शेगाव ते अमरावती...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 06:39 PM2017-11-08T18:39:06+5:302017-11-09T11:03:44+5:30

या छोट्या प्रवासानं मला शहर दाखवलं, स्मार्ट जगणं दाखवलं आणि आत्मविश्वासही दिला..

Shegaon to Amravati ... | शेगाव ते अमरावती...

शेगाव ते अमरावती...

googlenewsNext

- चैताली महेंद्र आसोलकार,  शेगाव

शेगाव. संत श्री गजानन महाराज यांच्या वास्तव्यानं पावन झालेलं बुलडाणा जिल्ह्यातलं एक गाव. माझं माध्यमिक शिक्षण इथंच झालं. दहावी पास झाले; पण माझं ठरेचना की पुढं काय? एवढं नक्की माहिती होतं की इंजिनिअरिंग नाहीच करायचं, मग बीसीए या नवीन कोर्सबद्दल माहिती मिळत गेली, अकोला कॉलेजचा विचार झाला. आणि लांब जातेच आहे तर मग अमरावतीलाच का नको म्हणून अमरावतीच्या चांगल्या कॉलेजला बीसीएला अ‍ॅडमिशन झाली.
पहिल्यांदा रेल्वेने अमरावती गाठलं. अडीच तासाचा प्रवाससुद्धा इतका लांबचा वाटला होता तेव्हा ! नंतर हळूहळू सवय होत गेली त्या प्रवासाची. रेल्वे मधल्या लेडिज बोगीमध्ये बायकांची गर्दी. मुंबईवरून गाठोडे भरून माल आणायच्या काहीजणी विक्रीसाठी. तेव्हा जाणवलं की या रेल्वेसारखंच आयुष्य पुढे नेण्यासाठी आपल्यासारख्या अनेकजणी झगडत आहेत. नंतरचे तीन वर्ष प्रत्येक वेळी शेगाव - अमरावती रेल्वे प्रवास काही ना काही शिकवूनच गेला.
हॉस्टेल लाइफ छान असतं हे माहिती होतं; पण अनुभव घेतला तेव्हा कळलं काय मजा आहे होस्टेलची. खूप अभ्यास, मोठं कॉलेज याबरोबरच आणखी एक भन्नाट गोष्ट होती, ती म्हणजे - माझ्या रूम पार्टनर ! शाळेतली एका बाकावरच्या मैत्रीची व्याख्याच बदलून टाकली या मैत्रीनं. आमची मैत्री घट्ट होत गेली. गावाकडे कधीही न पाहिलेले मोठाले मॉल फिरणं, मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघणं या सगळ्या नवीन गोष्टींबरोबर कॉलेजमध्ये पण नवीन नवीन अनुभव येत गेले.
स्वावलंबन काय असतं हे तिथं राहून कळलं. स्वत:ची सगळी कामं स्वत: करणं, घरून सोबत आणलेलं पैशांचं बजेट सांभाळलं जावं म्हणून आॅटोऐवजी सिटी बस निवडणं असं बरंच काही व्यवहार म्हणून याच काळात शिकले. चुकत माकत, बरेवाईट अनुभव घेत मी माणसं ओळखायला शिकले. सगळीच भेटणारी हितचिंतक नसतात आणि विश्वास ठेवू नये असंही कुणी नसतं, यातला फरक समजायला लागला. बीसीएनंतर एम.एस्सीपण अमरावती विद्यापीठातूनच केलं.
शहरात राहणारे स्मार्ट लोक, आपल्या साध्या राहणीमानाला ‘अडाणी’ गृहीत धरून चालतात असे अनुभव आले. पण सगळ्यावर मात करत प्रत्येकजण आपली आपली वाट शोधतोच. मीही शोधली. या शहरानं मला आत्मविश्वास दिला. माझा अमरावतीचा प्रवास खूप सुंदर होता. त्यानं जगणंच शिकवलं.

मुंबईकर झालो..
- हरगोविंद मुक्कावार
मुंबई. मायावी शहर, गगनचुंबी इमारती. धावतं जीवन. जो तो धडपडतोय स्वप्नांचा पाठलाग करत. अशा या शहरात मी जवळपास १९८७-८८ साली दाखल झालो अन् सोडलं माझं गाव, धर्माबाद. नांदेड जिल्ह्यातल्या तालुक्याचं ठिकाण.
एक सतरंजी आणि ३०० रुपये (जे की त्याकाळी खूप वाटायचे) घेऊन मी मुंबईच्या रस्त्यावर नुसता फिरत होतो... धावत्या गाड्या. मोठ्या इमारती. आलिशान बंगले हे सगळंच पाहून मी भारावलो होतो. आणि हे सगळं आपल्याकडेपण असावं असं वाटू लागलं. मग काय मिळेल तसं काम करायचं. रस्त्यावरचं खायचं. फुटपाथवर झोपायचो आणि भावी आयुष्याचे शहरी स्वप्न रंगवायचो. अगदी नुसता वडा-पाव खाऊन दिवस मी रस्त्यावर काढत होतो, आणि थोडे थोडे पैसे जमा करायचो.
मुंबईच्या बाजारपेठेत कापड, चादरी विकल्या. बºयाच कंपनीत मिळेल ते काम करत गेलो. त्यातून शिकत, वाढत जाऊ लागलो. दिवसेंदिवस. सगळ्या प्रकारचा अनुभव माझ्याकडे आला होता. तो मी आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याटप्प्यावर वापरत गेलो.
या सर्व प्रवासात वाईट माणसांबरोबर चांगल्या व्यक्तीही भेटल्या. मी माझा संपर्क क्षेत्र वाढवत गेलो. वाट्याला आलेले अनुभव जगवतात तर वाईट अनुभव जगवायला शिकवतात. या प्रवासात माझ्या पत्नीनेही साथ दिली. तिने खासगी क्लासेसमध्ये मेहनतीनं नाव कमावलं आहे. या सर्व गोष्टींनी मला मुंबईकर बनवलं. आज मी इथलाच नागरिक म्हणून वास्तव्याला आहे.
अनेक नामांकित कंपनीत मी काम केलं. जी.एम.पदापर्यंत मी पोचलो. एवढेच नव्हे तर मार्केटिंग क्षेत्रात चीनपर्यंत मला मजल मारायला जमलंय. मोतीराम गंजेवार माझ्या गावचेच. मुंबईत स्थायिक झाले होते. त्यांनी चांगली साथ दिली. मार्गदर्शन केलं. आज मी जो काही बनलेला आहे ते फक्त त्याच्यामुळेच. सध्या मी नोकरी सोडून स्वत:चा बिझनेस सुरू केलाय. या मुंबईने बºयाच लोकांची स्वप्न पूर्ण केली. कष्ट करण्याची तयारी अर्थात हवीच.
ती असली तर मुंबई जगवते..

- डोबिंवली (मूळगाव धर्माबाद, जि.नांदेड)

Web Title: Shegaon to Amravati ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.