सेल्फी

By admin | Published: April 26, 2017 01:38 PM2017-04-26T13:38:39+5:302017-04-26T13:38:39+5:30

दुसऱ्या कुणी आपला वैताग सांगितला, प्रश्न सांगितले तर वाटतं, इतकासा तर प्रॉब्लेम आहे त्यात काय? या प्रश्नांवर हे एक-दोन तीन-चार उपाय आहेत .सुचतं झटाझट सोल्यूशन. का सुचतं? कारण ते दुसऱ्याचं आयुष्य असतं! प्रश्न दुसऱ्याचा असतो. त्यातली सगळी किचकट प्रश्नपत्रिका पण एकदम सोपी वाटते. पण तेच प्रश्न आपले असले तर मात्र फार अवघड असते प्रश्नपत्रिका. दु:ख केवढं तर म्हणे आभाळाएवढं.

Selfie | सेल्फी

सेल्फी

Next
>- प्राची पाठक
 
इतना टेन्शन लाते कहॉँसे हो ?
 
‘मी फार स्ट्रेसमध्ये आहे’, 
‘टेन्शन आलंय’, 
‘डोकं बंद पडलं यार, काही सुचत नाहीये, इतका ताण आहे... ’
- आहेत ना ही वाक्यं ओळखीची?
तुम्हाला एकदम रिलॅक्स राहावंसं वाटतं आहे..
पण तुमची नक्की कल्पना काय आहे रिलॅक्स असण्याची? ताण नको, म्हणजे रिलॅक्स, असं म्हणायचं आहे का? कुठे कसला ताणच नाही, तर किती कंटाळवाणी अवस्था होईल ती. काहीच करायचं नाही म्हणजे रिलॅक्स, असं म्हणायचं काय? सगळे एकदम हातात. आयुष्यातले प्रश्नच मिटले ना राव, अशी अवस्था म्हणजे रिलॅक्स का? आयुष्यातल्या कशालाच भिडायचंच नाही, म्हणजे रिलॅक्स का? इतरांच्या आयुष्यातले जे छान पॅकेज आपल्याला जाणवतं आहे दुरून, तेच आपलं हवं, म्हणजे ताण मिटेल, असं रिलॅक्स का? नेमकं कसं जगलं म्हणजे ताणमुक्त असू आपण असं आपल्याला वाटतं आहे? कधी विचार केलाय? ताणच नाही कसला, तर ती अवस्था आपल्याला किती काळ हवी आहे? की जन्मापासून मरेपर्यंत ताणमुक्त असायला हवं आहे? शक्य आहे का ते कोणालाही? ताणच नसेल, तर करायचं काय, असा प्रश्न पडतो का? 
विचार करा, बघा सापडतात का या प्रश्नांची उत्तरं..
कोणी म्हणेल, ‘सोसेल इतपत ताण ठीक आहे. आम्हाला झेपत नाही हो हा ताण. ’
पण म्हणजे काय? 
मुळात ताण-टेन्शन-स्ट्रेस म्हणजे तुमच्या आयुष्याच्या चौकटीत नेमकं काय आहे? का वापरतो आहोत हे शब्द आपण? किती काळ सुरु आहे हे? छोट्या मोठ्या कुरबुरींना आपण ताण म्हणत आहोत का? त्या ताणात काही दम आहे का की वेळेच्या नियोजनाचा अभाव आहे? असं का होतंय? ते बदलता येईल का? नेमकं कशाच्या पाठी ताण- ताण म्हणत तणतण करत आहोत आपण, याचा विचार केला आहे का? ते इतकं असह्य आहे की त्यावर उत्तरच नाही, असं वाटतं आहे का? 
आपल्याला जो ताण वाटतो तीच परिस्थिती तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या बाबत सुरु आहे, असं मनात आणा. मग पहा कशी पटापट उत्तरं सुचतात. 
परिस्थितीतून मार्ग काढायची उर्मी येते. इतकासा तर प्रॉब्लेम आहे, असं वाटतं. या प्रश्नांवर हे एक-दोन तीन-चार उपाय आहेत. सुचतं नं झटाझट? कारण ते दुसऱ्याचं आयुष्य असतं! त्यातली सगळी किचकट प्रश्नपत्रिका पण एकदम सोपी वाटते. पण तेच आपल्या आयुष्याला जोडलं, तर न सुटणारी आणि भली मोठी प्रश्नपत्रिका वाटते. दु:ख केवढं तर आभाळाएवढं. 
पण विचार करा पतंगाच्या दोराला ताण मिळालाच नाही, तर उडेल का ती? खूप जास्त ताण पडला, तर दोरा तुटणार. योग्य ताण असेल, तरच ती उंच जाणार. भरकटणार नाही, कटणार नाही. आपल्या आयुष्यातील ताणाचं देखील असंच आहे. सगळेच एकदम रिलॅक्स असेल, तर केवढी मोठी अंर्तप्रेरणा वापरावी लागेल स्वत:ला धक्का मारायला! स्वत:ला किती स्पीडअप करावं लागेल. काहीतरी करायला काहीतरी प्रेशर आहे म्हणून निदान आपण ते करायचं ठरवतो. भूक लागते, म्हणून जेवतो. भूकच लागली नाही, तर जेवायची धडपड कोण कशाला करेल? मला झेपेल तितकाच ताण आयुष्यानं मला द्यावा, हे कितीही गोडगोड स्वप्नं असलं, तरी ते शक्य असतं का? उलट, ताणावर स्वार होऊन, टेन्शन न घेता मी सोडवूनच राहीन हे कोडं, असं बघता येतं का ताणाला? ताणाशी दोन हात करायची योजना आखता येतेय का? त्यासाठी नेमकं कशानं आपण त्रासलेले आहोत ते शोधावं लागेल. आपल्याला जे त्रासदायक वाटतं आहे, ते तितकंसं त्रासदायक नसतंसुद्धा प्रत्यक्षात. त्याला भिडायला गेलो की ‘इतकं काही अवघड नव्हतं राव, आपण उगाच बाऊ करत होतो.. पुरून उरलो की याही परिस्थितीला’ असं छानसं सरप्राईझ देखील आपलं आपल्याला मिळू शकतं. 
पुढील छोट्या मोठ्या कुरबुरींना आपण सज्ज होतो. आपलंच दु:ख हिमालयाइतकं मोठं दिसत नाही. 
 
