शाहरुख म्हणाला, ... इथे धड कीसही नाही जमला मला!!
By admin | Published: April 5, 2017 06:39 PM2017-04-05T18:39:25+5:302017-04-05T18:39:25+5:30
शाहरूखने यश-अपयश-संघर्ष आणि कष्ट या विषयावर स्वत:चे अनुभव सांगणारं फार सुंदर भाषण केलं होतं... शाहरुख जे जे म्हणाला त्याचं हे संकलन :
Next
>अमेरिकेतल्या येल या जगप्रसिध्द विद्यापीठाने शाहरूख खानला अतिशय प्रतिष्ठेच्या चब फेलोशीपने सन्मानित केलं. या फेलोशीपचा गौरव मिळालेला तो पहिला बॉलीवूड स्टार! हा सन्मान स्वीकारताना येलचे विध्यार्थी आणि प्राध्यापकांसमोर शाहरूखने यश-अपयश-संघर्ष आणि कष्ट या विषयावर स्वत:चे अनुभव सांगणारं फार सुंदर भाषण केलं होतं... शाहरुख जे जे म्हणाला त्याचं हे संकलन :
.............................
‘येल’ सोबतच्या माझ्या आठवणी पाच वर्षांपूर्वीच्या काळाशी जोडल्या आहेत. डिसेंबर महिना होता. भर कडाक्याच्या थंडीत माझ्या अत्यंत देखण्या बॉलीवूड प्रेयसीला मी माझं प्रेम गाणं गात मनवायचं होतं नि प्रत्यक्षात काही वेगळंच घडत होतं... ‘कभी अलविदा ना कहना’च्या शूटिंगच्या वेळची गोष्ट आहे ही... माझं तोंड मरणाचं गारठून गेलं... मरणाचं म्हणतोय कारण तिचा किस करण्यासाठी तिच्यात नि माझ्यात इंचभर अंतर होतं... तोंडात शब्द, कभी अलविदा ... ना... आणि माझा जबडा हा असा कुलूप घातल्यासारखा झालेला. आता येलच्या दुसऱ्या भेटीत या सुंदर परिसरात तुम्हा सगळ्यांशी संवाद करताना हे असं काहीतरी होणं म्हणजे नामुष्कीची वेळ. तुमच्याशी बोलताना सिनेमांच्या विषयावर फार रेंगाळायला नको असं मला सांगण्यात आलंय. मी इथं प्रेरणादायी असं काही बोलण्यासाठी आलोय. इथून जाताना तुम्हाला सोबत काहीतरी नेता यावं असं काही मी बोलावं, असं म्हणतोय. बघूया, कसं जमतं ते! खरं सांगायचं तर या अटींमुळं मी जरा काळजीत पडलोय...‘परफॉर्मन्स अॅन्झायटी’ म्हणा ना! दिड हजारावर संख्येनं तुम्ही सगळे जमलाहात, माझ्यासारख्या सेक्सी, हव्याहव्याशा वाटणाऱ्या माणसाकडून चार शहाणपणाचे शब्द ऐकायला... ? येलच्या याच परिसरात कडाक्याच्या थंडीमुळं ज्या माणसाला त्याच्याबरोबरच्या एका मुलीला धड किससुद्धा करता आलं नाही, तो काय सांगणार म्हणा तुम्हाला? पण एक सांगतो, मी सेक्सी आहे, गळ्यातला ताईत व्हावा असाही, पण ‘मी’ नाही तर ‘तुम्ही’ इथं आहात, या युनिवर्सिटीत आहात याहून अधिक प्रेरणादायी गोष्ट मी तुम्हाला काय देणार? मी गुगलवर हा येडपट वाटेलसा विनोद वाचला- मरणाच्या दारात असणारा एक माणूस ... श्वासांसाठी धडपडणारा... त्यानं शेजारी उभ्या असणार्या धर्मगुरूकडे हाताच्या खुणेनं कसाबसा एक कागदाचा तुकडा मागितला. खूप कष्टानं त्यानं त्यावर काही खरडलं. तो कागद धर्मगुरूकडे सोपवत त्यानं प्राण सोडले. धर्मगुरूनं तो कागद आपल्या खिशात ठेवला आणि शेवटच्या विधींपर्यंत तो याविषयी विसरूनच गेला. शेवटच्या टप्प्यावर अचानकच त्याला मरणाच्या दारातल्या त्या माणसाचे खरडलेले शेवटचे शब्द आठवले. शेवटच्या निरोपासाठी जमलेल्यांना उद्देशून धर्मगुरूनं ते अखेरचे प्रेरणादायी निरोपाचे शब्द लिहिलेली बारकीशी कागदाची घडी उलगडली, त्यावर लिहिलं होतं, ‘‘मूर्खा, अरे, तू माझ्या आॅक्सिजन सिलेंडरच्या ट्यूबवर उभा आहेस!’’ तर आज मी त्या धर्मोपदेशकासारखा वागणार नाहीये. उलट माझ्याआयुष्यातले काही साधेसे अनुभव सोपेपणानं तुम्हाला सांगणार आहे. त्यानं कदाचित तुम्हाला नवी ऊर्जा मिळणारही नाही, पण जगण्यातून तगून जायला मदत होईल. आणि जर तुम्ही तसे तगलात... आनंदानं... तर सर्जनशीलता आणि यश आपोआपच येत राहील. तसं न होण्याचीही शक्यता आहे, तरी तुम्हाला जगावं तर लागेलच. माझ्या शब्दांनी तुम्हाला एक दृष्टीकोन मिळावा अशी मला आशा आहे... या दृष्टीकोनामुळं तुम्ही जगाला सांगू शकाल, अरे यार, तू माझ्या आॅक्सिजन सिलेंडरवर उभा आहेस... बाजूला हो, मला श्वास घेऊ दे! प्रवास सर्वसाधारणपणे दोन, तीन गोष्टींनी उलगडला जाऊ शकतो... वय, काळ, काही विशिष्ट थांबे म्हणजेच डेस्टिनेशन्स. मात्र या सर्वसाधारण टप्प्यांना धरून माझा जगण्याचा प्रवास उलगडणं माझ्यासाठी कठीणंय असं वाटतं कारण काळ या संकल्पनेनं मला चकवा दिलाय. माझ्या वडिलांच्या मृत्यूचा दिवस माझ्या संबंध बालपणाला पुरून उरला आहे. माझं पहिलंवहिलं यश जेमतेम तासाभराइतकं क्षणभंगुर आहे हे कळल्याचा दिवस! आजही नवल वाटतं, कुठं गेलं ते... विशिष्ट काळचक्र , रहाटगाडगं... त्यांनंही हरवलं मला. सूर्योदय होईतो अंधारात मी काम करत असतो. ज्यावेळी माझ्या भवतालचं जग कामाला लागलेलं असतं अशा लख्ख दिवसा मी बहुतांशी वेळा झोपलेला असतो. माझे मित्र मला घुबड म्हणतात. मला मात्र स्वत:ला बॅटमॅन म्हणायला आवडतं. अंधाराचा राजा! वय हा तर विषयच नाही माझ्याबाबतीत. माझं मलाही ते ठरवता येत नाही, मी ४५ चा की १५ चा? माझ्यापेक्षा तिपटीनं लहान असणाऱ्या मुली, ज्यांनी खरंतर मला काका म्हणायचं, त्यांच्यासोबत जर माझी प्रणयदृश्यं चालली असतील तर खरंच माझं वय किती? ‘रा वन’ या माझ्या फिल्ममधली पात्रं साकारताना मला खूप मजा आली, या फिल्मवर जी टीका झाली त्यानं मला काही फरक पडला नाही. जे जे साध्य झालं त्याबद्दल मला आधी काहीच ठाऊक नव्हतं. माझ्या स्वप्नांच्या दिशेनं मी चाललो, धावलो. रस्त्यावरून चालता चालता गोष्टी बदलतात, माणसं बदलतात, मी बदलत असतो, जग बदलतं... इतकंच काय, माझी स्वप्नंही बदलतात. कुठं उतरायचं आहे याची माझी जागा निश्चित नाही. जे आहे ते शक्य तितकं चांगलं कसं करायचं हे मी ठरवतो फक्त. कदाचित मी घट्ट पँट घालून नि गळ्याभोवती केप गुंडाळून जराजर्जर अवस्थेत व्हीलचेअरवर बसलेला नि स्वत:ला जगापेक्षा वेगळं काही पाहिलेला-भोगलेला माणूस समजण्याचीही शक्यता आहेच, पण हो, त्यावेळीही एक तरतरीत तरूणी माझ्या मिठीत असेल! तर, मी तुम्हाला माझी गोष्ट सांगेन, पण माझ्या पद्धतीनं. मानमरातब, यश, रंगवलेले केस या पलीकडचा ऐवज माझ्या अनुभवातून सांगेन.. जगण्यातून किंमत सोसून कमावलेला अनुभव हेच माझ्याजगण्याचं परिमाण. त्यातून काही घेता आलं तर ठीकाय, नाहीतर काय... नुकतंच हिट झालेलं माझं गाणं लावावं, नाचावं, प्यावं आणि येलच्या गारठ्यात पुन्हा एकदा किसिंगची प्रॅक्टिस करावी...