‘सोशल ड्रिंक’ करताय?- मग सावधान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 03:08 PM2018-11-22T15:08:38+5:302018-11-22T15:08:50+5:30

‘सोशल ड्रिंक’ या शब्दांचं भारी आकर्षण आहे. ‘बसू एकदा’ या शब्दांना सोशल मीडियात ग्लॅमर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी माहिती सांगते की, ‘थोडी थोडी पिया करो’! पण हे सारं साफ चूक. जागतिक अभ्यासच सांगतोय की, थोडी नको नि जास्त नको, दारूला नाहीच म्हणा.

Say no social drink, its dangerous.. | ‘सोशल ड्रिंक’ करताय?- मग सावधान...

‘सोशल ड्रिंक’ करताय?- मग सावधान...

Next
ठळक मुद्देनियमांची आणि बंदीची वाट न पाहता, आपणच दारूला नाही म्हणणं उत्तम. तेच श्रेयस्कर आहे. 

पराग मगर, डॉ. सागर भालके 

दारू ही शरीरासाठी, आरोग्यासाठी घातक असल्याचं आपण नेहमीच ऐकतो, वाचतो. मात्र अनेक तरुणांना हल्ली ‘सोशल ड्रिंक’ या शब्दांचं भारी आकर्षण आहे. ‘बसू एकदा’ या शब्दांना सोशल मीडियात ग्लॅमर आहे. त्यात व्हॉट्सअ‍ॅपवर फिरणारी माहितीही सांगते की, नियंत्रित प्रमाणात दारूची मात्ना घेतल्यानं हृदयरोग, मधुमेह यांसारख्या रोगावर अल्पप्रमाणात फायदा होतो. थोडक्यात काय तर ‘थोडी थोडी पिया करो’, असा एक मतप्रवाह चांगलाच रुजत चालला आहे. 
वस्तुस्थिती मात्र तशी नाही.
‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस स्टडी - 2016’ या मद्यपानाशी संबंधित आतार्पयतच्या सर्वात मोठय़ा जागतिक संशोधनात दारू प्याल्यानं ‘थोडी थोडी..’ हा मुद्दाच पूर्णतर्‍ खोडून काढला आहे. दारू थोडी प्याल्यानं फायदे होतात हा समजही त्यांनी खोडून काढला आहे. विशेष म्हणजे दारूची कुठलीच ‘सुरक्षित लेव्हल’ नाही, त्यामुळे अमुक एका पातळीर्पयत प्यालेली दारू उत्तम हे जे सोशल ड्रिंकच्या नावाखाली सांगितलं जातं तेही चूक असं त्यांनी ठामपणे या संशोधनानं सिद्ध केलं आहे.
मद्यपान आणि त्यामुळे निर्माण होणारा तणाव यातील वास्तविकता, सहसंबंध आणि वस्तुस्थिती मोजण्यासाठी त्याचबरोबर जागतिक व्याधी रोग, दारूमुळे झालेले मृत्यू, सोबतच दारूमुळे अपघात होऊन आलेल्या अपंगत्वाने जुळवून घेतलेलं आयुष्य यावर 1990 ते 2016 या काळात 195 देश आणि प्रांतांमध्ये करण्यात आलेल्या तब्बल 592 संशोधनांचा आधार घेत ‘ग्लोबल बर्डन ऑफ डीसीस स्टडी- 2016 ’ हा शोध निबंध तयार करण्यात आला आहे. 15 ते 95 आणि त्याही पुढच्या वयोगटात तब्बल दोन कोटी 80 लाख मद्यपींचा या संशोधनात अभ्यास करण्यात आला. हे संशोधन नुकतेच ‘लान्सेट’ या जगप्रसिद्ध वैद्यकीय मासिकात प्रसिद्ध झाले आहे. यात देण्यात आलेली आकडेवारी थक्क करणारी आहे. दारू प्रतिबंधाबाबत कुठलंही धोरण नसलेल्या किंवा धोरण असूनही अंमलबजावणी नसलेल्या देशांना हे संशोधन विचार करायला लावणारे आहे. त्यात अर्थातच आपला देशही आला.