टेन्शन का सोल्यूशन है क्या?
ताणाशी दोन हात करायचा सोपा मंत्र आहे, थोडा नीट विचार करायलाहवा. 
आपल्याला कशानं ताण आलेला आहे, यावर विचार करणं. आपल्या विचार पद्धतीला स्कॅन करणं. चुका शोधणं. हे काम आपलं आपल्याला जमलं, तर बेस्ट. नाहीतर, जवळच्या मित्रांची, घरातल्या प्रेमाच्या लोकांची मदत घ्यायची. 
हाच ताण सकारात्मक पद्धतीनं काहीतरी ध्येय गाठण्यासाठी वापरता येतोय का याचा विचार करणं. ही एक बारीक रेष असते. इथे तोल साधला, तर आयुष्यात पुढे जाऊ. तोल गेला, तर कचकच आणि ताण टोकाला गेला, तर तब्येत देखील बिघडणार. म्हणूनच या टप्प्यावर अतिशय सावध राहून पुढे -मागे- बाजूला बघून निर्णय घेता आले पाहिजेत. स्वत:मध्ये ठरवून बदल केले पाहिजेत. इथे लढायचं आणि टिकायचं. 
लढता लढता स्वत:वरचा ताबा सुटू द्यायचा नाही. कशाशी नेमके लढत आहोत, का भिडलो आहोत आणि किती काळ असं करावं लागेल, याचं गणित नीटच मांडायचं. आपली पद्धत बरोबर आहे ना की या टप्प्यावर बदलायला हवं आहे, याचा सेल्फ चेक ठेवायचा. 
हे जमू लागलं, तर ताण कुठल्याकुठे पळून जातो आणि जिगर, उर्मी या शब्दांशी आपली घट्ट मैत्री होऊ शकते. 
टेन्शन काय को लेने का?
 
योग्य ताण, सुरेल सूर
ताण ही काही इतकीही वाईट गोष्ट नाही. ताण कमी देखील नको आणि जास्त देखील. गिटार, व्हायोलिन कसे जुळवतात माहित आहे? तारेला योग्य ताण द्यावा लागतो. मग त्यातून हवा तो सूर मिळतो. ताण कमी असेल, तर ते वाद्य बेसूर वाजणार आणि ताण जास्त झाला तर तार तुटणार. जास्त ताणानं देखील बेसूरच वाजणार. तारेला योग्य ताण असेल, तरच तिच्यातून छान संगीत बाहेर येतं. सूर जुळतात. गाणं साकारतं. ते परत परत ऐकता येतं. नवनवीन गाणी रचता येतात.
 
 
( मनमोकळं जगण्याचा ध्यास असलेली प्राची मानसशास्त्रात सुवर्णपदक विजेती आहेच, शिवाय सूक्ष्मजीवशास्त्राची तज्ज्ञ आणि पर्यावरणाची अभ्यासक आहे.)
 

Web Title: Selfie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.