तेजस्विनी सावंत सांगतेय, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीची ‘फोकस्ड’ गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 07:00 AM2019-11-21T07:00:00+5:302019-11-21T07:00:01+5:30

20 वर्षाची तिची कारकीर्द. आंतरराष्ट्रीय स्पर्धा तिनं गाजवल्या; पण ऑलिम्पिकचं स्वप्न मात्र आजही हाका मारतं, त्यासाठी ती आता जोमाने तयारी करतेय.

shooter Tejaswini Sawant shares her journey for Olympics preparation. | तेजस्विनी सावंत सांगतेय, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीची ‘फोकस्ड’ गोष्ट.

तेजस्विनी सावंत सांगतेय, ऑलिम्पिकसाठीच्या तयारीची ‘फोकस्ड’ गोष्ट.

Next
ठळक मुद्दे प्रवास ऑलिम्पिकला ‘पात्र’ ठरेर्पयतचा आणि त्या पुढचाही कष्टांचा आणि सरावाचाही!

संतोष मिठारी

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धामध्ये ती जिंकत होती. अनेक पुरस्कारांनी सन्मानित होत होती. मात्र, तिचं स्वप्न असणार्‍या ऑलिम्पिकची संधी मात्र हुकत होती. एक-दोन नव्हे, तर चौदा वर्षे ती प्रयत्न करत राहिली. काहीही झालं तरी ऑलिम्पिक गाठायचंच असा निर्धार होता. अखेर दोहा इथं झालेल्या स्पर्धेत तिनं आपली ऑलिम्पिक ‘पात्रता’ सिद्ध केली आणि चौदा वर्षाचा वनवास यंदा संपवला. 
ती म्हणजे अर्थातच कोल्हापूरची ‘गोल्डन गर्ल’, आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत.
नेमबाजीत करिअरची 20 वर्षे पूर्ण करणार्‍या तेजस्विीनं आता ऑलिम्पिकचा ध्यास घेतला आहे.
ऑलिम्पिकच्या तयारीतून जरा वेळ काढत कोल्हापूरला चार दिवसांच्या सुटीवर आलेल्या तेजस्विनीशी ‘ऑक्सिजन’ने खास गप्पा मारल्या.
तिला विचारलंच की, 20 वर्षाची तुझी प्रदीर्घ कारकीर्द एकीकडे आणि आता ऑलिम्पिकला जाण्याची तयारी दुसरीकडे, अतीव परफेक्ट असलेल्या ऑलिम्पिकच्या या वारीची तयारी कशी करते आहेस?
ती सांगते, ‘ऑलिम्पिक हे एक चार वर्षाचं चक्र (सायकल) असतं. कोणत्याही क्रीडाप्रकारातील खेळाडू असू दे, एक ऑलिम्पिक झालं की, तो पुन्हा पुढच्या ऑलिम्पिकची तयारी शून्यपासून करतो. त्याला मीदेखील अपवाद नाही.  त्यामुळे  साहजिकच टोकियो ऑलिम्पिकची तयारी मी 2016 पासूनच सुरू केली होती.प्रशिक्षक कुहेली गांगुली यांच्या मार्गदर्शनाखाली मी रणनीती ठरवली. काही चढउतार होव्ऊ शकतात, म्हणून आम्ही शॉर्ट टर्म गोल्स  ठरवले. एकेक पाऊल पुढं सरकू लागलो. मी रोज सात तास सराव करत होते. दिवस पहाटे पाच वाजल्यापासून सुरू व्हायचा. योगाभ्यास, ध्यानध्यारणा करून सकाळी साडेआठ वाजता मी शूटिंग रेंजमध्ये सराव सुरू करायचे. सायंकाळी सात वाजता सराव संपायचा. म्हणायला टोकियो ऑलिम्पिकसाठी अजून दहा महिने आहेत. पण तिथवर ‘फोकस्ड’ राहणं यासाठी आता सर्वतोपरी प्रय} करतेय.’

हे ‘फोकस्ड’ राहण्यासाठी नक्की काय करावं लागतं असं विचारलं तर मनस्विनी सांगते, ‘2006 पासून मला ऑलिम्पिकला जायचंच होतं. पण प्रयत्न करूनदेखील मी पोहोचू शकले नाही. आजवर अनेक मोठे टायटल्स जिंकले. मात्र, ऑलिम्पिक कोटा मिळत नव्हता. पण मी जिद्द सोडली नाही. माझे कुटुंबीय आणि प्रशिक्षक सोबत होते, त्यांनी मला बळ दिलं. माझं मनोधैर्य ते उंचावत राहिले. प्रशिक्षकांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवून माझी तयारी करून घेतली. त्या बळावर कॉमनवेल्थ गेम्स (2006) मध्ये कोणाला अपेक्षित नसताना दोन पदकं मी मिळविली. पुढे 2018 र्पयत हा सिलसिला कायम राहिला. आंतरराष्ट्रीय पदकं तर मी जिंकत होतेच; पण समोर ऑलिम्पिक होतं. 2018 लाही मी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकलं. तेव्हाही लक्ष्य समोर होतंच. त्यामुळे आपलं ध्येय समोर ठेवून चालत राहणं मी या काळात करत राहिले, असं तेजस्विनी सांगते.
राष्ट्रीय पातळीवरील अनेक खेळाडू म्हणतात, की तुम्हा कोल्हापूरकरांकडे काहीतरी एक असा ‘एक्स फॅक्टर’ आहे की, जो तुम्हाला कुठेही थांबू देत नाही. ‘असं कसं होत नाही, थांबा दाखवितो करून!’  या अ‍ॅटिटय़ूडसह पाठबळ, प्रोत्साहन, सराव आणि मेहनत यांचा हात मीही सोडला नाही. ’
तेजस्विनी सांगत असते तिचा प्रवास. आणि 20 वर्षे सलग कारकीर्द गाजवणारी, एक-दोन नव्हे तर 88 पदकं जिंकणारी ही खेळाडू. मात्र आता तिच्यासमोर तिचं ध्येय आहे. आणि त्यासाठी तिची कठोर मेहनत सुरू आहे.
ेआपली स्वप्न आपल्याला झोपू देत नाहीत तर उठून कामालाच लावतात, आणि शिकवतात कष्ट याचंच उत्तम उदाहरण म्हणजे तेजस्विनीची ही ऑलिम्पिकची तयारी आणि दीर्घ तपश्चर्या.
त्याला यावेळी यश येवो याच शुभेच्छा!


( लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत वरिष्ठ बातमीदार आहेत.)

 


 

Web Title: shooter Tejaswini Sawant shares her journey for Olympics preparation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.