चालू आहे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’
By admin | Published: April 1, 2017 06:02 PM2017-04-01T18:02:28+5:302017-04-01T18:15:46+5:30
आज दिवसभर भारतातले दहा हजार ‘इनोव्हेटर’ तरुण-तरुणी देशासमोरचे अत्यंत गुंतागुंतीचे, गहन प्रश्न सोडवण्याचे मार्ग शोधण्याच्या धडपडीत व्यग्र आहेत.
-आॅक्सिजन टीम
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी भारतात एक आगळे-वेगळे ‘आयोजन’ घडते आहे. आज दिवसभर भारतातले दहा हजार ‘इनोव्हेटर’ तरुण-तरुणी देशासमोरचे अत्यंत गुंतागुंतीचे, गहन प्रश्न सोडवण्याचे मार्ग शोधण्याच्या धडपडीत व्यग्र आहेत. सकाळी आठ वाजल्यापासून देशभरातल्या एकूण सव्वीस ठिकाणी या तरुण-तरुणींच्या तब्बल 1266 टीम्स कामात जुंपल्या असून आज (शनिवारी) रात्री दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या तरुण संशोधक-अभियंत्यांशी संवाद साधतील.
- हे आहे ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’!
‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’ : काय? कशासाठी?
पंतप्रधान मोदींच्या ‘स्मार्ट इंडिया’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या या हॅकेथॉनमागे देशासमोरच्या प्रश्नांच्या यशस्वी हाताळणीसाठी नव्या कल्पक तारुण्याला वाव देण्याचा उद्देश आहे.
नेमके काय होणार या हॅकेथॉन मध्ये?
1. जुन्या प्रश्नांकडे पाहण्याची जुनी नजर बदलण्यासाठी ‘आऊट आॅफ द बॉक्स’ विचार करणार्या तरुण अभियंत्यांना संधी देण्याचे ठरल्यावर केंद्र सरकारच्या 29 मंत्रालयांकडून त्यांना भेडसावणार्या प्रश्नांची/समस्यांची यादी मागवण्यात आली.
2. या सर्व यादया एकत्रित करून त्यातून प्राधान्यक्रमाचे एकूण 598 प्रश्न निवडण्यात आले. हे प्रश्न देशातल्या तरुण अभियंत्यांसमोर ठेवले गेले.
3. त्यावर काम करण्यासाठी 42 हजार तरुण-तरुणींनी उत्सुकता दर्शवली.
4. या सर्वांना आपापले पहिले सादरीकरण करायला सांगण्यात आले.
5. या सादरीकरणांच्या परीक्षणानंतर उत्सुकांमधून 10 हजार तरुण-तरुणींची निवड करण्यात आली.
हे सारे अभियंते आज सकाळपासून या देशव्यापी हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत.
कशाची उत्तरे शोधणार?
आज सकाळी 8 वाजता सुरूझालेले हे स्मार्ट इंडीया हॅकेथॉन सलग 36 तास चालणार आहे. सहभागी गटांपुढे वेगवेगळ्या प्रश्नांवर कल्पक तोडगे शोधण्याचे आव्हाब असून त्यातले काही प्रश्न असे :
1. आॅनलाईन परीक्षांंमधली ‘डुप्लीकेटगिरी’ नष्ट करणे
शाळा-कॉलेजे आणि स्पर्धा परीक्षांची सत्रे ‘आॅनलाईन’ आयोजित करण्यात अपेक्षित विद्याथर््याऐवजी तिसरेच कुणीतरी परीक्षा देण्याची शक्यता तांत्रिकदृष्ट्या टाळता येणे अजूनही शक्य झालेले नाही. त्यासाठी मानवी सहभाग नसलेला ‘फुलप्रुफ मार्ग’ शोधणे
2. इलेक्ट्रॉनिक पर्सनल सेफ्टी
संकटात असलेल्या व्यक्तीपर्यंत पोलीस आणि प्रशासनाला तात्काळ मदत पोचवता ये ईल यासाठी ‘इन्टीग्रेटेड सोल्यूशन’ तयार करणे.
3. रेल्वे रुळांची सुरक्षीतता :
देशभरातील रेल्वे रुळांच्या सुरक्षेवर ‘रिअल टाईम’ नजरे ठेऊ शकेल अशी सॉफ्टवेअर्स आणि संबंधीत यंत्रणेची रचना सुचवणे.
4. राष्ट्रीय महामार्गांवर रुग्णवाहिका
महामार्गांवरून प्रवास करणार्यांना अपघात प्रसंगी जवळचे रुग्णालय अगर रुग्णवाहिकेशी थेट जोडणारे मोबाईल ऐप तयार करणे.
5. संवेदनशील कागदपत्रांची फोटो-प्रत रोखणे
संवेदनशील, अतीमहत्वाच्या कागदपत्रांची फोटो-प्रत तयार करणे अगर मोबाईल कैमेर्याने फोटो घेणे रोखणारे ‘सुरक्षा-कव्हर’ तयार करणे
6. माध्यान्ह भोजनाची गुणवत्ता तपासणे
विद्याथर््यांची गळती रोखण्यासाठी आणि गरिबी रेषेखालच्या मुलांचे नीट पोषण व्हावे यासाठी देशभरात हजारो शाळांमधल्या लाखो मुलांना पोषक माध्यान्ह आहार दिला जातो. या अन्नाची गुणवत्ता जागच्याजागी तपासणारी आणि रोज किती मुलांपर्यंत प्रत्यक्षात हा आहार पोचला याची ‘रिअल टाईम’ गणती उपलध करणारी ‘साधने’ या हॅकेथॉनमधले तरुण अभियंते सुचवणार आहेत.
7. साथीच्या रोगांच्या फैलावाबाबत जागरूकता
चिकनगुनिया, डेंग्यू यासारख्या रोगांचा फैलाव रोखता यावा यासाठी देशात सतत व्यापक जनजागरणाची गरज असते. हे ‘जागरण’ नेहमीच्या नीरस सरकारी जाहिरातींऐवजी मनोरंजक अशा ‘मोबाईल गेम्स’ मधून करता येईल का, असा एक प्रश्न या अभियंत्यांसमोर ठेवण्यात आला आहे.