डोक्यातला कल्ला कागदावर

By admin | Published: March 4, 2016 11:40 AM2016-03-04T11:40:48+5:302016-03-04T11:40:48+5:30

परीक्षा होण्याआधीपासूनच एक नवा प्रश्न गळा धरतो : ‘आता पुढे काय?’ कोणती साईड घेणार? करियर कशात करणार? - त्या आधी एक प्रश्न स्वत:ला विचारा : मला नेमकं काय हवंय? परीक्षांच्या या मोसमाबरोबरच ‘कुठली साइड निवडायची?’ आणि ‘कशात करिअर करायचं?’ या प्रश्नांचा हंगाम सुरू होतो. त्यासाठी मग अनेक टेस्टसह पुस्तकांची मदतही घेतली जाते. मात्र त्या रेडिमेड उत्तरांच्या गर्दीतून आपली वाट कशी शोधायची हे सांगणारा नवा कोरा कॉलम..

Scratching paper on paper | डोक्यातला कल्ला कागदावर

डोक्यातला कल्ला कागदावर

Next
>एकवेळ  दुस:याला सल्ला देणं सोपं. पटकन त्याच्या समस्येवर उपाय सांगून मोकळंही होता येतं. पण स्वत:ला सल्ला देणं? स्वत:ला शोधणं हे फार अवघड. तसं पाहता, स्वत:ला काय शोधायचं नी ओळखायचं असतं? स्वत:ला तर आपण अगदी लहानपणापासून ओळखतच असतो. इतर कोणाहीपेक्षा स्वत:शी जास्त बोलत असतो, स्वत:ला काय हवं, आवडतं, आवडत नाही ते माहिती असतं. स्वत:शी चांगला संवादही साधत असतो, सतत स्वत:शी बोलत असतो असं आपलं मत!
पण तरीही करिअरविषयी ठोस निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा धड काही सुचत नाही. स्वत:चाच अंदाज येत नाही. काहीजण अॅप्टिटय़ूड टेस्ट करतात, पालकांचं ऐकतात, मित्र जे करतात तेच चांगलं असं ठरवतात. मात्र तरीही ‘जायचं कुठल्या दिशेला?’ हा अनेकांचा प्रश्न सुटत नाही. उलट गुंता अनेकदा वाढतच जातो. अनेकांना वाटतं की कोणाला तरी जाणकाराला, तज्ज्ञ व्यक्तीला विचारावं म्हणजे आपल्याला योग्य दिशा सापडेल. मात्र अनेकदा प्रत्येकजण वेगळा निर्णय सांगतो. त्यामुळे जास्तच गोंधळ वाढतो. 
आणि प्रश्न उरतोच की, मी जायचं कुठल्या दिशेला?
खरंतर ना, ‘आपल्या आयुष्यात आपण काय करायचं आहे?’ हा एक साधा प्रश्न आहे. त्याचं उत्तर आपल्यालाच सापडायला हवं पण ते सापडत नाही. कारण हा प्रश्न तितकाच गुंतागुंतीचाही आहे.
त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याआधी किंवा त्या प्रश्नाचा विचार करण्याआधी आपण एक गोष्ट करू शकतो.
ती काय?
 
