ड्रॉइंग चांगलं आहे म्हणून कुणी ‘टॅटू’ आर्टिस्ट होतं का? - मी झालो!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 06:11 PM2019-03-07T18:11:57+5:302019-03-07T20:10:22+5:30

ड्रॉइंग चांगलं होतं, टॅटू करता येईल आपल्याला असं वाटलं; पण शिकणार कुठं? शिकलो धडपडत आणि आज स्वतर्‍चा टॅटू स्टुडिओ काढलाय आणि प्रोफेशनल आर्टिस्ट झालोय..

self employment in small town- Tattoo making is new job opportunity! | ड्रॉइंग चांगलं आहे म्हणून कुणी ‘टॅटू’ आर्टिस्ट होतं का? - मी झालो!

ड्रॉइंग चांगलं आहे म्हणून कुणी ‘टॅटू’ आर्टिस्ट होतं का? - मी झालो!

Next
ठळक मुद्दे काम करायला मजा येते, मी प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे.

- प्रशांत जाधव

मी एक प्रोफेशनल टॅटू  आर्टिस्ट आहे. 
आता हे वाक्य मी सहज लिहिलं, मी हे वाक्य प्रत्यक्षात उतरवणं इतकं सोपं नव्हतं. त्यासाठी मी खूप मेहनत केली आहे, संघर्ष केलाय.
त्यानंतर आज मी स्वतर्‍ची ओळख सांगतोय की, एक प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे.
दोन वर्षे झाली मी या क्षेत्रात काम करतो आहे. पण हे काम करायचं असं काही स्वपA मनात नव्हतं. मी बारावी सायन्स पास झालो त्यानंतर काय करायचं असा मनात प्रश्न होताच. त्याचकाळात मी टीव्हीवर इंकमास्टर नावाचा एक शो पाहिला. त्यात टॅटूविषयी माहिती मिळाली. माझं ड्रॉइंग खूप चांगलं आहे. तेव्हा माझ्या मनात आलं की, आपण हे काम केलं तर. मी अजून माहिती घेतली तेव्हा कळालं की या टॅटू आर्टिस्टचं काम खूप भारी आहे. त्यांची लाईफस्टाइलपण खूप भारी असते.
त्याकाळात मी तो शो रोज बघायचो. वाटलं की, आपण हे काम शिकावं. पण शिकणार कसं? त्यावेळेस मी स्वतर्‍साठी 50 रुपयांची एखादी वस्तूही घेऊ शकत नव्हतो. पैसेच नव्हते. घरची परिस्थिती जेमतेम होती. मग मी एक युक्ती लढवली माझं ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे मी टेम्पररी टॅटू बनवायला सुरु वात केली. माझे मित्र ते टॅटू काढून घ्यायचे, वाढदिवस किंवा पार्टीसाठी ते टॅटू बनवायचं काम मिळायला लागलं. एकदा माझं ते टेम्पररी काम पाहून एकानं सांगितलं की, तू हे काम कर, प्रोफेशनल आर्टिस्ट हो. 
तोवर मी इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला होता. पहिल्या वर्षाचं शिक्षण सुरू होतं. टेम्पररी टॅटू बनवण्याचं काम करून मी काही पैसे साठवत होतो.
माझ्याकडे तेव्हा यू टय़ूब, नेटही नव्हतं की, मी माहिती मिळवीन. त्यात टॅटू मेकिंगच्या प्रोफेशनल ट्रेनिंगसाठीचा खर्च मला झेपणार  नव्हता. वडील नुकतेच अकाली गेले होते, जेमतेम माझं शिक्षण सुरू होतं. तिथं या ट्रेनिंगसाठी पैसे कुठून आणणार. मी टेम्पररी टॅटू करून जे पैसे साठवले होते त्यातून मी ठरवलं की डायरेक्ट टॅटू करायचं मशीन विकत घ्यायचं, काम सुरू करायचं. मी मम्मीला सांगितलं, तिनं माझ्या हौशीपायी पैशाची जुळवाजुळव करायला मदत केली आणि मला माझी प्रोफेशनल टॅटू किट घेऊन दिली.
मी टॅटू केलाही. पहिला ग्राहकही मिळाला. मी खूप खूश झालो कारण मला त्याकामाचे 2500 रुपये मिळाले. पण टॅटू पूर्ण हिल व्हायला 10 ते 15 दिवस लागतात. पण त्यानंतर मला त्या व्यक्तीनं कळवलं की टॅटू काही चांगला झाला नाही. 
मला फार वाईट वाटलं. हे काम आपल्याला जमत नाही याचं फ्रस्ट्रेशन आलं. सोडून देऊ असंही वाटलं. मग लक्षातही आलं की हे काम वाटतं तितकं सोप नाही. मग मी याच्याशी निगडित व्हिडीओ इंटरनेटवर बघितले. पण तरी पूर्ण माहिती मिळत नव्हती. ट्रेनिंग घेणंच गरजेचं होतं. शेवटी मी एका टॅटू स्टुडिओमध्ये गेलो. त्यांना माझी समस्या सांगितली. फी देण्याइतके पैसे नाहीत असं त्यांना सांगितल्यावर त्यांनी हप्त्यानं पैसे दे असं सांगून माझं ट्रेनिंग सुरू केलं. 
तिथं मला खूप छान शिकता आलं. तीन महिने मी अनेक बारकावे शिकलो. ड्रॉइंग माझं उत्तम होतं, त्यामुळे फक्त टेक्निकल गोष्टींवर हात बसणं आवश्यक होतं. 
प्रशिक्षण तर सुरू झालं. मग सुरू झाला माझा प्रवास.  टॅटू स्टुडिओ काढावा असं मनात होतं. पण पैसे नव्हते. घरचेही कधीतरी म्हणत की, कसं होणार तुझं, काहीतरी बरं कर ! मग एक साधारण  वर्षभर मी क्लाइंटच्या घरी जाऊन किंवा त्यांना माझ्या घरी त्यांना बोलावून टॅटू काढून द्यायचो. रिकामा बसण्यापेक्षा करतोय ना काहीतरी, कमावतोय दोन पैसे असं म्हणत घरचेही सोबत होते.
पण मग मी ठरवलं आपला स्टुडिओ हवा. मी भुसावळला ‘इंक मी टॅटूज’ नावाचा एक स्टुडिओ काढला. त्यासाठी बरीच धावपळ, धडपड करून कर्ज काढलं. आता भुसावळमध्येही अनेकजण हौशीनं माझ्याकडे येतात, टॅटू काढून घेतात. कपल टॅटूही काढले जातात. काम करायला मजा येते आहे.
मी प्रोफेशनल टॅटू आर्टिस्ट आहे, माझा स्वतर्‍चा स्टुडिओ आहे असं सांगताना मला अभिमान वाटतो. आईची साथ होतीच, तिला माझ्या कामाचा आनंद आहे. आता मी या व्यवसायात रुळायला लागलो आहे.


 

Web Title: self employment in small town- Tattoo making is new job opportunity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.