शरम वाटली पाहिजे.!

By admin | Published: March 26, 2015 09:24 PM2015-03-26T21:24:32+5:302015-03-26T21:24:32+5:30

सडलेली व्यवस्था, निर्लज्ज विद्यार्थी आणि कॉप्या मारून पास होण्याचं डरपोक थ्रिल ... खरंतर लाजच वाटायला पाहिजे

Should be ashamed.! | शरम वाटली पाहिजे.!

शरम वाटली पाहिजे.!

Next
>सडलेली व्यवस्था, निर्लज्ज विद्यार्थी आणि  कॉप्या मारून पास होण्याचं डरपोक थ्रिल ... खरंतर लाजच वाटायला पाहिजे आपल्याला; कॉप्या करून पास होतो आपण? जगाच्या वेशीवर टांगली जातात आपल्या
नीतिमत्तेची लक्तरं?
***
बिहारमधे शाळेच्या इमारतीवर चौथ्या मजल्यापर्यंत चढून
दहावीचा पेपर लिहिणार्‍या मित्रांना कॉप्या पुरवणार्‍या 
बहाद्दरांचे फोटो जगभरात झळकले;
काय इज्जत राहिली या देशातल्या तरुण मुलांची?
थोडेथोडके नाही ९00 हून जास्त विद्यार्थी डीबार केले जातात;
न्यायालय स्वत:हून चौकशीचे आदेश देतं,
सरकार स्पष्टीकरणाचा रतीब घालतं,
शिक्षक जामीनपूर्व अर्जांसाठी धडपड करतात,
हे सारं आपल्याच देशात घडतं आहे!
हे कमीच म्हणून काही कॉपीबहाद्दर एका शिक्षकाला दमदाटी करतात,
त्याला कोंडून घालतात, मारहाण करतात;
हे सारं कुठल्या थराला चाललं आहे?
***
आणि हे सारं बिहारमधेच घडतंय असं थोडंच आहे;
आपल्या अवतीभोवती, आपल्या कॉलेजात,
वर्गात आणि कदाचित आपणही.
करतोच आहोत की कॉपी?
स्पष्टीकरणही देतो,
‘इथं खर्‍याची काही किंमत नाही;
सगळेच चोर, आपण थोडी कॉपी केली तर काय बिघडलं?
आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे!’
***
कसलं भवितव्य?
कॉपी करून पास झालेले शिक्षक 
मुलांना काय दर्जाचं शिक्षण देणारेत; आज देताहेत?
खिशात आणि बुटात कॉप्या लपवून नदीपार झालेले इंजिनिअर 
कसल्या दर्जाच्या इमारती, रस्ते आणि पूल बांधणार आहेत? 
कॉप्या करून डॉक्टरकीची डिग्री मिळवलेले,
साधं ग्रॅज्युएट व्हायचं तरी प्रोजेक्टच्या कॉप्या मारून
नाहीतर सरळ प्रोजेक्ट विकतच घेऊन
वर त्याबद्दल डिंग मिरवणारे
कोणाला फसवत असतात?
इंटर्नलच्या परीक्षा घेणार्‍या प्राध्यापकांना की 
आपल्या स्वत:लाच?
**
हे म्हणणं सोपंय की,
आपल्याकडची शिक्षणव्यवस्थाच नासली आहे,
साला सिस्टीमचाच घोळ आहे म्हणून
कॉप्या मारून सुटतात पोरं.
असेलही तसं कदाचित,
पण म्हणून तमाम कॉपी करणार्‍या तरुण मुलामुलींची
कशी काय निर्दोष मुक्तता होऊ शकते?
निर्लज्जपणे कॉप्या करताना,
कुठ जातो स्वाभिमान आणि बाणेदारपणा?
मुख्य म्हणजे आपण गुन्हा करतोय 
असं वाटूही नये इतकं बेडर निर्लज्जपण येतं कुठून? 
**
ज्याचा पायाच कच्चा, भ्रष्ट 
आणि नक्कल करकरून कमअस्सल झालेला
त्या शिक्षणावर कोणी यशाचे इमले कसे बांधेल?
ऐन परीक्षेच्या काळात 
आपल्या निर्लज्ज वागण्याचा पंचनामा आणि
काही अस्वस्थ करणारे प्रश्न
 
- ऑक्सिजन टीम

Web Title: Should be ashamed.!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.