दादांची चड्डी !
By सचिन जवळकोटे | Published: May 28, 2018 12:00 AM2018-05-28T00:00:01+5:302018-05-28T00:00:01+5:30
सातारनामा
सचिन जवळकोटे
‘राजधानी’ म्हणून अवघ्या महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी प्रतिमा जपणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या चाललंय तरी काय? दाढी, मिशा, भुवया, कॉलर, विजार अन् नाडीचीच भाषा राजकीय नेत्यांच्या तोंडी सातत्यानं ऐकू येऊ लागलीय. अरेरेऽऽ हे सारं कमी पडलं की काय म्हणून चर्चा दादांच्या हाफ चड्डीपर्यंत येऊन पोहोचलीय. आता ही ‘हाफ चड्डी’ म्हणजे कोंडकेंच्या दादांची की चंद्रकांतदादांची, याचा मात्र शोध लागलेला नाही...
पण एक नक्की. ही चड्डी यंदाच्या लोकसभेला भलताच धुमाकूळ घालणार म्हणजे घालणारच...
थोरल्यांची मिशी... धाकट्यांची दाढी!
काही दिवसांपूर्वी साताºयाच्या थोरले राजेंनी विकासाबाबत बोलताना स्वत:च्या मिशीला हात लावला होता. ‘जर लोकांची कामं झाली नाहीत तर मी माझी मिशीच काय भुवयाही काढेन,’ असं मोठ्या रुबाबात त्यांनी सांगितलं होतं. (मात्र अलीकडं त्यांनी मिशीला छानशी कट मारल्यामुळं ते ‘भलतंच क्यूट’ दिसताहेत, ही बाब अलाहिदा.) त्यांच्या मिशीचा डॉयलॉग ऐकून कॉमन सातारकरांना काही नवल वाटलं नाही. (असल्या नव-नव्या संवादांची सवय झालीय बहुधा.) फक्त भुवया कशा काढायच्या असतात, त्याचं दुकान साताºयात आहे की बारामतीत, या किचकट प्रश्नाचा गुंता काही अनेकांच्या डोक्यातून अद्याप गेलेला नाही. असो.
एकीकडं जनतेसाठी थोरले राजे स्वत:च्या मिशाही काढायला तयार असताना दुसरीकडं याच जनतेसाठी धाकट्या राजेंनी चक्क आपली दाढी वाढविलीय. पालिका निवडणुकीनंतर ‘सुरुचि’वरची स्ट्रॅटेजी झपाट्यानं बदलली गेलीय. ‘आक्रमक अन् डॅशिंग’ नेत्याचा रोल वठवायचा असेल तर म्हणे अशा पिळदार मिशावाल्या दाढीची गरज होतीच, असा सल्ला बहुधा वहिनीसाहेबांनीच दिल्याची बाहेर कुजबूज. कदाचित सध्याच्या राजकारणात ‘दाढी’वाल्यांचीच जोरदार चलती असल्याचा साक्षात्कार नरेंद्रभाई, अमितभाई, रामदासभाऊ अन् महादेवअण्णांकडं बघून बाबाराजेंना झाला असावा. मात्र, असल्या ‘लकी दाढी’च्या गोष्टीवर पाटणचे विक्रमबाबा अन् खंडाळ्याचे भरगुडेबापू यांचा नक्कीच विश्वास बसला नसावा.
फलटणच्या राजेंची लाडकी विजार..
थोरले काका बारामतीकरांनी स्वत:ची कॉलर उडवून इतर नेत्यांचीही टोपी उडविली. त्यानंतर फलटणच्या राजेंनीही कॉलरची चर्चा थेट विजारीपर्यंत नेली. ‘नेत्याची कॉलर वर करायची की विजार खेचायची, ते जनताच ठरवेल,’ असं सांगून त्यांंनी नवाच बॉम्ब टाकला. मध्यंतरी माणच्या जयाभावबरोबर त्यांचा वाद रंगलेला असतानाही विजारच गाजलेली. मात्र, माणचा गडी भलताच तयारीत. लंगोट बांधून जयाभावनं मोगराळे घाटातून थेट फलटणच्या मातीत जाऊन शड्डू ठोकला. कोणत्या नेत्याला कोणती विजार आवडते, यात आम्हा पामराला पडायचं नाही. मात्र, या साºयांची ‘नाडी’ जनतेच्याच हाती, हे मात्र निश्चित.
