इसरोत निवड, बोरिवलीची दिव्यश्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:36 AM2018-03-29T08:36:26+5:302018-03-29T08:36:26+5:30
इसरोच्या परीक्षेत देशात तिसरी आणि मुलींमध्ये पहिली येत ती आता इसरोत रुजू झाली आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न तिनं आता जगायला घेतलंय..
- मनोहर कुंभेजकर
बोरिवलीची दिव्यश्री शिंदे. हुशार. इंजिनिअर. नवी मुंबईत ऐरोलीला ती एल अॅण्ड टी या नामांकित कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी करत होती. दीड वर्षे नोकरी केली. पगार उत्तम. सुविधा उत्तम. पण देवश्रीचं मन त्या नोकरीत रमत नव्हतं. तिला इसरोसारख्या संस्थेत जाऊन, संशोधन क्षेत्रात काहीतरी मूलभूत, समाधानकारक काम करायचं होतं. मात्र त्यासाठीच्या परीक्षांची तयारी करायची तर अभ्यास उत्तम हवा. मेहनत हवी. नोकरी करून अभ्यास करणं काही साधत नव्हतं. शेवटी तिनं नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. अभ्यास करून या परीक्षा द्यायचं ठरवलं. घरी आईवडिलांना सांगितलं तर त्यांनीही तिच्या निर्णयाला पाठिंबाच दिला. मग दिव्यश्रीनं नोकरी सोडून पूर्णपणे स्वत:ला अभ्यासात झोकून दिलं.
त्याचं फळही तिला मिळालं. दिव्यश्री विलास शिंदेची नुकतीच भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इसरोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या इसरोच्या परीक्षेत ती देशात तिसरी तर मुलींमध्ये सर्वप्रथम आली आहे. ही निवड परीक्षा अत्यंत कठीण. देशभरातून साधारण पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यामधील ३०० विद्यार्थ्यांची मुलाखतीसाठी निवड झाली. आणि अंतिम ३५ जणांनाच फक्त इसरोमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या अंतिम ३५ जणांत दिव्यश्री तिसरी आली.
दिव्यश्रीने लहानपणी माजी राष्ट्रपती व प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्वर्गीय डॉ.ए.पी.जे .अब्दुल कलाम यांचं पुस्तक वाचलं होतं. तेच तिचे आदर्श. त्यांच्याइतकं काम साधणार नाही; पण निदान त्या वाटेवर आपण दोन पाऊलं चालून पहावीत अशी तिची इच्छा होती. इसरोत काम करायचं या स्वप्नानं मनात घर केलं होतं. दिव्यश्री सांगते, संशोधन क्षेत्रातच काम करायचं हे मनाशी पक्कं होतं. त्यामुळे त्या दिशेनं अभ्यास फक्त मी करत गेले.
त्या प्रयत्नांना यशही आलं. म्हणूनच आता तामिळनाडूत महेंद्रगिरीस्थित इसरो प्रोपलशन कॉम्प्लेक्स येथे ती रुजू होतेय. हे सारं साधलं कारण दिव्यश्रीच्या पाठीशी तिचे पालकही उभे राहिले. लेकीनं संशोधन करण्याचं, अवकाश विज्ञान क्षेत्रात काम करण्याचं स्वप्न पाहिलं तर त्या स्वप्नांवर तिच्या पालकांनीही भरवसा ठेवला. तिचे वडील विलास शिंदे यांचा गारमेंटचा व्यवसाय असून, ते बोरिवलीत शिवसेना शाखा क्रमांक १२ चे गटप्रमुख आहेत. आई ऊर्वशी या योजना विद्यालयाच्या मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सायंकाळी संभाषणात्मक इंग्रजी शिकवतात. भाऊ मुकुंदही मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय तर बहीण भाग्यश्री सीए करतेय. आपल्या मुलांना त्यांच्या करिअरवाटा निवडण्याचं स्वातंत्र्य या पालकांनी दिलं, तेही महत्त्वाचं ठरलं.
कारण दिव्यश्री इसरो, बीएआरसीसारख्या संस्थांमध्ये काम करण्यासाठीच्या विविध परीक्षांची तयारी करत होती. काही काळ दिल्लीत जाऊन तिनं यूपीएससीचीही तयारी केली. त्यासाठी क्लास लावला. त्या अभ्यासाचा फायदा तिला इसरोच्या प्रवेश परीक्षेसाठीही झाला. दरम्यान, ती बीएआरसीचीही परीक्षा उत्तीर्ण झाली. दिवसाकाठी १७-१८ तास अभ्यास करत, मेहनत घेत तिनं आपल्या संशोधन क्षेत्रात काम करण्याच्या स्वप्नाचा पाया घातला.
मुख्य म्हणजे पहिली ते दहावी दिव्यश्री सेमी इंग्रजी माध्यमातच शिकली. बोरिवलीतील मंगुभाई दत्ताणी विद्यालयात (योजना विद्यालय) तिचं शिक्षण झालं. तिच्या जिद्दीच्या वाटेत भाषेच्या अडचणी आल्या नाहीत. कारण ती कसून ‘फोकस्ड’ अभ्यास करतच राहिली. वांद्रे येथील थडोमल सहानी इंजिनिअरिंग महाविद्यालयातून तिनं इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनिअरिंग केलं. आणि नोकरी करतानाही आपल्या स्वप्नावरचं लक्ष हलू दिलं नाही.
दिव्यश्री सांगते, इसरोत अर्थात अंतराळ संशोधन क्षेत्रात काम करण्याची, संशोधन करण्याची संधी मिळणं ही आता एका नव्या स्वप्नाची सुरुवात आहे.