शूटिंगचं टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 08:14 PM2018-04-27T20:14:30+5:302018-04-27T20:14:30+5:30
राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी उत्तम कामगिरी केली. एकेकाळी या देशात नेमबाजीकडे खेळ म्हणून पाहिलं जात नव्हतं, आता तोच खेळ नवीन करिअर म्हणून समोर येत आहे. मात्र नेमबाजीतलं करिअर ही सोपी गोष्ट असते का? काय लागतं त्यासाठी?
-मोनाली गो-हे/श्रद्धा नल्लमवार
‘मी खूप थकले आहे’.. राष्ट्रकुल स्पर्धेत २५ मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकणारी हिना सिंधू स्पर्धेनंतर असं का म्हणाली? कारण नेमबाजी हा खेळ दिसतो तितका सोपा नाही. एक मिनिटभर स्वत:च्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायला लावलं तरी ते जमत नाही. या खेळात तासन्तास इतर सर्व विचार, भावना गुंडाळून ठेवून खेळाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित करावं लागतं, श्वासोच्छ्वासाचा तोल सांभाळावा लागतो. हेच जमणं या खेळातलं मोठं आव्हान आहे. नेमबाजीत नाव कमावलेले भारतीय खेळाडू एक, दोन नव्हे तर आठ-दहा वर्षे असं आपलं लक्ष एकाच गोष्टीवर केंद्रित करून सराव करतात. हा सराव अनेक अर्थांनी दमवणारा आहे.
दहा वर्षांपूर्वी भारतीय नेमबाज म्हटले की अंजली भागवत, राजवर्धनसिंह राठोड, अभिनव बिंद्रा ही दोन-चार नावंच चर्चेत असायची. आज भारतीय नेमबाज म्हटले की हिना सिद्धू, जितू राय, मनू भाकेर, मेहुली घोष, श्रेयसी सिंह, तेजस्विनी सावंत, अंजुम मुद्रिल, ओम मिथरवाल अपूर्वी चंदेला, रवि कुमार, अनिश भानवाला अशी दहा ते बारा नावं पटकन आठवतात. भारतीय नेमबाजांनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. ही गोष्ट यासाठी अभिमानाची कारण भारतीय नेमबाजीचा राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय प्रवास अजिबात सोपा नव्हता. खरं तर चीन, रशिया, जपान, कोरिया या देशांच्या तुलनेत भारतात क्रिकेट सोडला तर इतर कोणत्याच खेळाचा प्रवास सोपा नाही. कारण एकच, खेळाचं वातावरण नाही. कसं असणार? अभ्यासाला अग्रमानांकन, शिक्षण झाल्यावर नोकरीला, नोकरी लागल्यावर लग्नाला, लग्न झाल्यानंतर सेटल होण्यालाच जिथे महत्त्व आहे तिथे खेळाचं वातावरण कसं तयार होईल? या पार्श्वभूमीवर म्हणूनच नेमबाजीचा प्रवास अवघड होतो. आणि आपल्या देशात तसा तो झालाही.
१९९७ मध्ये डिस्ट्रिक्ट शूटिंग स्पोटर््स असोसिएशनची आम्ही नाशिकमध्ये पायाभरणी केली. इथल्या मुलांमध्ये नेमबाजीची आवड निर्माण करणं, ती जोपासणं, त्यांना तंत्रशुद्ध शिक्षण देऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी तयार करणं हा उद्देश त्यामागे होता. आतापर्यंत या संस्थेत प्रशिक्षण घेऊन अनेक खेळाडू मोठे झालेत, अनेकजण त्याच वाटेवर आहे. पण, तरीसुध्दा खंत वाटते ती या खेळातील गरीब-श्रीमंत दरीची. ही दरी या खेळात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. अनेकजण आवड म्हणून नेमबाजीत येतात, छान डेव्हलपही होतात. पण पुढे नॅशनल, प्री-नॅशनल खेळताना त्यांना आर्थिक पाठबळाची मोठी आवश्यकता असते. ज्या खेळाडूंची आर्थिक परिस्थिती चांगली ते या खेळासाठी लागणारे लाख, दीड लाखाचे वेपन, पॅलेट्स, अॅम्युएशन आणि इतर साधनसामग्री याचा खर्च पेलू शकतात; पण जे पेलू शकत नाहीत ते तिथेच थांबतात, हा खेळ सोडतात. आज २०१८ मध्येही हीच परिस्थिती आहे. या खेळाडूंना पैशांची आवश्यकता भासते. पण ते त्यांना वेळेत मिळत नाही आणि काही गुणी खेळाडूंचा प्रवास खुंटतो.
