7 गावं बदलली तेव्हा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2017 06:12 PM2017-07-28T18:12:59+5:302017-07-28T18:37:39+5:30
लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ गावचा मी. बारावीनंतर डीएड करावं की इंजिनिअरिंग या दुविधेत गाव सोडलं. आणि मग शहरं, गावं
- नागनाथ गुंडप्पा तोंडारे
लातूर जिल्ह्यातल्या शिरुर अनंतपाळ गावचा मी.
बारावीनंतर डीएड करावं की इंजिनिअरिंग
या दुविधेत गाव सोडलं.
आणि मग शहरं, गावं
मागे सोडून
यशाच्या वाटेवर पुढे निघालो.
सोबत होती फक्त मेहनत.
- नागनाथ गुंडप्पा तोंडारे
शिरु र अनंतपाळ हे माझ्या गावाचं नाव. जि. लातूर.
घरणी नदीच्या काठावर वसलेलं जवळपास १५००० लोकवस्तीचं हे गाव. अलीकडेच या गावातही ग्रामपंचायत जाऊन नगरपंचायत आली आहे. माझं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण या गावातच झालं. दहावीनंतर शिक्षणासाठी लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची प्रबळ इच्छा होती, परंतु आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे बारावीपर्यंत गावच्याच श्री. अनंतपाळ नूतन कनिष्ठ महाविद्यालयात शिकलो. बारावीला कॉलेजात दुसरा आलो. एमएच सीईटीही चांगल्या मार्कानं पार पडली.
आता मात्र पुढील शिक्षणासाठी गाव सोडणं भाग होतं. डी.एड., अभियांत्रिकी, बी.एस्सी. असे सगळेच फॉर्म भरले. माझे बरेच चुलतभाऊ प्राथमिक शिक्षक आहेत. साहजिकच माझा ओढा डी.एड. करून शिक्षक होण्याकडे होता. अभियांत्रिकीची प्रवेशप्रक्रि या साधारणत: जुलै-आॅगस्टमध्ये असते. डी.एड.ची प्रवेशप्रक्रि या साधारणत: सप्टेबर-आॅक्टोबरमध्ये असते. अभियांत्रिकीची प्रवेश यादी डी.एड.च्या प्रवेश यादीच्या आधी लागली. माझा नंबर लातूर येथील एम. एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये विद्युत अभियांत्रिकी शाखेला लागला.
परंतु, पुढील शिक्षणाच्या खर्चाचा विचार करता अभियांत्रिकीला प्रवेश घ्यावा की डी.एड.ला असा मोठा प्रश्न होता. शेवटी मनाची तयारी केली आणि ठरवलं अभियांत्रिकीलाच जायचं. उच्च शिक्षणासाठी केलेलं हे माझं पहिलं स्थलांतर. ग्रामीण भागातून प्रथमच शहरात आल्यामुळे सुरुवातीला थोडं अवघडल्यासारखं व्हायचं. एक दोन महिने उलटल्यानंतर हळूहळू कॉलेजातही ओळखी झाल्या. मित्र मिळाले. त्यानंतर कॉलेज व हॉस्टेलच्या वातावरणाशी इतका एकरूप झालो की अभियांत्रिकीची चार वर्षे कशी गेली ते कळलंच नाही.
दरम्यान, अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षाला असताना अतिशय प्रतिष्ठेची असणारी गेट परीक्षा उत्तीर्ण झालो. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेमध्ये द्वितीय क्र मांकही मिळविला.
अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेट परीक्षेचे क्लासेस हैदराबाद येथे करण्याची प्रबळ इच्छा होती. परंतु माझ्या या निर्णयाला बºयाच जणांचा विरोध होता. त्यांचा विरोध असणं स्वाभाविक होतं, कारण मी गेट परीक्षा पूर्वी एकदा उत्तीर्ण झालो होतो. आर्थिक चणचण होतीच. परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होतो. शेवटी क्लास लावायचा म्हणून हैदराबादला गेलो. योगायोगाने माझ्या ओळखीतले अनिल साठे साहेब यांच्याकडे राहण्याची सोय झाली. त्यामुळे खर्चात बरीच बचत झाली.
लातूर ते हैदराबाद हे माझं दुसरं स्थलांतर. हैदराबाद येथे असताना तेलुगु शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण तेलुगु बोलणं जमलंच नाही. गर्दीमध्ये एखादा माणूस मराठी बोलताना दिसला की खूप हायसं वाटायचं. त्याची आपुलकीने चौकशी करायचो.
हैदराबाद येथील क्लासेस संपल्यानंतर इस्लामपूर (जि. सांगली) येथील मानाजीराजे भोसले अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजूू झालो. हैदराबाद ते इस्लामपूर हे आता तिसरं स्थलांतर. प्राध्यापक म्हणून काम करत असताना पहिली सरकारी नोकरीची आॅर्डर आली. आॅर्डर पाहून गगनात आनंद मावेनासा झाला. माझी सांगोला (जि. सोलापूर) नगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदावर नियुक्ती झाली. इस्लामपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन सांगोला नगरपालिकेत कनिष्ठ अभियंता या पदावर रु जू झालो.
इस्लामपूर ते सांगोला हे माझं चौथे स्थलांतर. रुजू झालो. पण माझा सांगोला येथे पहिला पगार होण्याच्या आधीच म्हणजेच अवघ्या पंचवीस दिवसांत माझी महावितरणमध्ये सहायक अभियंतापदी निवड झाली.
सांगोला नगरपालिकेतील कनिष्ठ अभियंता पदाचा राजीनामा देऊन मी किल्ले धारु र (जि. बीड) येथे सहायक अभियंता म्हणून महावितरणमध्ये रु जू झालो. सांगोला ते किल्ले धारुर हे माझ्यासाठी पाचवं स्थंलातर. किल्ले धारुर तालुका ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. इथं काम करताना लोकांच्या विजेच्या बाबतीत समस्या तसेच अधिकारी लोकांच्या समोरील आव्हानं अतिशय जवळून अनुभवयास आले. महावितरणमध्ये असताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरूच होती.
मेहनत मनापासून करत होतो. माझ्या या मेहनतीला फळ आले आणि मी एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून पाचव्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो. त्यामुळे माझी निवड महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहायक अभियंता (राजपत्रित अधिकारी) या पदावर झाली.
महावितरण, किल्ले धारुर येथील सहायक अभियंता पदाचा राजीनामा देऊन मी विदर्भ जलविद्युत व उपसासिंचन विभाग, नागपूर येथे सहायक अभियंता या पदावर रुजू झालो. किल्ले धारु र ते नागपूर हे सहावं स्थलांतर. कामाला सुरुवात केली. नागपूर शहरात मन रमत होतं तेवढ्यात माझी बदली मराठवाडा व विदर्भाच्या सीमेवर असलेल्या वाशिम शहरात झाली. माझ्यासाठी हे सातवं स्थलांतर. सध्या मी विदर्भ जलविद्युत व उपसासिंचन उपविभाग, वाशिम येथे कार्यरत आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच आहे. करिअरच्या या वाटेवर अजून स्थलांतर वाट्याला येतील हे नक्की, पण त्यातून शिकतोय. नवं जग पाहतोय..