शो-शा चमको....अशी चमकोगिरी वरवरचं कौतुक देते, पण त्यानं आपला प्रश्न सुटत नाही.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2017 02:00 AM2017-11-30T02:00:00+5:302017-11-30T02:00:00+5:30
आपण कसे भारी आहोत हेच अनेकजण इतरांना नुस्तं दाखवतात. काहीतरी सनसनाटी, भारी, वेगळं, जबरदस्त वाटेल असं वारंवार आणि वरवर सांगत सुटतात. म्हणजेच फ्लॅश करतात आपलं आभासी ‘स्टेटस’. त्यातून कौतुक मिळतं, लोकांनाही वाटतंही केवढं धडपडं पोर काय काय करतं. पण प्रत्यक्षात आपण काहीच करत नाही. फक्त ‘मिरवतो’. चमकोगिरी करतो. त्यानं आपली गुणवत्ता वाढत नाही, आयुष्य बदलत नाही हे कधी मान्य करणार?
प्राची पाठक
‘तुमची पहिली ओळख तुमचं प्रेझेंटेशन असतं..’
‘फर्स्ट इम्प्रेशन फार महत्त्वाचं...’
या सुविचार सदृश वाक्यांनी आपल्याला मोठं केलेलं असतं.
नीटनेटकं राहणं, शारीरिक स्वच्छता, नेमकं सादरीकरण, योग्य हालचाली, नीट बोलणं, प्रसंगावधान, वगैरे गोष्टी अर्थातच महत्त्वाच्या आहेत.
पण कधी कधी ज्या गोष्टीची तयारी करणं अपेक्षित आहे, ती सोडून किंवा कमी करून केवळ दिसणं, सादरीकरण यावरच जास्त भर दिला जातो. घागरीत पाणी आहे आणि मग ती प्रेझेण्टेबल करणं, ती घागर बाहेरून रंगवणं, नटवणं वेगळं. घागर रिकामीच/कमी भरलेली/हवी तितकी न भरलेली/ चक्क उपडीच ठेवलेली आहे आणि नुसतंच तिला सजवून सादरीकरण वेगळं असतं. हा फरक लक्षात यायच्या आतच आपल्याला अजून एक गोष्ट कळलेली असते की घागर भरली आहे की नाही, हे कळूच द्यायचं नाही. तिथवर जायचंच नाही. घागर भरायचेदेखील कष्ट विशेष घ्यायचे नाहीत. केवळ ती भरलेली आहे, असा आभास निर्माण करायचा. तो वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. या आभासानेच लोक इम्प्रेस होऊ लागतात. विशेष कष्ट न घेता आपली पत वाढते, घागर कष्टाने भरून जे कौतुक मिळेल, ते केवळ माझ्याकडे घागर आहे आणि ती भरलेली आहे/भरतोय/भरतेय, असं नुसतंच बोलून चालून, खुबीने मांडून इतरांना दाखवण्याची सवय लागते.
उदहाहणार्थ कोणतंही वाद्यं, नृत्य, गाणं शिकायची पहिली प्रेरणा काय असते आपली?
आठवून बघा. हे मी एक दिवस चार लोकांत सादर करणार. सगळे आपल्याला ऐकायला, पाहायला आलेले आहेत. आपण लै भारी सादर करतोय आणि सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे. सगळीकडून वाहवा, तुफान कौतुक मिळतेय असं मनात कुठंतरी येतंच ना? प्रेरणा म्हणून हे घ्यायला हरकत नसते. पण आपण वाद्य शिकण्यासाठी ती प्रेरणा न घेता त्या गोष्टीनं होणारं कौतुक, त्यातलं ग्लॅमर याबद्दलच खूश होऊ लागतो. अजून तर वाद्य हातातदेखील घेतलेलं नसतं. कोणीतरी ते वाद्य हातात घेऊन स्टाइल मारताना आपण पाहिलेले असते. केवळ स्टाइल मारण्यासाठीच त्याचं, तिचं किती कौतुक झालं ते आपल्या मनानं नोंदवून ठेवलेलं असतं. वाद्य शिकणं ही कला, ते कौशल्य काल वाद्य हातात घेतलं आणि आज एक्स्पर्ट झालो इतकी सोपी नाही ही प्रोसेस.
