श्वेता बच्चनने नेसलीये कन्सेप्ट साडी, हा कोणता साडीचा प्रकार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 04:53 PM2018-07-19T16:53:21+5:302018-07-19T16:54:33+5:30
नेहमीच्या साडी प्रकारचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारची कन्सेप्ट साडी नक्की वापरून पहा.
- श्रुती साठे
आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा झाला, त्याची बरीच चर्चा झाली. फॅशन जगतातील अनेक तारक-तारकांची उपस्थिती, त्यांचे लूक्स, त्यांनी केलेला फ्लॅश मॉब हे सगळंच प्रचंड गाजलं. आलिया भट, श्रद्धा कपूर, ऐश्वर्या राय, काजोल, राणी मुखर्जी, दिशा पटनी या सगळ्या तारका चमचमत्या साडी, लेहेंगा चोली अशा पारंपरिक वेशांत सुंदर दिसल्या. पण या सगळ्यात उठून दिसल्या त्या म्हणजे श्वेता बच्चन आणि गौरी खान ! या दोघी एकदम वेगळ्या पद्धतीची साडी नेसून आल्या होत्या. त्या प्रकाराला कन्सेप्ट साडी किंवा ड्रेप्ड साडी असं म्हणतात.
कन्सेप्ट साडी म्हणजे काय? तर शिवलेली, इझी टू वेअर, वापरायला सुटसुटीत अशी साडी. पदर छोटा झाला, खालून परकर दिसतोय का वगैरेचं टेन्शन नाही ! अगोदरच शिवल्यामुळे साडी नेसली की आटोपशीरच दिसणार ही खात्नी आहे ! ही कन्सेप्ट साडी अतिशय ट्रेंडी आणि सुंदर दिसते.
अबू जानी- संदीप खोसला या सेलिब्रिटी डिझायनर जोडीने श्वेता बच्चनची कन्सेप्ट साडी डिझाईन केली. श्वेताने नेसलेली आयव्हरी रंगाची प्लेन साडी, प्लिटेड रफल असलेला पदर आणि निर्यांचा काठ यामुळे वेगळी दिसली. त्यावर वापरलेले चंदेरी ग्लिटरचे स्लिव्हलेस ब्लाउजही खुलून दिसले. आयव्हरी रंगाची पोटली ही स्टायलिश दिसते.
दुसरी साडी गौरी खानची. ती ही कन्सेप्ट साडीच. तरुण ताहिलियानीने डिझाईन केलेली कन्सेप्ट साडी करडय़ा रंगाचा ओम्ब्रे इफेक्ट देणारी होती. (म्हणजेच फिक्या ते गडद रंगछटा), चंदेरी गोटा एम्ब्रॉयडरी असलेली ही कन्सेप्ट साडी गौरीवर अतिशय शोभून दिसली.