मात्र कॉमनवेल्थ, वर्ल्डकप, आॅलिम्पिक्स यासारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत एखादं पदक मिळाल्यानंतर शासन पातळीवर त्याची दखल घेतली जाते. मग एखाद्या खेळाडूला कोटी कोटींचे बक्षिसं मिळतात, पुढे त्याच्या प्रशिक्षणाचा खर्चही केला जातो. पण, हे जे एखादं पदक पटकावल्यानंतर होतं ते तो खेळाडू खेळासाठी धडपडत असताना का होत नाही? तेव्हाच जर अशा आर्थिकदृष्ट्या कमकुवत पण चांगल्या खेळाडूला वेळेत आर्थिक मदत मिळाली तर तो अधिक चांगल्या प्रकारे वरच्या स्तरावरचं प्रशिक्षण घेऊ शकेल. नेमबाजीच्या बाबतीत राष्ट्रीय किंवा त्याआधीच्या टप्प्यांवरही खेळताना कम्प्युटराइज्ड टार्गेट सिस्टिम रेंजवर नेमबाजांनी सराव करणं आवश्यक असतं. अशी शासकीय पातळीवरची रेंज फक्त बालेवाडीतच आहे. सीमा शिरूर यांची पनवेलला अशी रेंज तयार केली आहे; पण ती खासगी आहे. या कम्प्युटराइज्ड रेंजवर सराव करण्यासाठी हाती पैसा हवा. ज्यांच्याकडे तो असतो तेच हा सराव पेलू शकतात. त्यामुळे नेमबाजीची आवड, कौशल्य असतानाही अनेकांना नेमबाजीचा नाद मधेच सोडून द्यावा लागतो. आपण ही लेव्हल तर खेळलो, आता पुढच्या लेव्हलला जायला पैसे आहेत का आपल्याकडे? यासारखे प्रश्न सतावत असतील तर नेमबाज आपलं लक्ष खेळावर कसं केंद्रित करतील?
अनेक पालक मुलांची आवड म्हणून, तर कधी स्वत: फोर्स करून मुलांना नेमबाजीच्या प्रशिक्षणाला घालतातही. पण नेमबाजी शिकायला पाठवलेल्या मुलांचा फोकस हा नेमबाजी नसतोच. त्यांचा फोकस असतो अभ्यास. सहावीत गेलेलं मूल नेमबाजी शिकायला येतं. एक वर्षानंतर मग त्याच्या पालकांना वाटतं की आता वर्षभराचं प्रशिक्षण झालं ना आता तो स्पर्धेत कधी उतरणार? अचिव्हमेण्टची एवढी घाई कोणत्याच खेळाला त्यातही नेमबाजीला तर अजिबात पेलवत नाही. लक्ष केंद्रित करणं या एका गोष्टीलाच वर्षानुवर्षे जातात. नेमबाजी हा पेशन्सचा अर्थात संयमाचा खेळ आहे. चीन, कोरिया यासारख्या देशात मुलं पहिली सात ते आठ वर्षे फक्त खेळाची प्रॅक्टिस करतात. संपूर्ण लक्ष फक्त खेळावर केंद्रित करतात. पण आपल्याकडे मूल दोन-तीन वर्ष एक खेळ खेळतो आहे म्हटल्यावर त्याला एकतर स्पर्धेत उतरवण्याची घाई होते. आणि दुसरं म्हणजे खेळ महत्त्वाचा नसून अभ्यास महत्त्वाचा आहे हे बिंबवलं जातं. खेळापेक्षा अभ्यास, डिग्री, नोकरी जेव्हा महत्त्वाची होते तेव्हा तेव्हा खेळाची हानी होते. कारण लक्ष कशावर केंद्रित करावं खेळावर की अभ्यासावर, असा प्रश्न मुलांसमोर निर्माण होतो. या दोन लेव्हल कोणत्याही नेमबाज खेळाडूला पार करता आल्या तर नेमबाजीत तो त्याचं लक्ष हमखास गाठू शकतो. अर्थात ही लेव्हल पार करणं केवळ एका खेळाडूच्या हातात नसतं. त्याला त्यासाठी त्याचं कुटुंब, कुटुंबाची मानसिकता, शाळा आणि शासनव्यवस्था या सगळ्यांची मदत लागत असते. यापैकी कोणीजरी मदतीचा हात दिला तरी नेमबाजीत खेळाडूचं लक्ष केंद्रित व्हायला मदत होत असते.