दारूपायी जाणारे आणि खंगणारे जीव दारूचा मृत्यू आणि रोगांशी फार जवळचा संबंध असल्याचंही या अध्ययनात समोर आले आहे. अकाली मृत्यू आणि अपंगत्वासाठी जबाबदार असलेल्या कारणांमध्ये दारू सातव्या स्थानावर आहे. 2016मध्ये 28 लाख लोकांच्या मृत्यूचे मुख्य कारण हे मद्यपान होतं. जगातील 15 ते 49 वयोगटातील 10  टक्के तरुण जीव केवळ दारूमुळे दगावले.   यात 12.2 टक्के पुरुष, तर 3.8 टक्के तरुण स्त्रिया होत्या. दारूमुळे अपंगत्व येऊन जीवन व्यतीत करीत असलेल्यांची आकडेवारीही या अध्ययनात देण्यात आली आहे.
दारूमुळे इतर अनेक आजारही तरुण वयात बळावताना दिसतात. 15 ते 49 या  वयोगटात दारूमुळे क्षयरोग होऊन रस्ता अपघातात आणि स्वतर्‍ला इजा (आत्महत्या करून) घेणार्‍या तरुणांचं प्रमाणही मोठं आहे. विकसित देशांमध्ये दारूमुळे कॅन्सर होऊन मृत्यू होणार्‍यांचे प्रमाण लक्षणीय आहे, तर विकसनशील देशांमध्ये क्षयरोग, सोरायिसस आणि यकृताचे आजार यामुळे जास्त प्रमाणात मृत्यू होतात. या संपूर्ण अध्ययनात पुरुषांचे दारू पिण्याचे प्रमाण हे स्त्रियांच्या तुलनेत जास्तच असल्याचे आढळून आले आहे. परिणामी पुरु षांच्या आरोग्यावर दारूचा होणारा विपरीत परिणाम हा तिपटीने जास्त आहे. त्यामुळे दारूची ‘लेवल’ शून्यावर आणणं हाच दारूचे दुष्परिणाम रोखण्याचा सोपा मार्ग असल्याचं हे सर्वेक्षण सांगतं.
अल्प प्रमाणात दारू पिण्याचे काय काय फायदे होतात हे ‘व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातून’ आज आपल्यार्पयत येतं. अनेक तरुण त्या माहितीला बळी पडतात. पिअर प्रेशरलाही बळी पडतात. आपण प्यालो नाही, बसलो नाही तर मित्र आपल्याला त्यांच्यात घेणार नाहीत या दहशतीलाही बळी पडतात. मात्र त्या सर्वाना हेच सांगा की, से नो टू सोशल ड्रिंक. कारण थोडी नि जास्त असं काही नाही, दारू वाईट आहे, शरीराला अपायकारकच आहे हे आता जगभर अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे.
आनंदाची किंवा आशेची गोष्ट एकच की, भारतासारख्या विकसनशील देशात लोकसंख्येच्या तुलनेत दारू पिण्याचे प्रमाण हे विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे. पण स्वस्तातली भेसळयुक्त दारू पिण्याचं प्रमाण ग्रामीण आणि निमशहरी भागात जास्त असल्यानं दारूमुळे होणारे मृत्यू आणि अन्य आजार भारतात लक्षणीय आहेत. दारूबंदीचे नियमही पायदळी तुडवले जातात ते वेगळेच. त्यामुळे त्या नियमांची आणि बंदीची वाट न पाहता, आपणच दारूला नाही म्हणणं उत्तम. तेच श्रेयस्कर आहे. 


     (लेखक ‘सर्च’मध्ये व्यसनमुक्तीसाठी काम करणार्‍या मुक्तिपथ अभियानात कार्यरत आहेत.)
    
 

Web Title: Say no social drink, its dangerous..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.