तरुण मुलांच्या हातात स्क्रीन टाइमचा बॉम्ब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 02:04 PM2019-05-31T14:04:32+5:302019-05-31T14:06:06+5:30

आजच्या तारुण्याला सगळ्यात मोठं व्यसन कुठलंय? -मोबाइलचं. नुस्ता सोशल मीडिया नाही, तर वेबसिरीज, व्हिडीओ गेम्स, पोर्न साइट यांनी त्यांची झोप उडवली तर आहेच; पण त्यांना वळच्या माणसांपासूनही तोडलं आहे, असं अभ्यासक म्हणतात. तरुण मुलांचं आयुष्य मोबाइलच्या चौकटीत असं कोंबणं धोकेदायक नव्हे काय?

Screen time bomb- young generation in a danger zone | तरुण मुलांच्या हातात स्क्रीन टाइमचा बॉम्ब

तरुण मुलांच्या हातात स्क्रीन टाइमचा बॉम्ब

Next
ठळक मुद्देस्क्रीन टाइम नावाच्या नव्या आजारानं तारुण्याला घेरलंय!

मुक्ता चैतन्य 

आपण सर्वसाधारणपणे दिवसभर मोबाइल कसा वापरतो? किंवा आपल्या दिवसभराच्या स्क्रीन टाइमचा विचार केला तर आपला दिवस मोबाइलसह आपल्याला कसा दिसतो?
आपण झोपेतून उठलो की आधी चाचपडत मोबाइल शोधतो. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक उघडतो. ही क्रि या डोळे उघडल्या उघडल्या लगेच होते किंवा डोळे उघडण्याआधीही होते. म्हणजे, डोळे उघडले की ताबडतोब आपण आभासी जगात असतो. काहीजण तर रात्री जाग आली तरी थोडावेळ व्हॉट्सअ‍ॅप चेक करतात. पुन्हा झोपतात. दिवसभर तर काय येता-जाता, काम म्हणून, उगाच, वेळ जात नाही म्हणून, सवय म्हणून सतत मोबाइल उघडून बघत असतो. 
अनेकांना जशा विविध प्रकारच्या सवयी असतात, म्हणजे नखं  कुरतडण्यापेक्षा डोळे मिचकावण्यापासून ते सतत एकसुरी पाय हलवत बसण्यार्पयत. तर अशीच ही सतत मोबाइल बघत बसण्याची सवय. फोन येवो न येवो, नोटिफिकेशन येवो न येवो मोबाइल चेक करत राहतात.  नोमोफोबिया (सतत फोन चेक करत राहण्याचे व्यसन) झालेले अनेक तरुण-तरुणी सतत आजूबाजूला दिसत राहतात. यांचा स्क्र ीन टाइम प्रचंड असतो. तो दिवसातून सात-आठ तास किंवा त्याहूनही अधिक असू शकतो. 
अर्थात हे फक्त तरुणांचंच होतं असं नाही, तर मोठय़ांचंही होतं.
पण 18 ते 25 वयोगटातले तरुण-तरुणी मोबाइल पाहतात म्हणजे ते सतत सोशल मीडियावर असतात का? 
- तर नाही. 
सोशल मीडियाच्या बरोबरीने गेमिंग, पोर्नोग्राफी आणि डिजिटल जगातल्या सीरिअल्स आणि सिनेमे बघण्यातही यांचा पुष्कळ वेळ जातो. बिंग वॉचिंग हा तर सध्याचा नवा परवलीचा प्रश्न आहे. बिंग वॉचिंग म्हणजे तासन्तास एखाद्या सीरिअलचे सगळे एपिसोड पाठोपाठ बघून संपवणं. मग त्यासाठी सलग कितीही तास बसावं लागलं स्क्र ीन समोर तरी चालतंच.
स्क्र ीन टाइम फक्त सोशल मीडियामुळे वाढत नाही, तर सोशल मीडियाबरोबर गेमिंग, पोर्नोग्राफी, यू-टय़ूब व्हिडीओ आणि डिजिटल चॅनल्स या सगळ्यांचा तुफान वापर सुरू  झाला की स्क्र ीन टाइम वाढत जातो. मग त्याचा परिणाम कळत-नकळत शरीर-मन यांच्यावर व्हायला लागतो. अर्थात याबद्दलही जगभर प्रवाद आहेत. कारण शास्त्नीय चाचण्या करून स्क्र ीन टाइमचा खरंच किती आणि कसा परिणाम होतो याचं पुरेसं संशोधन अजून झालेलं नाही. मात्र सध्या स्क्रीन टाइम हा तरुणांसमोरचा सगळ्यात महत्त्वाचा धोका आहे. त्यानं काय होतंय त्याची ही नोंद. 
अति स्क्रीन टाइमचे धोके कोणते?