त्यापुढची लेव्हल नेमबाज खेळाडू आणि त्याचे प्रशिक्षक हे मिळून पार करत असतात. खरं तर नेमबाजीसारख्या खेळात प्रशिक्षक आणि खेळाडूचं नातं, त्यांच्यातला संवाद या गोष्टींना खूप महत्त्व असतं. प्रशिक्षक खेळाडूला नेमबाजीचं तंत्र शिकवतो, त्याचं समुपदेशन करतो, त्याचं डाएट, फिटनेस, त्याचं शेड्यूल यासर्व गोष्टीचं प्लॅनिंग करतो. पण, तरीही एक गॅप असते. कारण खेळाडूच्या मनात काय चाललं आहे, खेळताना त्याच्या मनात कोणते विचार येतात, कोणते विचार त्याच्या खेळाला डिस्टर्ब करतात, खेळाडूच्या शरीरात कुठे दुखतं, काय त्रास होतो आहे हे प्रशिक्षकाला केवळ खेळाडूकडे पाहून कसं समजेल? त्यासाठी खेळाडूनं प्रशिक्षकाकडे या बारीकसारीक गोष्टी व्यक्त करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच खेळाडू आणि प्रशिक्षकाचं नातं त्या पातळीवरचं स्ट्रॉँग असणं गरजेचं असतं. या पातळीवर जर पालकांनी लुडबूड केली तर मात्र गडबड होते. आम्ही प्रशिक्षक म्हणूनच खेळाडूंसोबत खेळाडूंच्या पालकांचंही समुपदेशन करत असतो. त्यांनी मुलांशी काय बोलावं? त्याचा डाएट कसा सांभाळावा याचं मार्गदर्शन करतो. आपलं मूल स्पर्धेत उतरणार आहे हे म्हटलं की पालकांना, नातेवाइकांना स्फुरण चढतं, जिंकून येच, पदक मिळव असं दडपण खेळाडूंवर घरच्यांकडून लादलं जातं. या भाराखाली नेमबाज आला की त्याला फक्त पदक दिसतं. लक्ष्य दिसतंच नाही. ते दिसण्यासाठी तो त्याच्या टेक्निकवर लक्ष केंद्रित करूच शकत नाही. स्पर्धेनंतरही अनेकदा पालक त्याच्या चुकांवर बोट ठेवून बोलतात. यामुळे नेमबाजाचा पुढच्या स्पर्धेसाठीचा आत्मविश्वास डळमळतो. अशा वेळेस पालकांना त्याच्या खेळापासून चार हात लांब ठेवण्याचं अवघड काम प्रशिक्षकांनाच करावं लागतं तेही त्यांना न दुखावता, न गैरसमज होऊ देता.
