हातातला स्मार्टफोन आणि ‘तसली ओढ’ यांचा काय संबंध आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 01:03 PM2019-05-31T13:03:17+5:302019-05-31T13:04:12+5:30
हातात मोबाइल आहे, त्यावर पोर्न आहे, सोशल मीडियात सारं उघडंवाघडं दिसतंय. वयात येण्याचं वय कमी झालं आहे, शरीरसंबंधांची उत्सुकता आहे अशा तरुण मुला-मुलींवर बंदी लादून प्रश्न सुटणार नाही; मात्र त्यांना सुरक्षिततेचं भान दिलं तर कदाचित ते जबाबदारीनं वागतील!
- मानसी जोशी
दहावीच्या परीक्षेला असणारी दीपा अचानक अभ्यासाकडे दुर्लक्ष करायला लागली. तिची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता एरवी चांगली होती; परंतु अचानक सारखं फोनवर गुंग असणं, मधेच हसणं, संध्याकाळी शाळेतून घरी यायला उशीर होणं अशा समस्या सुरू झाल्या आणि बोर्डाच्या परीक्षेचा बागुलबुवा समोर दिसणारे तिचे आईवडील तिला आमच्याकडे घेऊन आले. एकूण पाहता तिची बुद्धी चांगली होती, आतार्पयत तिला मार्क्ससुद्धा चांगले मिळाले होते. मग महत्त्वाच्या परीक्षेच्या वेळीच का असं लक्ष उडालं असेल या काळजीने ते बेचैन झाले होते. घरातलं एकूण वातावरण शाळेत असलेली तिची वर्तणूक सगळं आलबेल असल्याची खात्री करून झाल्यानंतर समुपदेशनाच्या तिसर्या-चौथ्या सत्रात ती जरा खुलली, मनमोकळं बोलू लागली. तेव्हा लक्षात आलं की बाजूच्या सोसायटीत राहणार्या बारावीतल्या मुलाशी तीच रोज चॅटिंग चालू होतं. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं म्हणे आणि आईवडील सध्या तर नक्की मान्यता देणार नाहीत अशी खात्री असल्यामुळे ते तासन्तास चोरून चॅटिंग करत होते. अधूनमधून तिची शाळा सुटल्यावर येताना त्याच्या घरी भेटत होते आणि शारीरिक जवळीक व्हायला सुरुवात झाली होती. त्याचाच परिणाम म्हणून तिचं अभ्यासावरचं लक्ष विचलित झालं होतं.
****
श्वेता आणि तिचा मित्र दोघेही विशीत आलेले सज्ञान तरुण होते. इतर जोडप्यांप्रमाणे हॉटेलमध्ये जायचे, फिरायला जायचे, अगदी ओव्हर नाइट ट्रिप्सलासुद्धा करायचे. अचानक श्वेताच्या आईच्या अकाउण्टमधून पैसे जायला लागले. घरातले सगळे बँकेचे व्यवहार श्वेताच बघायची त्यामुळे एटीएम कार्ड्स तिच्याकडे असायची. तिच्याशी बोलल्यावर लक्षात आले की ती आईच्या अकाउण्टमधून पैसे काढून त्या मित्राला देते. कारण तसं केलं नाही तर त्यांच्या शरीरसंबंधाचे फोटो आणि व्हिडीओ तो फेसबुकवर अपलोड करण्याची, तिच्या मित्रमंडळींना पाठवायची धमकी तिला देत होता. बदनामीच्या भीतीने ती तो मागेल तितके पैसे त्याला देत गेली. पुढे त्याची रीतसर पोलिसांत तक्रार केली आणि त्याला शिक्षादेखील झाली; परंतु संबंधांचे फोटो त्यानं तिच्या नकळत काढले होते का याचं उत्तर नकारार्थी होतं. तू जवळ नसताना तुझी आठवण आली तर हे बघता येईल अशा भावनिक हाकेला तिने दुजोरा दिलेला होता म्हणून त्याच्याकडे ते फोटो होते. अशी मागणी झाली तर नेमकं कसं वागावं किंवा नाही म्हणावं याचं ज्ञान श्वेताला नव्हतंच.
***
या अशा किती गोष्टी सांगता येतील. मात्र या प्रश्नांकडून उपायांकडे कसं जायचं आणि धोक्याची जाणीव तरुणांना कशी होईल, याची तरी माहिती त्यांच्यार्पयत पोहोचायला हवी. आजच्या परिस्थितीत लैंगिक साक्षरतेचा संदर्भ बदललेला आहे. त्याचा फोकस मज्जाव किंवा बंदी न राहता प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण आणि सुरक्षितता असा असायला हवा. लैंगिक साक्षरतेमध्ये केवळ शारीरिक माहिती न देता भावनिक, वैचारिक आणि नैतिक-सामाजिक संदर्भदेखील लहान वयापासून म्हणजे साधारण सहावी-सातवीपासून अंतभरूत करायला हवेत. त्यांच्या कृतीच्या कायदेशीर परिणामांचीदेखील जाणीव करून दिली पाहिजे. सध्या असंख्य डेटिंग अॅप्स उपलब्ध आहेत आणि मोठय़ा संख्येने तरुण-तरुणी या अॅप्सचा उपयोग करून घेतात. हे करत असताना काळजी आणि सुरक्षितता याचं भान वाढीस लागायला हवं, ते र्निबध नसतील तर हे म्हणजे माकडाच्या हातात कोलीत ठरेल.
