बियांची राखी- पर्सनलाइज्ड राख्यांचा एक नवा ट्रेण्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 07:28 PM2019-08-01T19:28:38+5:302019-08-01T19:30:22+5:30
तिला वाटलं, राखी बांधल्यावर काही दिवसांनी कच-यात जाते, त्यापेक्षा त्या राखीतच बी पेरलं तर? त्यातून तयार झाली एक अनोखी राखी..
- सायली जोशी-पटवर्धन
रक्षाबंधन तसं जवळ आलंय. राखी पौर्णिमेला एकमेकांना काय भेट द्यायचं याचं प्लॅनिंगही एव्हाना सुरू झालं असेल. तसंही हे भावाबहिणीचं नातं आता दोस्तीसारखं असल्यानं गिफ्ट्सचाही खास विचार केला जातो.
आता तर इको फ्रेण्डली राखी, बांबूची, फुलांची, स्वत:च्या हातानं बनवलेली राखी, क्विलिंगच्या राख्या, असा नवा पर्सनलाइज्ड ट्रेण्ड सध्या चर्चेत आहे. उगीच गेलं बाजारात आणि आणली फुलाफुलांची राखी उचलून, प्लॅस्टिक नि कागदाची असं आता होत नाही. विशेषत: राखी स्पेशल आणि पर्सनल टचची असावी, असा प्रयत्न तरुण मुलंमुली करतातच.
तर अशाच या ट्रेण्डमध्ये एक भन्नाट आयडिया काही तरुण दोस्तांना सुचली. पलक कुसुमाकर आणि विनय भंडारी असं या दोस्तांचं नाव. पलक अवघ्या 20 वर्षांची आहे. मूळची इंदूरची. तिच्या सुपिक डोक्यातून आलेल्या कल्पनेनुसार तिने पर्यावरणपूरक राखी तयार केली. इतकेच नाही तर या राखीमध्ये झाडांच्या बिया घातल्या. ज्यामुळे रक्षाबंधनानंतर ती राखी वाया न जाता त्यातून एक झाड, रोप असं जिवंत चित्र आकारास येईल. या अनोख्या राखीचं नाव त्यांनी रिश्ता असं ठेवलंय.
पलकला ही कल्पना कशी सुचली तर ती सांगते, अनेकदा राख्या काही दिवसांनी फेकल्याच जातात. बारावीपासून मी मृत्युंजय नावाच्या स्वयंसेवी संस्थेत काम करतेय. ही संस्था पाणी बचतीसाठी काम करते. संस्थेने इंदूरजवळचे एक खेडे दत्तकही घेतलं आहे. त्याठिकाणी लहान मुलांना शिक्षण मिळावे यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षलागवडीसारखे उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यातूनच मग मला ही कल्पना सुचली. मुंबईत फजलानिया अकॅडमी ऑफ बिजनेस सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला सामाजिक प्रकल्प करण्यास सांगण्यात आले. तेव्हा मागील अनेक दिवसांपासून डोक्यात असलेली बियांच्या राखीची संकल्पना राबविण्याचं मी ठरवले. सुरुवातीला मी आणि माझा मित्र असे दोघेच हे काम करत होतो. नंतर आम्हा मित्रमैत्रिणींची सहा जणांची टीम यावर काम करायला लागली. कालांतराने ही संकल्पना सगळ्यांना इतकी भावली की केवळ एका व्हॉट्सअँप मेसेजवरून आम्हाला राख्यांसाठी तुफान मागणी यायला लागली. महाविद्यालयातही माझ्या वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी माझ्या प्रकल्पात सामील होण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आणखी जोमाने काम सुरू केलं.’
कशी आहे बियांची राखी
या राखीचा बेस लोकरीचा असून, ही लोकर नंतर तुम्ही कोणतीही गोष्ट बांधण्यासाठी अगदी सहज करू शकता. यावर एका कापडामध्ये रोपांच्या बिया बांधून त्या लोकरीला योग्यपद्धतीने जोडण्यात आल्या आहेत. यामध्येही 3 वेगवेगळ्या रोपांचे पर्याय देण्यात आले आहेत. मधुमालती, झेंडू आणि तुळस या तीन रोपांच्या बियांचा वापर करण्यात आला आहे. तसेच इतर राख्यांप्रमाणे ही राखी बांधण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर न करता वर्तमानपत्रांचा वापर करण्यात आला आहे. माझ्या काकांचा फुलांचा व्यवसाय असल्याने त्यांच्या मदतीने मी इंदूरहून या बिया मागवल्या असे पलकने सांगितले.