निराशा झटकून जगायला लागा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 07:52 AM2020-12-24T07:52:38+5:302020-12-24T07:55:02+5:30
पुस्तकी शिक्षणापलीकडेही लाइफ स्किल्स तुमच्याकडे आहेत का?
-डॉ. शैलेश घोडके
अलीकडेच आप्तेष्ट भेटले. चर्चेत विषय निघाला २४ वर्षीय रोहनचा. त्याला आलेल्या नैराश्याचा. कोविडकाळातील नोकरकपातीत त्याची नोकर गेली. मागील सहा महिने नोकरी न मिळाल्याने तो निराश होता. घराबाहेर न पडणं, बाहेरील लोकांशी संभाषण टाळणं असं तो करू लागला. ते ऐकून रोहनसारखेच अजून काही जण मला आठवले. निराश. रिकाम्या हातानं घरी बसलेले. सध्या तर ताण आहेच. एरव्हीही आव्हानं व अडथळ्यांना प्रत्येकाला सामोरं जावं लागतं. यश-अपयश, चढ-उतार येतातच. पण, त्याच्याशी दोन हात करताना जीवन कौशल्यं सोबत हवीत. लाइफ स्किल्स. ती असतील तर आपण अवघड वाटही सहज पार करू शकतो.
ही लाइफ स्किल्स कोणती? ती कशी शिकणार?
१. जिज्ञासा (Inquisitiveness)
लहान मुलांत ही जिज्ञासा मोठी दिसते, त्यातून ते अनेक गोष्टी स्वत: शिकतात. परंतु, दुर्दैवाने लहानपण सरतं, आपण मोठे होतो आणि जिज्ञासू वृत्ती कमी होते. जिज्ञासेपोटी एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी वेळ न देणं, प्रश्न विचारण्याची भीती वाटणं या निरर्थक बाबी जिज्ञासा संपवून टाकतात. आपण शोध घेणं थांबवलं नाही तर अनेक नव्या गोष्टी नव्यानं दिसू शकतात.
२. सतर्कता (Alertness /Mindfulness)
आपण आपल्या दिनचर्येत किंवा स्वतःच्या विचारात एवढे मग्न असतो आणि आता यापुढे कोणतं काम संपवायचं आहे, या मन:स्थितीत असतो की, सद्यस्थितीत असलेल्या कामांकडे दुर्लक्ष होते. यामुळे महत्त्वाची कामे मागे पडतात. सतर्कता अंगी बाळगल्यास स्वतः आणि सभोवतालची परिस्थिती यांची सांगड घालून हातातील कामं अधिक कार्यक्षमपणे पूर्णत्वास नेता येतात.
३. संभाषण (communication skill)
सध्याच्या डिजिटल जगात बराचसं संभाषण टेक्स्ट फॉरमॅटमध्ये होतं. त्यामुळे प्रत्येकानं लेखनकौशल्य शिकून घेतलं पाहिजे. आपण बऱ्याच वेळा पाहतो की, यशस्वी मंडळी नेहमीच लिखित आणि मौखिक संभाषणात निपुण असतात. हे कौशल्य आपल्याकडे नसेल तर आपली माहिती अन् विचार योग्यप्रमाणे इतरांपर्यंत पोहोचत नाहीत आणि वैयक्तिक व व्यावहारिक जीवनात अडचणींना आमंत्रण देतात.
४. लवचिकता (Flexibility)
बऱ्याच लोकांचा ‘‘मोडेन, पण वाकणार नाही’’ असा बाणा असतो. पण स्वभाव, काम करण्याची पद्धत, विचारांची पद्धत, नव्या गोष्टी स्वीकारणं यासाठी आपण तयार असावं.
५. सहकार्य (collaboration/cooperation)
टीम म्हणून काम करावं लागतं. परस्पर सहकार्याने काम केलं तर आपली परिणामकारकता व उत्पादकता वाढते. वैयक्तिक आयुष्यातसुद्धा हे धोरण ठेवलं तर नाती सांभाळता येतात.
(लेखक अभियांत्रिकी महाविद्यालयात विभागप्रमुख आहेत)
saghodke@gmail.com