे. त्यातच गरिबी. आई-वडिलांचे अपार कष्ट दिसायचे. उराशी नवीन ध्येय बाळगून जसा प्रत्येकजण शहराकडे धाव घेतो तसा मीही धाव घेण्याचा निर्णय घेतला.
साताºयाला आलो. साताराही तसं परवडणारं नव्हतं. पण ज्याच्या अंगी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल त्याच्यासाठी कोणतंच शहर परकं नसतं, असं म्हणतात. मी प्रथमच सातारासारख्या मोठ्या शहरात आलो होतो. बी.ए.च्या प्रथम वर्षाला मी सातारा येथील कला, वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मला आमच्या काही जुन्या पाहुण्यांची ओळख झाली. त्यांच्या घरी राहून मी शिक्षण पूर्ण करण्याचं ठरवलं. मी त्यांच्या घरी बेकरीतील काही कामंही करत असे. पुढे त्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे तिथं राहता येईना. माझी अडचण मी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या कानावर घातली. या समस्येवर त्यांनी योग्य तोडगा काढून माझी राहण्याची व उदरनिर्वाहाची सोय केली. एकेठिकाणी तात्पुरती का होईना नोकरीचीही व्यवस्था केली. मला हुरूप आला.
मी नोकरीला जायचो ते ठिकाण होतं साताºयाचं ‘लोकमत’चं कार्यालय. या कार्यालयात मी ‘वार्तासंकलक’ तसेच ‘मुद्रितशोधक’ म्हणूनही काम करत असे. सकाळी साडेसात ते साडेअकरापर्यंत कॉलेज करायचं आणि जेवण वगैरे आवरल्यानंतर दुपारी ठीक १ वाजता ‘लोकमत’च्या कार्यालयात हजर व्हायचो. रात्री साडेअकरापर्यंत काम असायचं. हा माझा दररोजचा दिनक्रम असे.
पहिल्यापासूनच वाचनाची खूप आवड आणि मराठी हा विषय बी.ए.च्या तिन्ही वर्षाला ठेवला होता. मराठी व्याकरणाची थोड्याफार प्रमाणात तोंडओळखही होती. त्यामुळे काम करताना शिकत गेलो. कामाचा ताण होता पण त्याचा परिणाम अभ्यासावर कधी होऊ दिला नाही. रात्री कामावरून आल्यानंतर जेवण वगैरे उरकून एक- दीडपर्यंत अभ्यास करत बसायचो. सकाळी साडेपाचला उठून सर्व आवरून कॉलेज गाठायचो.
कॉलेजच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हायचो. बी.ए.च्या तिन्ही वर्षात प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही. तसेच प्राचार्यांचे आणि शिक्षकांचेही बहुमोल मार्गदर्शन मिळत गेले. कॉलेजमध्ये नवीन मित्र-मैत्रिणी मिळाल्या, अनेक जिवा-भावाची माणसं मिळाली.
साताºयात ज्या ‘लोकमत’च्या कार्यालयात काम करत होतो तिथे कुणाचीही ओळख नव्हती. मनात कायम एकच विचार घोळत राहायचा, तो म्हणजे या उच्चशिक्षित व्यक्तींबरोबर आपला निभाव लागेल का? मग मनात एक पक्क केलं, काहीही झालं तरी मागं हटायचं नाही. काही कालावधीनंतर कार्यालयातील कर्मचाºयांशी ओळख झाली. ते मला समजून घेऊ लागले. कामात सुधारणा सांगून मार्गदर्शन करत. काही दिवसांनी मी त्यांच्यात कसा रममाण झालो हे माझं मलाच कळलं नाही. तेथील प्रेमळ, जिवाभावाची माणसं मला आजही आठवतात. ‘लोकमत’ कार्यालयानं मला सुखद अनुभवांची शिदोरी दिली.
अशा पद्धतीने मी बी.ए.ची पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. माझ्या या तीन वर्षांच्या शैक्षणिक कारकीर्दीत मला प्राध्यापकांचाही वडिलांप्रमाणे आधार होता. पदव्युत्तर शिक्षणासाठी मी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. आता तिथं शिकतोय.
एम.ए. व्यतिरिक्त मी नेट-सेटचाही अभ्यास करतोय. उराशी बाळगलेलं ध्येय जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान सोडणार नाही. माझ्या शैक्षणिक आयुष्यात सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांनी मला भरभरून दिलं.
कानडी ते सातारा साधारणत: २०० किलोमीटरचा प्रवास, पण हा प्रवास मला खूप काही शिकवून गेला..

कोल्हापूर

Web Title: With Satya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.