एका चमचमत्या दुनियेत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 01:33 PM2017-08-10T13:33:25+5:302017-08-10T13:33:30+5:30

भर बाजारातली एक निमुळती गल्ली. तिच्या टोकाला असलेली ही ‘मॅजिक वर्ल्ड - फॅन्सी शॉपी’. किमान दहातरी गिऱ्हाईकं असावीत इथे आत्ता

In a shining world .. | एका चमचमत्या दुनियेत..

एका चमचमत्या दुनियेत..

Next

- प्रसाद सांडभोर  

भर बाजारातली एक निमुळती गल्ली. तिच्या टोकाला असलेली ही ‘मॅजिक वर्ल्ड - फॅन्सी शॉपी’. किमान दहातरी गिऱ्हाईकं असावीत इथे आत्ता. ‘अहो, याला मॅचिंग किनार आहे का?’, ‘वो चमचमवाला रिबन आता है, वो है आपके पास?’, ‘मला गोल आरसे हवेत.. छोटे.’ काचेच्या टेबलामागे उभ्या दुकानदारबाई प्रत्येकाची मागणी पूर्ण करताहेत. पाहावं तिकडं काचेच्या दारांची कपाटं आहेत. त्यात पारदर्शक डब्या-पेट्यांमध्ये कसकसल्या नग-वस्तू भरून ठेवल्यात. दुकानदारबाई कुणालाच ‘नाही’ म्हणत नाहीयेत. ‘हा अगदी अस्साच पिवळा नाहीये माझ्याकडे; पण थोडा फिका मिळेल, पाहणार?’

‘हिरव्यापेक्षा नारंगी छान दिसेल या कापडावर, देऊ?’ ‘बोला, काय हवं तुम्हाला?’ - आम्हाला विचारणा झालीय... ‘या कापडांना मॅच होतील अशी बटणं हवीयेत शर्टाची’ - कापडं दाखवत मित्र सांगतोय. ‘यावेळी आपण रेडिमेडऐवजी कपडे शिवून घ्यायचे का?’ - काल त्यानं असं विचारलं तिथून खरी सुरू झाली ही गोष्ट. मी ‘हो’ म्हणताच त्यानं गुगलवरून शर्टांची वेगवेगळी डिझाइन्स शोधून काढली. फुल स्लीव्ह - हाफ स्लीव्ह - कसा हवा शर्ट? रेग्युलर कॉलर - शॉर्ट कॉलर की मॅण्डरिन कॉलर? पाठीवर प्लीट्स मधोमध हव्यात की बाजूला? बाहेरून की आतून? मनगटावर कफ्स कसे हवेत? समोर बटणांचं प्लॅकेट कसं पाहिजे? खिसा हवा की नको? शर्टचं ‘हेम’ गोलाकार हवं की सरळ? असं करत करत डिझाइन्स फायनल झाल्या. कॉटन, टेरिलिन, लिनन की खादी असं पाहत कापडाची निवड झाली. मग रंग ठरले.. आणि आता बटणं!

दुकानदारबाई आमच्यासमोर एकेक चौकोनी डबी उघडून ठेवताहेत. बटणंच बटणं! वेगवेगळ्या रंगांची, आकारांची, व्यासाची; प्लॅस्टिकची, स्टीलची, कापडाची, नारळी-करवंटीची. काही दोन होल असलेली, काही चार. काही एका बाजूने खोलगट, काही दोन्ही बाजूंनी सपाट. केवढी ‘व्हरायटी’ म्हणायची ही! ‘बोला कोणती पसंत पडतायत?’ बाप रे! अजून एक निवडपरीक्षा! मी कधीचाच दमलोय; इतके पर्याय पाहून, इतके निर्णय घेऊन! माझा चेहरा पाहून मित्र हसतोय. ‘हे शेवटचं, यापुढचं सगळं काम टेलरबुवांचं!’
...हुश्श!
 

Web Title: In a shining world ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.