अर्थात, स्पर्धा झाल्यानंतर नेमबाज जेव्हा हरून येतो तेव्हा आम्ही खेळताना त्याची प्रत्येक बारीक गोष्ट टिपलेली असते. पण हे करताना आम्ही त्याच्याशी पॉझिटिव्ह टॉक करतो. प्रत्येक खेळाडूची आम्ही शूटिंग डायरी तयार करत असतो. यात नेमबाजाची प्रत्येक बारीक गोष्ट टिपलेली असते. प्रत्येक नेमबाजाशी आम्ही स्वतंत्र बोलतो. ते बोलणं म्हणजे झापाझापी नसते. तो असतो एक पॉझिटिव्ह टॉक. खेळाडूनं काय काय चांगलं केलं हे आधी त्याला सांगितलं जातं. चुका झाल्या त्या कशा टाळता आल्या असत्या यावर बोलतो. नेमबाजीत खेळाडूसाठी पॉझिटिव्ह टॉक खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपल्या चांगल्या गोष्टींवर तो अधिकाधिक फोकस करू शकतो आणि आपोआपच चुकांवरचं, त्याच्यातल्या त्रुटींवरचं त्याचं लक्ष कमी होत जातं.
नेमबाज हा मानसिकरीत्या कणखर असणं गरजेचं असतं. ज्याच्यामध्ये फायटिंग स्पिरीट असतं तोच यशस्वी नेमबाज होतो. प्रशिक्षक खेळाडूला फक्त न् फक्त खेळावर, नेमबाजीच्या तंत्रावर, श्वासाच्या नियंत्रणावर लक्ष कसं केंद्रित करावं हे शिकवतो. आणि या तंत्रातून नेमबाज कणखर होतात. कोणत्याही लेव्हलवर खेळताना त्यांचं लक्ष विचलित होत नाही. आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतोय, देशासाठी पदक आणणं हेच लक्ष्य, आपल्या देशाचा सन्मान आपल्याच हातात अशा भावुकतेत नेमबाज अडकत नाही. त्यांचं लक्ष फक्त त्यांचा नेम असतो. आणि या नेमावर नेम लावला की नेमबाज त्याच्या खेळात यशस्वी होतोच.
नॅशनल, इंटरनॅशनल खेळणाऱ्या नेमबाजांवरच्या प्रेशरबद्दल कायम बोललं जातं. पण एक सांगू का? - या लेव्हलवर खेळणारे नेमबाज हे मुळातच चॅम्पियन असतात. त्यांच्यावर कोणतंच भावनिक दडपण नसतं. दडपणाशी दोन हात करण्याचं तंत्र त्यांनी केव्हाच आत्मसात केलेलं असतं. या लेव्हलवर खेळणाºया खेळाडूंची वेगळी प्रेशर्स असतात. उदा मनू भाकेरनं गेल्या काही महिन्यात लागोपाठ तीन इंटरनॅशनल पदकं मिळवलीत. तिला या कॉमनवेल्थमध्ये प्रेशर होतं ते पदक मिळवण्याचं नाही, तर आपला पुढचा खेळही जास्त चांगला व्हायला हवा, पॉइण्ट्स चांगले स्कोर व्हायला हवेत याचं. या अशा प्रकारच्या प्रेशरमुळे आपल्या हातून चुका होणार नाहीत यासाठी नेमबाज अधिकाधिक तंत्रावर लक्ष केंद्रित करतो आणि मग साहजिकच त्याचा खेळ अधिक तंत्रशुद्ध आणि चांगला होतो. यालाच पॉझिटिव्ह प्रेशर म्हणतात.