आपण हेच वाद्य का निवडलं याचा नीटसा विचार केला जात नाही. तेच पुढे शिकत राहायला आपल्याकडे काय काय ‘गिव्हन’ गोष्टी आहेत, त्याचा पुरेसा विचार नाही. शिकण्याच्या अनेक टप्प्यांमधून आपण जाऊ, कधी ते वाद्य मोडून फेकून द्यावंसं वाटेल, पण हवं तसं वाजवता येणार नाही. या सगळ्यांवर पुरेसा विचारच आपण करत नाही. कदाचित यापेक्षा दुसरं कुठलं वाद्य आपल्याला जास्त सूट होणारं असेल, तेही बघत नाही. लक्ष थेट एण्ड प्रॉडक्टवर! तिथं पोहोचल्यावर जे कौतुक होणार, ते वाद्य न शिकताच मस्त कपडे घालून, भारी लोकेशनला जाऊन केवळ वाद्य हातात घेऊन फोटो काढल्यानंदेखील बºयाच प्रमाणात मिळणार आहे. हे लक्षात आलं की शिकायचे प्रयत्न कमी जास्त होतात आणि केवळ दिखावा सुरू होतो. ते वाद्य हातात मिरवलं जातं.
त्यालाच मग इतर लोक भास मारणं असे हिणवू लागतात. मी अनेक वाद्यं बघितली. त्यातून हे निवडलं. ते कुठं शिकायचं त्याची माहिती काढली. कसं आणि कधी शिकणार, त्याचं वेळापत्रक आखलं. सरावासाठी वेळ काढला. अजून सहा महिन्यानं मी त्यात कुठवर प्रगती करू शकेल ते बघेन आणि मगच अजून पुढचे प्लॅन्स ठरवेन. स्वप्नं आखेन. टप्प्याटप्प्याने साधारण इतक्या काळानं मला हे वाद्य साधारण इतपत तरी आलंय का, याचा विचार करेन. तिथवर पोहोचलो नसेन, तर हेच सुरू ठेवायचे की वेगळा काही विचार करायचा, याचाही परत विचार करेन. अशा स्वरूपाच्या कोणत्याही टप्प्यांमधून, तयारीतून न जाता केवळ वाद्य हातात घेतलेला फोटोच आपल्याला या सगळ्या मेहनतीचं थोडे का होईना कौतुक मिळवून देणार असेल तर आज हे वाद्य, आज हे कौतुक. उद्या ते वाद्य, पुन्हा ते कौतुक, अशीच सवय लागू शकते. केवळ काहीतरी सनसनाटी, भारी, वेगळं, जबरदस्त वाटेल असं वारंवार आणि वरवर फ्लॅश करून आपलं ‘स्टेटस’ वाढतं, अशी भावना मिळत असेल, तर प्रत्यक्ष कष्ट कोण घेणार?
आपल्याकडे असणाºया आणि आपल्याला, इतरांना ‘भारीतल्या’ वाटणाºया गोष्टी आपण फ्लॅश करू लागतो. भाळणारे त्यानंही भाळतात. भुलणारे त्यालाही भुलतात. आपल्याला काहीतरी ‘स्टेटस’ मिळालं असं आपल्याला वाटतं. हेच स्टेटस अशाच वेगवेगळ्या सोप्या गोष्टी करून, बोलून आपण वाढवत राहतो. बोलता बोलता सहजच सुचवतो. ‘मला अमुक शिवाय काही चालतच नाही.’ म्हणजे मग समोरचा तुम्हाला अमुक स्टॅण्डर्डच्या त्याला भारी वाटणाºया गटात टाकणार. आपली पत, आपले स्टॅण्डर्ड सतत दुसºयाच्या नजरेतून आणि मान्यतेतून आपण मिळवत राहणार. कधी आईवडिलांच्या कर्तृत्वानं आपल्याला सहजच मिळालेल्या गोष्टी फ्लॅश करणार, कधी आपणच मिळवलेले थोडेसे काही खूप मोठे करणार, नाहीतर अशा ट्रिक्स वापरून आपण मोठं कोणीतरी झालोत, याचा आभास तयार करणार. आपल्याला लोकांची मान्यता या गोष्टींसाठी हवीये की आपल्या कामातून ती आपसुकच मिळेल, अशी तयारी करायची आहे, हे तर ठरवावं लागेलच ना!
मग आपलं भास मारणं कमी होईल आणि प्रत्यक्ष काम सुरू होईल.
विचारा स्वत:च्याच मनाला, आपण असे कुठे कुठे आणि कधी वागतो.
दिखावे पे ना जाओ..
आधीच कोणीतरी झालेल्या, असलेल्या लोकांच्या सोबत फोटो काढून घेणं, त्यांच्या पुढंमागं फिरणं, त्यांच्याशी जवळीक करत राहणं यानंसुद्धा समाजात आपली पत वाढते, असे अनुभव आपल्याला आलेले असतात. मग एखाद्या प्रसिद्ध खेळाडूसारखे पिचवर खेळायची, तयारी करायची गरजच उरत नाही. केवळ त्याच्यासोबत फोटो काढून घेतला, तरी आपणदेखील कोणीतरी भारी आहोत, आपली ‘पोहोच’ मोठी आहे, हा संदेश देता येतो, असं आपल्याला वाटते. पण त्यानं आपलं कर्तृत्व विशेष सिद्ध होत नसतं.