ती एक भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 07:54 AM2018-04-05T07:54:58+5:302018-04-05T07:54:58+5:30

समर आणि इशाना. दोघं प्रेमात असतात. वेगळे होतात. एक दिवस सहज भेटतात. तेव्हा..

Short film ti ek bhet | ती एक भेट

ती एक भेट

googlenewsNext

‘ती एक भेट’ ही फक्त साडेआठ मिनिटांची शॉर्ट फिल्म. पण, ही शॉर्ट फिल्म दोघांच्या दोन वर्षांपूर्वीच्या आणि दोन वर्षांनंतरच्या आयुष्याबद्दल बोलते. दोघांच्या नात्याबद्दल सांगते. नात्यापलीकडचंही खूप काही सांगून जाते. ही गोष्ट आहे समर आणि इशानाची. त्यांच्या एकत्र असण्याची, वेगळे होण्याची आणि तरीही आनंदी असण्याची. ही गोष्ट फक्त मौज-मजेची, रोमॅण्टिक नाही. आणि रडक्या, उद्ध्वस्त ब्रेकअपचीही नाही. ही गोष्ट आहे ब्रेकअपनंतरच्या एका छोट्याशा भेटीची. आणि ब्रेकअपसारख्या आयुष्यातल्या वेदनादायी घटनेकडे प्रॅक्टिकली पाहण्याची.
समर आणि इशाना हे दोन वर्षांपूर्वी प्रेमात होते; पण ते एका टप्प्यावर वेगळे होतात. मात्र त्यांच्या वेगळे होण्यात कटुता नसते. एकमेकांना दुखवून, फसवून, दूषणं देऊन ती एकमेकांपासून वेगळी होत नाही. अतिशय समजून-उमजून, नात्यातल्या एकमेकांच्या स्पेसचा, निर्णयाचा आदर राखून वेगळी होतात. एकमेकांना विसरून जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, पण क्षणाक्षणाला आठवण काढून देवदासही होत नाहीत. आयुष्यात नात्यातल्या, नात्याबाहेरच्या, ओळखीच्या लोकांची जशी आपल्याला अधून-मधून हलकी, फुलकी आठवण येते, तशा या दोघांना एकमेकांच्या आठवणी येतात.
त्या दिवशी इशानाला समरची आठवण येते. ज्या शहरात दोघांनी एकत्र अनेक वर्षं घालवली त्या शहरात इशाना आपल्या लिखाणाच्या कामासंदर्भात आलेली असते. तिथे आल्यावर तिला न राहवून समरची आठवण येते. करू का नको असं न करता ती त्याला फोन करते. आहे का वेळ, भेटायचं का? असा सहज प्रश्नही विचारते. व्यवसायाच्या कामात बुडालेल्या समरला तर आधी इशानाचा आवाजही ओळखू येत नाही; पण काही क्षणांत तो ओळखतो. भेटीसाठी तयारही होतो. तो तयार होत असताना त्याच्या मनात इशानाच्या आठवणी येत असतात. या आठवणींमुळेच समर आणि इशानाच्या नात्याची प्रेक्षकांना कल्पना येते. एकमेकांच्या इतक्या जवळ असतानाही ते वेगळे झाल्याची एक बाजू प्रेक्षकांना समरच्या नजरेतून समजते.
समर आणि इशाना दोन वर्षांनंतर एकमेकांना भेटतात. पूर्वीचे प्रेमी म्हणून नाही, तर दोन अति ओळखीची माणसं भेटल्याप्रमाणे ती दोघं भेटतात. सुरुवातीला दोघं अडखळतात, अवघडतात. पण, नंतर सहज एकमेकांची, एकमेकांच्या कामाची, घरातल्यांची चौकशी करतात. काही मीनिटांमध्ये दोघांची भेट संपते.
समरला भेटून इशाना रिक्षानं परतते तेव्हा तिच्या मनातल्या विचारांनी प्रेक्षकांना दोघांच्या वेगळं होण्याचं कारण इशानाच्या नजरेतून समजत जातं. समर आणि इशाना दोघेही समजूतदार. एकमेकांच्या प्रेमात. पण, या प्रेमापलीकडेही दोघांचं स्वतंत्र आयुष्य असलेली. दोघांना त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करायचं असतं, आयुष्य रेखायचं असतं. यात दोघांचं प्रेम, नातं अ‍ॅडजस्ट होणार नसतं. मग दोघेही वेगळे होतात.
आता इशानाला समरला पुन्हा भेटण्याचा पश्चाताप होत नाही. उलट या एका भेटीतूनच इशानाला हे तीव्रपणे जाणवतं की माणसं वेगळी होतात, नाती संपतात; पण मनात त्यांचं असलेलं विशिष्ट स्थान कधीही संपत नाही.
मनाली तेंडुलकर या फिल्मची लेखक, दिग्दर्शक. डिझायनिंगचं शिक्षण घेत असताना फिल्म मेकिंग हा तिचा स्पेशल सब्जेक्ट होता. नात्यांवर, नात्यांचं आपल्या आयुष्यात असलेल्या स्थानावर मनाली खूप गंभीरपणे विचार करायची. अभ्यासाचा भाग म्हणून तिला शॉर्ट फिल्म बनवायची होती, तेव्हा तिनं तिच्या नात्यांबद्दलचे विचार मांडायचं ठरवलं. त्यातूनच ही समर आणि इशानाची गोष्ट निर्माण झाली.
‘ती एक भेट’.

ही फिल्म इथं पाहता येईल..
https://www.youtube.com/watch?v=c6V6w1b9P78

माधुरी पेठकर
madhuripethkar29@gmail.com

Web Title: Short film ti ek bhet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.