लोकसभेला ऐनवेळी ‘सुरुचि’ची दाढी..
साताºयातील खोट्या मनोमिलनाचा फुगा फुटल्यानंतर पालिकेत धाकट्या राजेंना बरंच नुकसान सोसावं लागलं. मात्र, राजकीय पातळीवर त्यांना सध्या भलताच फायदा होऊ लागलाय. ‘डीसीसी’मधल्या मानाच्या खुर्चीवर बसवून बारामतीकरांनी त्यांना ताकद दिली. त्यानंतर प्रत्येक सोहळ्यात स्टेजवर बोलवून इतरांपेक्षा अधिक सन्मान देण्याची मोहीम पद्धतशीरपणे सुरू केली. धाकट्या ताई बारामतीकरांच्या ‘सेल्फी’तही धाकट्या दादांसोबत धाकटे राजेही चमकू लागले.
आता हे सारं उगीच गंमत म्हणून चाललं नाही. हे न ओळखण्याइतपत राजकीय तज्ज्ञ नक्कीच खुळे नसावेत. लोकसभेला कदाचित थोरल्या राजेंची मिशी कमळाच्या पाकळ्यांकडं झुकली तर हुकमी पर्याय म्हणून धाकट्या राजेंच्या दाढीचाच वापर करण्यासाठी बारामतीकर म्हणे जोरदार तयारीत. नाहीतरी एकाच घराण्यातील दोन बंधूंमध्ये लावून देण्याची त्यांची परंपरा तशी जुनीच म्हणा.
..पण या दाढी-मिशीच्या भांडणात एक मुद्दा राहिलाच. फलटणच्या विजारीचं काय? साताºयात ही विजार ढगळी होण्याची शक्यता असेल तर माढ्यात परफेक्ट मॅच व्हायला काय हरकत आहे? नाही तरी अकलूजच्या नव्या कोºया ‘धवल’ बर्म्युडासमोर चमकण्यासाठी म्हणे फलटणची जुनी जाणती विजारच हवी.
पृथ्वीबाबांच्या शर्टाला विलासकाकांची बटणं..
‘दादांच्या चड्डी अन् नाडीसारखीच माझी कॉलर लोकांच्या स्मरणात राहणार,’ असं साताºयाच्या थोरल्या राजेंनी सांगितलेलं. मात्र, प्रत्येक गोष्टीत दोन अर्थ काढण्याची सवय लागलेल्या पेठेतल्या सातारकरांसमोर संभ्रम निर्माण झाला नां. ‘राजेंनी नेमकं कोणाच्या चड्डीचं कौतुक केलं? कोंडके दादा की चंद्रकांत दादा?’ याचं उत्तर शोधण्यात अनेकजण व्यस्त. गेल्या साडेतीन वर्षांत चंद्रकांत दादांचे कºहाड-सातारी पट्ट्यातील दौरे ज्या झपाट्यानं वाढलेत, ते पाहता लोकसभा अन् विधानसभेला दादा काहीतरी चमत्कार घडविणार, याची सर्वांनाच कुणकुण लागलीय. त्यात पुन्हा कºहाडात पृथ्वीबाबांच्या शर्टाला विलासकाकांची बटणं अन् बाळासाहेबांच्या बाह््या (आजकाल ठिगळांच्या फॅशनचीच चलती..) लाभल्यानं अतुलबाबांच्या भगव्या जाकिटाला चमकविण्याचं दादांनी अधिकच मनावर घेतलंय. जिल्ह््यातली दीड-दोन डझन स्थानिक नेते मंडळी ‘इम्पोर्ट’ करून गावोगावी पोलिंग बुथ एजंटची फळी गुपचूपपणे उभी केली जाऊ लागलीय. ही सारी तयारी साताºयाच्या ‘कॉलर’साठीच असेल तर थोरल्या राजेंनी कौतुक केलेल्या ‘दादांच्या चड्डी’चा डॉयलॉग बारामतीकरांना गांभीर्यानं घ्यावा लागतोय की काय ?