एकचित्त होत श्वास आणि शरीराची एकतानता साधणं सोपं नाही. श्वासावर नियंत्रण ठेवताना मनात कोणताच विचार नाही, कोणतीच भावना येऊ द्यायची नाही. मन आणि डोकं एकदम रिकामं ठेवायचं हे सोपं नसतंच. एकीकडे मन एकाग्र करायचं, श्वासावर नियंत्रण ठेवायचं, सूचनेबरहुकूम वागायला तितकंच अॅलर्ट राहायचं या सगळ्या प्रक्रियेमुळे मानसिक दमणूक होते. जी हिना सिद्धूची या कॉमनवेल्थगेमलाही झाली. या स्पर्धेआधी ट्रिगर ओढतो त्या बोटात तिला झिणझिण्या येण्याचा त्रास जाणवत होता. पण, प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळेस जर तिने तिच्या बोटाकडे लक्ष दिलं असतं तर तिला तंत्रावर लक्ष केंद्रित करता आलं नसतं. आणि शरीरात आपलं काही दुखत आहे, विचित्र चालू आहे याकडे दुर्लक्ष करून मन एकाग्र करणं ही अतिशय अवघड प्रक्रिया आहे. हिनानं खेळताना नेमकं हेच केलं होतं. त्यातून मेडल जिंकलं, पण दमछाक होतेच.तसंही हे खेळाडू पूर्ण लक्ष आपल्या टार्गेटवर एकवटतात, पदक जिंकण्यावर नव्हे. जिंकण्याच्या सूत्राचा तो एक मोठा भाग असतो.
नेम लागतो कसा?
नेमबाजी शिकायला आलेल्यांचा प्रोफेशनल खेळाडू बनण्यापर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्यानं होतो. आधी रायफल किंवा पिस्तूल हातात धरण्याची एक्साइटमेण्ट असते. या टप्प्यावर मुलं खूप उत्सुक असतात. त्यामुळे नवीन काही बारकाईनं आणि पटपट शिकून घेण्याची त्यांची तयारी असते. या टप्प्यावर मुलांमधली खेळण्याची आवड टिकवणं, वाढवणं आणि त्याला नेमबाजीचे टेक्निक शिकवणं, श्वासाचे नियम समजावणं, त्याच्याकडून हे करून घेणं हे काम प्रशिक्षक करत असतात.
सुरुवातीचा शिकण्याचा टप्पा ओलांडून एखाद्या मॅचसाठी म्हणून मुलं उभी राहतात तेव्हा त्यांच्यात फिअर आणि प्रेशर हे फॅक्टर येतात. अनेकजण स्पर्धेकडे इमोशनली पाहतात. स्पर्धेचा बक्षीसकेंद्री विचार करतात. आणि या टप्प्यावर पुन्हा प्रशिक्षकाचं काम महत्त्वाचं असतं. सर्व प्रेशरवरचं नेमबाजाचं लक्ष हटवून मुख्य उद्दिष्टाकडे त्याचं लक्ष प्रशिक्षकच केंद्रित करत असतो. स्पर्धा, स्पर्धेचे नियम हे नेमबाजांना प्रशिक्षक समजावून सांगतो. ते नीट कळले की खेळाडूंनाही आत्मविश्वास येतो. पुढे खेळाडूची नजर पक्की करणं, त्याची पोझिशन, त्याच्या टेक्निकवर काम करून प्रशिक्षक नेमबाजामध्ये नेम रूजवत असतो.
एकतरी खेळ खेळाच..
नेमबाजी या खेळामुळे आयुष्यात लक्ष केंद्रित करायला आणि एकाग्रता साधायचा मोठा फायदा होतो. पण, नेमबाजीच नाही तर इतर कोणताही खेळ मुलांमध्ये खूप सकारात्मक बदल घडवून आणतात. खेळामुळे मुलांमध्ये शिस्त निर्माण होते. खेळ मुलांना स्वावलंबन शिकवतो, आव्हानाला तोंड द्यायला शिकवतो. खेळामुळे मुलांमध्ये फायटिंग स्पिरिट निर्माण होतं. खेळामुळे आपली जबाबदारी ओळखणं खूप कमी वयात शिकता येतं. चांगल्या सवयी, सकारात्मक विचार करण्याची सवय हे फक्त खेळातूनच साधलं जातं. अभ्यासाच्या पुस्तकातून हे होत नाही. हे होण्यासाठी रोज नियमित आणि खूप खेळणं गरजेचं आहे.
( मोनाली आंतरराष्ट्रीय नेमबाज प्रशिक्षक आणि पंच असून, श्रद्धा शिवछत्रपती पुरस्कार विजेती नेमबाज आणि प्रशिक्षक आहे. )
(शब्दांकन- माधुरी पेठकर)