कन्सेप्ट मॅप
करायचं काय हा प्रश्न पडला ना तर आपल्या करिअरचा कन्सेप्ट मॅप स्वत:च तयार करा. पण म्हणजे करायचं काय नी कसं?
* काम सुरू करण्याआधी हे लक्षात घ्यायला हवं की आपल्याला आयुष्यात कोणतेही निर्णय घ्यायचे असोत समोर किमान दोन तरी रस्ते असतात. बहुतेकदा जास्तच रस्ते असतात. आणि नव्या काळात तर खूपच रस्ते आपल्यासमोर येऊन उभे राहतात. या रस्त्यांपैकी एकाच  रस्त्यावर आपण एका वेळी जाऊ शकतो हे तर मान्य करायला हवं. मुळात ते मान्य करणं हाच पहिला टप्पा, की एकावेळी एकच रस्ता.
* असे नक्की किती रस्ते आपल्यासमोर आहेत, हे एका मोठय़ा कागदावर पेन्सिलीने किंवा फळ्यावर कन्सेप्ट मॅपप्रमाणो लिहून काढा. म्हणजे आपल्याला कोणत्या संभाव्य करिअरच्या दिशेनं जायचे आहे, ते लिहा. समजा तुम्हाला आवडणारी आणि खुणावणारी  चार ते पाच क्षेत्रं असतील ती आधी लिहून काढा.
*  ती लिहिल्यावर प्रत्येक क्षेत्रच्या रस्त्याने थोडं पुढे जा. म्हणजे त्यातले मैलाचे दगड कोणते, हे बघा. म्हणजे किती परीक्षा आहेत? कधी आहेत? आपल्या चांगल्या वाईट क्षमता त्यासाठी कुठल्या आहेत?
* प्रत्येक रस्त्याला म्हणजे औपचारिक शिक्षणाला एक अंतिम मंझील असतेच. ती लिहा. म्हणजेच कोणती डिग्री? डिप्लोमा? मिळणार आहे, त्याचं नाव लिहा. 
* तिथे जायला लागणारा वेळ लिहा. तीन वर्ष? चार वर्ष? जे काय लागणार आहे ते लिहा. म्हणजे तेवढय़ा कालावधीत तो अभ्यासक्रम पूर्ण करणं आपण लक्षात घेऊ शकू.
* इथे समजा तुमचं शिक्षण पूर्ण झालं! 
पुढे, आता नोकरी किंवा व्यवसाय ते प्रत्येक क्षेत्रच्या पुढे लिहा. 
*  अंदाजे मिळणारी रक्कम, करावं लागणारं काम तेही लिहा. 
*  प्रत्येक क्षेत्रच्या बाबतीत असा विचार करा की या क्षेत्रची परिस्थिती अजून तीन ते चार वर्षांनी नक्की कशी असेल? आत्ता कशी आहे? आत्ता तिथे अंदाजे किती रक्कम मिळते? कोणत्या प्रकारचं काम करावं लागतं? 
* अजून चार वर्षानी चांगली परिस्थिती असेल? वाईट परिस्थिती असेल? की ‘जैसे थे’ परिस्थिती असेल? 
* इथे तुम्हाला त्या क्षेत्रत प्रत्यक्ष काम करणा:या व्यक्तींशी बोलावं लागेल. हे काम नीट करा. आणि त्यांच्याशी बोलून सध्याच्या आणि भविष्यातल्या त्या क्षेत्रतील संधींचा अंदाज घ्या.
* लक्षात घ्या, यातला प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यातलं प्रत्येक उत्तर महत्त्वाचं आहे. ते मिळालंच पाहिजे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळत जाईल तसतसा हा कन्सेप्ट मॅपचा बाण पुढे जाईल. 
* इथर्पयत येण्यासाठी कदाचित काही दिवसही जातील. मात्र करिअर ठरवण्यासाठी स्वत:ची आवश्यक तयारी तुम्हाला पूर्ण करावीच लागेल. ती तयारी झाली की हा मॅपच तुम्हाला काही विशिष्ट गोष्टी सांगेल.
* मॅप पूर्ण झाला. आता खरा शोध सुरू होईल. या मॅपकडे बघत विचार करा. तुमच्या मनात रेंगाळणारा कल्ला आता एका कागदावर स्वच्छ स्वरूपात उभा राहिला आहे. आपले मार्क - आपलं शिक्षण - पायावर उभं राहण्यासाठी आवश्यक तो पगार - हे चित्र समोर आहे.
* आपण नक्की कशाला महत्त्व द्यायचं आहे, हे बघा. आणि त्यातून आपल्याला जे आवडेल, जे ङोपेल, ते मनापासून करावंसं वाटेल ते निवडा. कदाचित तुमचा निर्णय याच टप्प्यावर सोपा होईल आणि अचूकही!
 
कन्सेप्ट मॅप तयार करताना 
तपासण्याच्या काही
े423 गोष्टी
 
स्वप्न आणि आवड भलीमोठी असेल, पण काही प्रॅक्टिकल गोष्टींचाही आढावा घ्यायलाच हवा. म्हणजे मग आपली उत्तरं अचूकतेच्या जास्त जवळ पोहचू शकतात.
 
1) आपलं गाव- राज्य - देश बदलावं लागण्याच्या शक्यता आहेत, त्याची तयारी आहे का?
2)  एखाद्या गोष्टीसाठी तडजोड करण्याची तयारी आहे का? आणि असेल तर किती प्रमाणात?
3) मनापासून चांगलं काम करण्याची संधी कोणत्या क्षेत्रत आहे?
4) आपल्याला आयुष्यात नेमकं काय हवं आहे?
स्थैर्य की धडपड? सरळ आयुष्य की धकाधकीचं? पैसा आणि समाधान? की दोन्ही? फक्त समाधान? फक्त पैसा? 
5) स्थलांतरं हवीत की नकोत? वेळखाऊ काम की ठरावीक वेळातलं काम? 
6) स्वत:हून काम करणार, की नेमून दिलेलं कामच आपण चोख करू शकू?
7) नोकरी करायची आहे नाकासमोर की आपल्या आवडत्या छंदाचं रूपांतरच रोजीरोटीत करायचं आहे? 
 
 
सोचो. आत्ता विचार करण्यात गेलेला वेळ वाया नक्की जाणार नाही. उलट मनातलं गुंतागुंतीचं चित्र काही प्रमाणात स्पष्ट व्हायला मदत होईल. संभाव्य दिशा नक्की होतील. मात्र करिअरच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी या मॅपमध्ये येऊ द्या. आणि खरीखरी उत्तरं द्या.
एक महत्त्वाचं : या मॅपच्या आत न आलेल्या, पण मनात काही गोष्टी असतील त्या वेगळ्या कागदावर लिहून ठेवा. मुख्य निर्णय घेताना फोकस तिकडे नको. मात्र त्याही कदाचित महत्त्वाच्या असू शकतील.
मॅप करताना खाडाखोड होऊ शकते म्हणून पेन्सिल वापरा किंवा फळ्यावर लिहा. 
इथे खाडाखोड झाली तरी चालेल, पण पुढे - प्रत्यक्ष आयुष्यात शक्यतो खाडाखोड होऊ नये, म्हणून ही काळजी!
 
- डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com 

Web Title: Scratching paper on paper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.