शाहिरीचा वारसा..

By Admin | Published: November 3, 2016 06:12 PM2016-11-03T18:12:15+5:302016-11-03T18:12:15+5:30

आईवडिलांकडून मिळालेला शाहिरीचा वारसा जपणारा एक लोककलावंत

Shahiri's legacy .. | शाहिरीचा वारसा..

शाहिरीचा वारसा..

googlenewsNext
>- प्रवीण दाभोळकर
 
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसोबतच लाल बावटा मोर्चा, गोवा-पोर्तुगीज आंदोलनाचा ‘आवाज’ असलेल्या शाहीर अमर शेखांचं जन्मशताब्दी वर्ष २० आॅक्टोबरपासून सुरू झालं. शाहिरांची कर्मभूमी संपूर्ण महाराष्ट्र असली, तरी तारुण्याचा बराच काळ ते मुंबईतल्या सातरस्ता भागात राहत होते. शाहिरांची आठवण या मार्गावर आपल्याला घेऊन जाते आणि तिथं अमर शेखांच्या शाहिरीचा वारसा जपणाऱ्या निशांत जैनू शेखच्या कुटुंबाची भेट होते. 
महालक्ष्मी रेल्वेस्थानकापासून जवळच्या अंतरावर सातरस्ता येथे हाजी कसम चाळीत शाहीर अमर शेखांचं घर आहे. हा मार्ग शाहीर अमर शेख नावानंच ओळखला जातो. इथं शाहिरीचा वारसा सांगणारा, जपणारा निशांत शेख आपली आई केशर जैनू शेख आणि पत्नीसोबत राहतो. दहा बाय दहाच्या खोलीत शिरल्यावर समोरच शाहीर अमर शेख, शाहीर जैनू शेख यांची प्रतिमा, शिवाजी महाराजांचा फोटो, एका बाजूला शाहीर अमर कलापथकाला मिळालेली सन्मानचिन्हं, समोरच्या बाजूस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हे सारं एका नजरेत दिसतंच. या छोट्याशा खोलीत संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या, शाहीर अमर शेखांच्या असंख्य आठवणींचा खजिना आहे. भारदस्त आवाजाचा ठेवा लाभलेला निशांत जैनू शेख हा तरुण शाहीर अतिशय कठीण परिस्थितीतही अमर शेखांच्या शाहिरीचा वारसा पुढे नेत आहे. शाहिरी हाच त्याच्या पोटापाण्याचा व्यवसाय आहे. त्याच्या प्रत्येक गीत/पोवाड्याची सुरुवात ही शाहिरांच्या स्मरणानंच होते. अमर शेख, अण्णा भाऊ साठे, द. गा. गव्हाणकर हे निशांतचे प्रेरणास्थान. निशांतची आई केशर जैनू शेख आणि वडील जैनू शेख हे अमर शेखांच्या याच कलापथकातले. शाहिरांच्या मृत्यूनंतर, ‘शाहीर अमर कलापथका’ची स्थापना त्याच्या आई-वडिलांनी केली. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच शाहिरीचं बाळकडू निशांतला मिळालं. ‘एके रात्री सह्याद्री हसला...’ हा शिवरायांचा पोवाडा आईनं निशांतला शिकवलेला पहिला पोवाडा. ‘संयुक्त महाराष्ट्र उगवतोय, माज्या सरकारा खुशाल कोंबडं झाकून धरा’, ‘माझी मैना गावाकडं राहिली...’ या अण्णा भाऊ साठेंच्या शब्दांना आपल्या खास शैलीत शाहीर अमर शेखांनी अजरामर केलं. ती गीतं गात निशांत आईवडिलांसोबत संपूर्ण महाराष्ट्रभर शाहिरीचे कार्यक्रम करीत असे. मात्र काही वर्षांपूर्वी वडील शाहीर जैनू शेख यांचं निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर संसाराची आणि पर्यायाने कलापथकाची जबाबदारी निशांतकडे आली. सध्या अमर कलापथकात निशांतसोबत दहा सहकारी आहेत. कलापथकाला कार्यक्रम आले तरी मानधन तुटपुंजं. त्यात सहकलाकार टिकवणंही मुश्कील. एका बाजूने शाहिरीचा वारसा जपताना, दुसऱ्या बाजूस वाढती महागाई, आर्थिक चणचण यामुळे ‘शाहीर अमर कलापथक’ बंद करण्याची वेळ निशांतवर आली. अमर शेख यांच्या शाहिरीचा वारसा जपणारी निशांतची ही शेवटची पिढी आहे. निशांतची आई अमर शेख यांच्या कलापथकातील हयात असलेल्या एकमेव साक्षीदार. वयाच्या चौऱ्यांशीव्या वर्षी शाहीर अमर शेखांच्या कलापथकात गायलेली गीते/पोवाडे केशर जैनू शेख यांच्या तोंडी असतात. निशांत सांगतो, अजूनही शाहिरांचं काम संपलेलं नाही. आता खऱ्या अर्थाने समाजाला शाहिरांची गरज आहे. आपला कामधंदा, व्यवसाय सांभाळून तरुणांनी शाहिरीकडे यायला हवं. अर्थात चित्रपट, नाटकांच्या तुलनेत शाहिरीकडे शासनाचं दुर्लक्ष होत आहे. शासनानं प्रोत्साहन दिलं तरच शाहिरी, कलाकार टिकून राहतील. शाहीर, लोककलाकारांचा वारसा चालविणारे कलावंत उपेक्षित राहिले, तर रस्त्यांना दिलेली नावे हीच त्यांची एकमेव ओळख राहील, ही खंत वाटत राहते. 
 (लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)

Web Title: Shahiri's legacy ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.