 झोपेवर परिणाम 


 नेटिफ्लक्सचा सीईओ रीड हेस्टिंग्स म्हणतो, ‘आमची स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे’. हे वाक्य अर्थातच हसण्यावारी नेण्यासारखं नाही. त्याचा गंभीरपणे विचार करायला हवा आहे. स्क्र ीन टाइमचा झोपेवर नक्कीच परिणाम होतो. अपर्‍या झोपेतून अनेक शारीरिक आणि मानसिक प्रश्न निर्माण होतात. 


 लठ्ठपणा
 जितका जास्त स्क्रीन टाइम तितकं वजन वाढण्याची किंवा ओबेसिटीची शक्यता जास्त. गेमिंग करताना, सीरिअल/सिनेमे बघताना सतत बरोबर काहीतरी खायला घेतलं जातं. हे खाणं अनेकदा भुकेपेक्षा जास्त असतं. त्यामुळे वजनावर परिणाम होतो, स्थूलतेचे प्रश्न तयार होण्याची शक्यता असते. 
कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम


 हा नवा आजार आता डोकं वर काढू लागला आहे. सतत स्क्र ीन समोर बसल्याने डोळ्यांवर ताण येणं. थकवा जाणवणं, डोळे कोरडे पडणं, जळजळणं, स्वच्छ न दिसणं, डोकेदुखी अशा समस्यांमध्ये वाढ होते. 
 अनेकदा स्क्रीन समोर बसताना पाठ आणि मान यांचा विचार केला जात नाही. त्यामुळे कशाही अवघडलेल्या अवस्थेत बसून आभासी जगातला वावर सुरू असतो. परिणामतर्‍ पाठ आणि मानेचे त्नास सुरू होतात. 


 वास्तवच हरवतं!
 वास्तवाशी फारकत घेऊन सतत आभासी जगात रमण्याचं प्रमाण वाढतं. जिथं आपलं कौतुक होतं अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरचा वावर वाढतो. इतकंच नाही तर अनेकदा प्रेमात अपयशी झालेले किंवा सेक्शुअली डीप्राइव्ह तरु ण-तरु णी तासन्तास पोर्नोग्राफी किंवा यू-टय़ूबवर लव्ह सीन्स बघण्यात घालवतात. यात वेळ कसा आणि किती जातो ते लक्षात येत नाही. अनेकांच्या खर्‍या जगण्यातल्या नात्यांवर, लैंगिक संबंधांवर याचा थेट परिणाम होतो. 


समोरासमोर बोलताच येत नाही?


 माणसांना एकमेकांशी थेट बोलताच येत नाही असंही अनेकदा आढळून आलं आहे. चॅटिंग, मेसेजिंगमध्ये उत्तम संवाद साधू शकणारे तरु ण-तरु णी प्रत्यक्ष संवाद साधण्यात कमी पडतात. म्हणजे मोबाइल चॅटवर ढीगभर बोलतील; पण कुणी समोर असेल तर काहीच सुचत नाही. नजरेला नजर देत आत्मविश्वासाने बोलणंच अनेकांना जमत नाही. प्रत्यक्ष संवाद साधण्याची क्षमता संपत जाणं हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा धोका आहे. जो अजूनही पुरेसा लक्षात घेतला जात नाहीये.


फील गुडचा अतिरेक
 अभ्यास असं सांगतात की सतत स्क्र ीन समोर असलेल्या व्यक्तीच्या मेंदूत डोपामिन हे फील गुड रसायन अधिक प्रमाणात स्रवायला लागतं. सतत छान छान वाटत राहण्याची गरज जसजशी तीव्र होत जाते त्यातला आनंद आणि समाधान कमी कमी होत जाते. म्हणजे सतत फील गुड वाटावं यासाठी स्क्र ीन टाइम वाढतो; पण प्रत्यक्षात  फील गुड  वाटत नाही.  या सगळ्या गडबडीत आपलं कुठेच धड लक्ष लागत नाही. 

