समुद्राचा दोस्त
By अोंकार करंबेळकर | Published: June 7, 2018 03:00 AM2018-06-07T03:00:00+5:302018-06-07T03:00:00+5:30
स्वप्निल तांडेल. लहानपणापासून मासे आणि समुद्र या जगात तो वाढला आणि त्यानं ठरवलं काम करायचं ते समुद्राशी दोस्ती करतच..
निसर्गाशी, प्राणी जगताशी, नेचर-वाइल्डलाइफ फोटोग्राफीशी संबंधित काहीतरी काम करावं असं वाटतं; परंतु आपण राहतो लहान गावात, आपल्याला काय संधी आहे ? करिअरचा तर विषयच सोडा, जी नोकरी मिळाली ती करायची निमूट असं गावोगावी मुलांना वाटतं.
पण खरं पाहता महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या प्रत्येक खेड्यापाड्यातल्या मुलांना त्यांच्या आसपासच्या निसर्गाची माहिती असते. तिथल्या झाडांची, फुलांची, फळांची, प्राण्यांची नावं माहिती असतात. खेळताना त्यांचं निरीक्षणही या मुलांनी केलेलं असतं. पण याचा पुढे ते कधीच उपयोग करत नाहीत.
रत्नागिरीच्या स्वप्निल तांडेलनं मात्र आपल्या छंदाचंच रूपांतर करिअरमध्ये करायचं ठरवलं. मासेमारी करणाऱ्या समुदायांमध्येच जन्म झाल्यामुळे स्वप्निलचं मासे आणि समुद्राचं नातं जन्मापासूनच होतं. घरामध्ये आजी-आजोबांकडून मासेमारीच्या साहसकथा ऐकतच तो मोठा होत होता. यामध्ये खवळलेल्या समुद्राला तोंड देऊन परतण्यात यशस्वी झालेले मच्छिमार, व्हेल-कासवं, माशांच्या कथा असत. शाळेमध्ये असताना त्याला सारखं समुद्राच्या काठावर जाऊन माशांच्या हालचाली पाहाव्याशा वाटायच्या.
लहानपणी त्याच्या बाबांबरोबर तो मासे आणायला बाजारात जायचा तेव्हा त्याचं नाव विचारून तो लगेच संबंधित माशाचं शास्त्रीय नाव शोधून त्याची माहिती गोळा घ्यायचा. मगच मासे पुढे स्वयंपाकघराच्या दिशेने जायचे. पण या त्याच्या समुद्र निरीक्षणाच्या छंदामुळे त्याचे शिक्षक मात्र वैतागले. शाळा बुडवून हा मुलगा बाहेर फिरतो अशा तक्रारी वारंवार त्याच्या घराकडे येऊ लागल्या. पण या सगळ्यामुळे शालेय शिक्षण झालं की समुद्र आणि माशांशी संबंधितच काहीतरी करायचं हे त्यानं नक्की केलं. त्याच्या या निर्णयावर त्याचे आई-वडील ठामपणे उभे राहिले.
२०१० साली त्यानं मुंबई विद्यापीठातून प्राणिशास्त्र व समुद्रविज्ञान या विषयात पदवी मिळवली. पाठोपाठ २०१२ साली ओशनोग्राफी आणि फिशरी सायन्स हे विषय घेऊन त्याने मुंबई विद्यापीठातूनच प्राणिशास्त्रात एम.एस्सी. पदवी मिळवली. २०१३ मध्ये त्यानं सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूट मुंबई येथे शास्त्रज्ञांबरोबर काम केलं. काही काळानंतर नॅशनल इनोव्हेशन्स आॅन क्लायमेट रेझिलियंट अॅग्रीकल्चरमध्ये मरिन फिशरिज प्रकल्पावर वरिष्ठ संशोधक म्हणून काम सुरू केलं. या अशा एकेक प्रकल्पांमध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाल्याने त्याला मोठमोठ्या शास्त्रज्ञांना भेटता आलं, त्यांच्याबरोबर कामही करता आलं. डॉ. विनय देशमुख, डॉ. के. व्ही. अखिलेश, Þडॉ. एस. रामकुमार, डॉ. मृदुला श्रीनिवासन अशा संशोधकांची त्याला भरपूर मदत झाली.
सध्या तो स्वतंत्र संशोधक म्हणून काम करत आहे. रफर्ड फाउण्डेशन या संस्थेने दिलेल्या मदतीच्या आधारे तो सिंधुदुर्ग व रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 'असेसिंग द एक्स्टेंट आॅफ सी टर्टल अँड मरिन मॅमल बायकॅच इन स्मॉल स्केल फिशरिज अॅँड डेव्हलपिंग अ कॉन्झर्वेशन स्ट्रॅटेजी अलाँग द नॉर्दर्न अरेबियन सी कोस्ट' या प्रकल्पावर तो काम करत आहे. या प्रकल्पात या दोन्ही जिल्ह्यांमधील समुद्री कासवं, डॉल्फिन्स यांची माहिती गोळा करणं, या जिवांचा आणि मच्छिमारांचा सहसबंध याची माहिती मिळवणं असं काम करण्यात येत आहे. या माहितीसाठी मच्छिमारांना भेटून त्यांच्या कामाबद्दलही माहिती गोळा करावी लागते.
स्वप्निल म्हणतो, लोकांमध्ये जाणं, त्यांच्याशी बोलून माहिती मिळवणं, बोटीतून जाणं हे सगळं लहानपणापासून केलं असल्यामुळे या प्रकल्पांवर काम करणं सोपं जातं.
ओशनोग्राफीच्या संबंधित अभ्यासक्रमात शिकणारी अनेक मुलं त्याच्याशी फेसबूकवर किंवा इतर माध्यमातून संपर्कात असतात. त्या सर्वांच्या शंकांचं निरसन तो करतो, त्यांना मदत करतो. समुद्राच्याबाबतीत आणि सागरी जिवांवर संशोधन करताना रोज नवी माहिती मिळते, रोज काहीतरी नवं शिकायला मिळतं असं तो सांगतो. ते नवेपण हीच तर कामातली गंमत असते.
onkark2@gmail.com