ऊसाचा रस फ्रिजमध्ये गारेगार करावा का?
By admin | Published: April 4, 2017 05:28 PM2017-04-04T17:28:00+5:302017-04-04T17:28:00+5:30
उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो श्रमहारी आहे.
- वैद्य राजश्री कुलकर्णी
एन्जॉय धिस समर, बट..
उन्हाळा म्हटलं की सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवतो तो ऊसाचा रस. ऊसाच्या रसाचे अनेक फायदे आहेत. त्याचा आणखी एक महत्वाचा गुण म्हणजे तो श्रमहारी आहे. तो बल्य म्हणजे त्वरित ताकद देणारा आहे. त्यामुळेच ऊसाचा रस प्यायला की लगेच उत्साह वाटतो, तरतरी येते. रसात प्रत्यक्ष साखरच असल्यामुळे ती रक्तात लगेच जीभेवरूनच शोषली जायला लागते आणि पट्कन उत्साह, ताकद आल्यासारखे वाटते.
खरं तर ऊसाचा रस काढून पिण्यापेक्षा ऊसाचे करवे करून ते चोखून जर रस घेतला तर तो अधिक गुणकारी असतो.
यंत्रातून काढलेल्या रसात उसाचे मूळ, मधले खोड आणि वरचा टोकाचा भाग सगळेच पिळले जातात. त्यामुळे तो पचायला जड होतो. त्यातही लाकडी यंत्रातून काढलेला रस जास्त गुणकारी असतो, पण धातूच्या यंत्रात काढलेल्या रसात, धातुशी संपर्क आल्याने तो लवकर काळा पडतो, लवकर खराब होतो आणि कधीकधी जळजळ निर्माण करतो.
उसाचा रस शिळा करून कधीही पिऊ नये. हल्ली कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाण्या पिण्याची नवी पद्धत रूढ होत आहे, पण शिळा रस दोष उत्पन्न करतो त्यामुळे नेहमी ताजाच रस प्यावा.
आवडतो म्हणून एकावेळी खूप पोटभर रस पिणेही योग्य नाही. कारण तो पचायला जड होतो आणि मग कधीकधी जुलाब होऊ शकतात. विशेषत: लहान मुलांच्या बाबतीत ही दक्षता नक्की घ्यावी.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रस थंड गुणाचा असतो, पण त्यात बर्फ टाकला जाणारा बर्फ मात्र केवळ स्पर्शाला थंड असतो. गुणाने मात्र तो उष्ण असतो. त्यामुळेच पुष्कळ जणांना रस दुपारच्या वेळी प्यायल्यास उलट लघवीला किंवा छातीत जळजळ होते. त्यामुळे रसाचे खरे गुण हवे असतील तर साधाच रस प्यावा किंवा निदान कमीतकमी बर्खटाकावा .
ऊसाचा रस म्हणजे एक प्रकारे कच्ची साखरच असते, त्यामुळे ज्यांना डायबेटीस आहे त्यांनी पिऊ नये. जेवण झाल्यानंतर ऊसाचा रस लगेच पिऊ नये. कारण पोट एकदम जड होते.
रसाचे नियम पाळून रस प्यायल्यास त्यासारखे उत्तम, तृष्णाहर नैसिर्गक पेय नाही हे मात्र खरं!
सो एन्जॉय धिस समर विथ इट!!
पियो ग्लासफुल !!
rajashree.abhay@gmail.com