सतत ताण येतो!

 अनेकजण ताण घालवण्यासाठी गेमिंग करतात. पोर्नोग्राफी बघतात किंवा आभासी जगात वावरतात; पण प्रत्यक्षात या सगळ्याच्या वापराने ताण जात नाही, तर ताण गेला आहे अशी फक्त भावना निर्माण होते. 

 नैराश्याची सुप्त दुनिया 
 सतत आभासी जगात वावरल्यानंतर प्रत्यक्ष जगातले ताणेबाणे हाताळता येणं अनेकांना कठीण जातं आणि त्यातून नैराश्य, उदासीनता आदी आजारांची सुरु वात होते. 

 चौकटीतलं एकटं मनोरंजन
 माणसांचं जगणं एका चौकटीत किंवा खिडकीत कोंबलं गेलंय. स्क्र ीन टाइममध्ये मनोरंजन हा एक मोठा भाग असतो. पूर्वी मनोरंजन ही सामूहिक प्रक्रि या होती. घरात टीव्ही सगळे एकत्न बघत असतं. सिनेमाला जाणं हा कौटुंबिक सोहळा असे किंवा मित्न-मैत्रिणींच्या गॅँग बरोबर सिनेमा बघितला जायचा. आता मनोरंजन एखाद्या क्यूबिकलमध्ये कोंबलं गेलेलं आहे. जो तो आपापल्या चौकोनात शिरत मनोरंजन करून घेत असतो. त्यामुळे मनोरंजनाच्या निमित्ताने माणसांचा माणसांशी जो संवाद होत होता तोही काही प्रमाणात बंद होताना दिसतो आहे. मुलं काय बघतात हे पालकांना माहीत नाही आणि  मित्न-मैत्रिणी काय बघतात हेही अनेकदा एकमेकांना ठाऊक नसते. याचे दुष्परिणाम कुटुंबावर आणि नातेसंबंधांवर होताना दिसू लागले आहेत. 

***

स्क्रीन टाइम कमी करण्यासाठी 
काय कराल?

* जेवण करताना स्क्रीन टाइम नको. काहीतरी बघत जेवण करू नका. कुटुंबीय/ मित्नपरिवार यांच्याशी गप्पा मारत जेवा. 
* दिवसभरात किती वेळ स्क्रीन समोर घालवायचा ते ठरवा. 
* आठवडय़ातून एक दिवस नो स्क्रीन डे करा. त्यादिवशी मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही सगळं बंद असू द्या. इमर्जन्सी किंवा संपर्क राहावा यासाठी मोबाइल स्विच ऑफ करायचा नसला तरी डाटा बंद करून टाका. 
* झोपताना मोबाइल किंवा टीव्हीवर काहीही बघू नका. झोपताना शांत झोप कशी लागेल यासाठी प्रयत्न हवेत. 
* सोशल मीडिया साइट्सवर किती काळ जायचं याचा विचार करा. तिथे जाणारा वेळ कमी करा. 
* स्क्र ीन टाइमवर मर्यादा आणण्यासाठी सरळ टायमर लावा. वेळ संपली की बाहेर पडा. 
* काहीतरी छंद जोपासा. जे आवडतं  ते करा. वेळ जात नाही म्हणून मोबाइल बघत राहण्याला अर्थ नसतो. 
* सतत चॅटिंग करण्यापेक्षा माणसांना भेटा. त्यांच्याशी प्रत्यक्ष बोला. गप्पा मारा. त्याने अधिक रिलॅक्स होतं. 
* माहिती फक्त गुगलवरून मिळते असं नाहीये. माहिती मिळवण्याचे इतरही अनेक मार्ग आहेत. आपला जनसंपर्क वाढवत  गुगलपलीकडे जाण्याचा प्रयत्न करा. 
* तुम्हाला आवडत असेल त्या प्रकारचा व्यायाम करा. ट्रेकिंगला जा. बाहेर पडा. जग मुठीत आलं असं वाटतं असलं तरी तो आभास असतो हे विसरू नका. 


( लेखिका स्वतंत्र पत्रकार, सोशल मीडिया अभ्यासक आहेत.)
 

Web Title: Screen time bomb- young generation in a danger zone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.