सायलेण्ट हार्ट अटॅकपासून सुटका

By admin | Published: March 23, 2017 09:29 AM2017-03-23T09:29:14+5:302017-03-23T09:29:14+5:30

दहावीत शिकणा-या आकाशनं सायलेंट हार्ट अटॅकवर केलं संशोधन. राष्ट्रपतींच्या हस्ते आकाशाचा सन्मान करण्यात आला.

Silent Heart Arms Attack | सायलेण्ट हार्ट अटॅकपासून सुटका

सायलेण्ट हार्ट अटॅकपासून सुटका

Next

 
दहावीच्या आकाशनं केलं संशोधन


त्याचे आजोबा म्हटलं तर अगदी हेल्दी. स्वत:ची सारी कामं स्वत: करत, रोज हिंडायफिरायला जात होते. नाही म्हणायला त्यांना थोडा डायबिटिस आणि हाय ब्लडप्रेशरचा त्रास होता, पण अंथरुणावर वगैरे पडून राहायची वेळ त्यांच्यावर कधीच आली नव्हती. त्यानंही आपल्या आजोबांना कायम हसतमुखच पाहिलं होतं.  अचानक एकेदिवशी थोडंसं पडण्याचं निमित्त झालं आणि आजोबा त्याला कायमचे सोडून गेले ते गेलेच.
आजोबांच्या जाण्यानं तो अगदी हबकला.
असं कसं होऊ शकतं?
चालते, फिरते आजोबा असे अचानक आपल्याला सोडून कसे जाऊ शकतात?
त्याचे आजोबा ‘सायलेण्ट हार्ट अटॅक’नं वारले होते. आठवीतल्या त्या मुलानं त्याच्या मुळाशीच जायचं ठरवलं. तामिळनाडूच्या या मुलाचं नाव आकाश मनोज. आज हा मुलगा दहावीत आहे.


त्याला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड. तामिळनाडूतलं होसूर हे त्याचं गाव. विज्ञानासंदर्भातली जर्नल्स त्याला तिथे मिळणं अवघडच होतं. 
त्यानं मग त्याच्या घरापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्सच्या लायब्ररीत जायला सुरुवात केली. तिथल्या वैज्ञानिक जर्नल्सचा फडशा पाडायला सुरुवात केली. 
ही जर्नल्स वाचता वाचता आपल्या आजोबांना सायलेण्ट हार्ट अटॅक का आला, त्यासाठी काय करता येईल याविषयीच्या अभ्यासाकडेही त्यानं बारकाईनं लक्ष पुरवायला सुरुवात केली.
सायलेण्ट हार्ट अटॅकच्या नावातच खरं तर त्याची व्याख्या आहे. असा हार्ट अटॅक जो हळूहळू येतो, लक्षातच येत नाही. आणि लक्षात येतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. 
सर्वसामान्यपणे हार्ट अटॅक येतो, तेव्हा आपल्या छातीत दुखतं, श्वास गुदमरल्यासारखं वाटतं, सायलेण्ट हार्ट अटॅकमध्ये मात्र ही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. मसल पेन आहे, अपचन झालं असेल किंवा नुसतीच मळमळ आहे असं समजून रुग्णही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि शांतपणे हा आजार माणसाला घेऊन जातो. 
आजवर ग्रामीण भागात सायलेण्ट हार्ट अटॅकनं हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यासाठीचे उपचारही त्यांना वेळेवर मिळू शकलेले नाहीत. मुळात प्राथमिक पातळीवरच हा हार्ट अटॅक ओळखण्याचं कोणतंही साधन, उपचार सध्या उपलब्ध नाही. त्यासाठी रुग्णालयात जाऊन इको- टेस्टसारख्या छातीच्या तपासण्याच तुम्हाला करवून घ्याव्या लागतात. 
आकशनं या सर्व बाबींचा अभ्यास केला आणि एक छोटंसं उपकरण तयार केलं. या उपकरणाच्या साहाय्यानं सायलेण्ट हार्ट अटॅक ओळखता येऊ शकतो. मुख्य म्हणजे आपल्याला स्वत:लाच ते ओळखता येऊ शकतं. त्याच्या या संशोधनाचं नाव आहे ‘नॉन इन्व्हॅजिव्ह सेल्फ डायग्नॉसिस आॅफ सायलेण्ट हार्ट अटॅक’. या तंत्रानुसार रक्तातील एफबीपी ३ हे प्रथिन आपल्या त्वचेला कोणताही छेद न देता तपासता येतं. हे प्रथिन ऋणभारित असतं आणि धनभारित प्रथिनांना ते आकर्षित करते. अल्ट्राव्हायोलेट पद्धतीनं या एफबीपी ३चं प्रमाण मोजता येतं. किती अतिनील किरणं त्वचेतून शोषली जातात त्यावरून हे प्रमाण कळतं. 
आकाशनं बनवलेलं हे उपकरण अत्यंत स्वस्त आणि सर्वसामान्य रुग्णांना सहजपणे वापरता येईल असं आहे. या उपकरणाच्या पेटण्टसाठीही आकाशनं अर्ज केला आहे. त्याच्या ट्रायलसाठी डिपार्टमेंट आॅफ बायोटेक्नॉलॉजीचे साहाय्य आकाशने घेतलं आहे. येत्या काही महिन्यांत या उपकरणाचं उत्पादनही सुरू होऊ शकेल. सुमारे नऊशे रुपयांत हे उपकरण मिळू शकेल. 
आकाशला भविष्यात हृदयविकारतज्ज्ञ व्हायचे आहे आणि दिल्लीच्या ‘आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’मधून (एम्स) त्याला वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे. 
राष्ट्रपतींच्या पुढाकारानं गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रपती भवनात सुरू झालेल्या ‘इनोव्हेशन एक्झिबिशन’अंतर्गत त्याला सन्मानित करण्यात आलं आणि त्याचं उपकरणही या प्रदर्शनात मांडण्यात आलं आहे. 

Web Title: Silent Heart Arms Attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.