सायन्स ते जर्नालिझम व्हाया औरंगाबाद
By admin | Published: May 4, 2017 07:06 AM2017-05-04T07:06:45+5:302017-05-04T07:06:45+5:30
बीड ते औरंगाबाद फक्त तीन तासांचं अंतर. पण या अंतरातल्या स्थलांतरानं मला जो आत्मविश्वास दिला, त्यानं माझी नजर बदलली..
दहावीला मला बऱ्यापैकी गुण मिळाले. बीडमध्ये कोणत्याही कॉलेजात प्रवेश मिळाला असता. शाळा-ट्यूशनमधील सोबती ‘लातूर पॅटर्न’ची वाट धरत होते. आटर््स-कॉमर्स-सायन्स यातलं फार काही कळत नव्हतं. सगळे ‘सायन्स’ घेतात. ‘सायन्स’ला स्कोप आहे म्हणून मी सायन्स घेतलं. पूर्वीचं सगळं शिक्षण ‘मराठी’ माध्यमात झालेलं. पण एकदमच फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी पाहून डोकं गरगरायला लागायचं. सगळंच ‘इंग्रजीत’. अकरावीला सुरुवातीला काही महिने फार ‘एकटेपणा’ जाणवला. बीडमध्ये थांबलेल्या शाळेतल्या मैत्रिणी फार कमी होत्या. बऱ्याच जणींनी गाव सोडलेलं होतं. लायब्ररीमधून अकरावीची पुस्तकं आणली. ती पाहिली की डोळ्यासमोर अंधार व्हायचा. भलेमोठे इंग्रजी शब्द, त्या आकृत्या, डेफिनेशन्स. पण मन लावून अभ्यास करत होते. अकरावीत रुळते न रु ळते तोच बारावी सुरू झाली. तोपर्यंत नवीन मैत्रिणींचा ग्रुप जमला होता. शाळेतल्या सुरक्षित वातावरणातून एकदम कॉलेजमध्ये गेल्यावर असणारं स्वैर वातावरण मिळालं पण त्याला अभ्यासाची जोड होती. त्या दरम्यान मी अनेक वक्तृत्व, वादविवाद, कथाकथन, निबंध आदी स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. त्यातही मी भरपूर बक्षिसं मिळवली. मला आठवतं, बारावीला असताना एकदा मला बाहेरगावी निबंध पाठवायचा होता. त्यासोबत स्पर्धकाच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची सही आणि शिक्का आवश्यक होता. मी निबंध लिहिला आणि सही घ्यायला एका प्राध्यापकांकडे गेले. तेव्हा त्यांनी माझा निबंध खालीवर पाहिला आणि माझ्याकडे पाहून कुत्सित हसत म्हणाले, हे असल्या स्पर्धेत भाग घेणारे कधीच डॉक्टर-इंजिनिअर नाही होऊ शकत. हे असलंच काहीतरी आयुष्यभर करत राहावे लागेल. असं बोलून त्यांनी मला सही दिली.
आज जेव्हा ती घटना आठवते, तेव्हा मला त्या प्राध्यापकांची ‘कीव’ करावीशी वाटते. जगात काय फक्त डॉक्टर-इंजिनिअर असणारेच लोक आहेत की काय? सतरा वर्षांच्या मुलीला असं बोलणं किती वाईट होतं.
जून २०११ मध्ये माझा बारावीचा निकाल लागला. बोर्ड आणि सीईटी दोन्हींमध्ये चांगले गुण मिळाले. मात्र २७ जुलैला मी औरंगाबादला पत्रकारितेच्या अभ्यासक्र मासाठी प्रवेश परीक्षा दिली. मला प्रवेश मिळाला. आॅगस्टमध्ये औरंगाबादला राहायला आले.
पहिल्यांदाच घर सोडलं होतं, तेव्हा मला अठरा वर्षे पूर्ण झालेली नव्हती. मला आठवतं, मी दोनच दिवसांनी घरी बीडला निघून गेले. आईने मला कसंबसं समजावून दोन दिवसांनी परत पाठवलं. त्यानंतर लगेच परत १५ आॅगस्टला सलग दोन दिवसाच्या सुट्या लागून आल्या आणि मी परत गावी गेले. सुट्यांची मी सारखी वाट पाहत असे.
दिवाळीनंतर मात्र फार उत्साहानं अभ्यासाला सुरु वात केली. पहिल्या सत्राचा निकाल लागला तेव्हा मी सर्वप्रथम आले होते. पदवीची तीनही वर्षे मी प्रत्येक सत्राला ‘प्रथम’ क्र मांक मिळवला. पदवी पूर्ण झाल्यावर ‘मास्टर आॅफ मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम’ला प्रवेश घेतला. ‘मास्टर्स’ला मी संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्र मांक मिळवला. या पाच वर्षांमध्ये माझ्या विचारांना चांगली दिशा मिळाली. वेगवेगळे विषय घेऊन लेखन केले. पदवीच्या तिसऱ्या वर्षाला असताना मी ‘रशियन’ भाषा शिकले. मास्टर्स करताना ‘स्त्री अभ्यासातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्र म’ हा पार्टटाइम कोर्स केला. वाचन भरपूर केलं. पुस्तकं, रोजचे पेपर, साप्ताहिकं, मासिकं असं जे जे काही वाचायला मिळेल ते ते झपाटल्यासारखं वाचून काढलं. शहरातल्या रोजच्या व्याख्यानांना हजेरी लावू लागले. मास्टर्स झाल्यावर लगेचच मी एम. फिल.साठी प्रवेश परीक्षा दिली आणि त्यात उत्तीर्ण होऊन एम. फिल. अभ्यासक्र मासाठी प्रवेश घेतला.
मी बीड ते औरंगाबाद हा केवळ तीन तासांचा प्रवास केला. मी माझं गाव शिक्षणासाठी सोडलं. आज गाव सोडून सहा वर्षे झाली. या वर्षांमध्ये माझा आत्मविश्वास वाढला. आपण योग्य मार्गावर आहोत. आपण घडतोय. यापुढे कोणत्याही महानगरात जाऊन चांगलं काम करण्याचा आत्मविश्वास मला आला आहे.
- क्षितिजा हनुमंत भूमकर -