नाजूक विषयातले धोके
आणि सावधगिरी
वरती सांगितलंय ते पहिलं दीपाचंच उदाहरण घ्या. ‘पंधराव्या वर्षी कसलं आलंय प्रेम! थोतांडं सगळी! हे काय वय आहे असल्या गोष्टी करण्याचं’ असल्या अतिशय अपेक्षित वाक्यांचा अशा परिस्थितीत काहीच उपयोग नाही. उलट ती आणखी चोरून गोष्टी करायला लागली असती आणि वाहावत गेली असती. तिच्या आईवडिलांनीदेखील समजूतदारपणा दाखवला. पौगंडावस्थेतील बदलांचा परिणाम शास्त्रीय पद्धतीने तिघांना समजावल्यानंतर समुपदेशाच्या मदतीने त्यांना विश्वास वाटला आणि आधी तिच्याशी एकांतात आणि नंतर तिच्या मर्जीने त्या मुलालाही घरी बोलवून त्यांच्याशी ओळख करून घेतली. त्याच्या मर्यादा आणि त्या न पाळल्याचे दुष्परिणाम यांची चर्चा झाल्यानंतर हळूहळू दोघेही पुन्हा चांगला अभ्यास करू लागले. उत्तम गुणांनी उत्तीर्णदेखील झाले. पाणी वाहतं झालं.
आकर्षण वाटतंच, त्यात माहितीचा महापूर
15 ते 25 च्या तरुणांच्या वयोगटात अभ्यास, करिअर, अर्थाजर्न, नातेसंबंध या सर्व समस्यांच्या जोडीलाच लैंगिकता हीदेखील एक महत्त्वाची, किंबहुना वरील सर्व इतर समस्यांवर परिणाम करणारी अशी एक बाब आहे. पौगंडावस्थेचं वय, मासिक पाळीचं वय लक्षणीय खाली आलं आहे यात शंकाच नाही. मग भिन्नलिंगी आकर्षण, शारीरिक बदल, पर्यायाने लैंगिक विचार आणि भावभावना निर्माण होण्याचं वयदेखील खाली आलंच आहे. मुंबईसारख्या शहरात तर शालेय वयातील मुलं सर्रास गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडबद्दल उघड उघड बोलताना दिसतात आणि लैंगिक संबंधांविषयी त्यांना अधिक लवकर माहितीदेखील असते. हे सत्य आहे आणि ते नाकारता येणार नाही. किंबहुना हे सत्य स्वीकारलं तरच योग्य पावलं उचलणं शक्य होईल.
लैंगिक शिक्षणाचा अभाव
आणि अधिक उत्सुक मुलं
मला आठवतंय की आम्ही 9 वी, 10 वी मध्ये शिकत असताना लैंगिक शिक्षणाचे तास शाळेत अगदी नुकते नुकते सुरू झाले होते. या लैंगिक शिक्षणाचा वर्षातून 1 तास होणार्या भाषणात केवळ मुलींना एकत्र करून मासिक पाळी आणि त्याचे जीवशास्त्र याविषयी माहिती देण्यात यायची, त्यानंतर सॅनिटरी पॅडची फ्री पाकिटं वाटली जायची आणि ती चोरून अवघडलेपणे वर्गात घेऊन जाताना कानकोडे होऊन या शिक्षणाची सांगता व्हायची.
याच शाळेत साधारण 7 ते 8 वर्षापूर्वी जेव्हा मी या भाषणाला गेले तेव्हा नववीतल्या मुलींचे प्रश्न ऐकून थक्कच झाले. मुली स्वच्छ विचारत होत्या, गर्भपात म्हणजे काय? गर्भनिरोधक काय असतं? जेमतेम शाळकरी मुलींना हे प्रश्न पडले होते. आणि विशेष म्हणजे ते स्पष्ट विचारण्याचं धाडसही त्यांच्यात होतं.
पूर्वी चाळिशीच्या पुढे असलेल्या पुरुषांना लैंगिक उत्सुकता पिवळ्या पुस्तकातून शमवावी लागे, स्त्रियांना तर तीसुद्धा मुभा नव्हतीच. पुढे आधी व्हीसीआर आणि नंतर हळूहळू इंटरनेट आलं होतं. त्यामुळे मासिकांपेक्षा हा मार्ग सहजसोपा होता. कमी-अधिक प्रमाणात मुलींनासुद्धा हा मार्ग सापडला होता; पण आजच्या तरुणाईच्या हातात स्मार्टफोन आहे. त्यामुळे जे इंटरनेट वापरायला कॅफेमध्ये जावं लागत होतं किंवा कॉम्प्युटरसमोर टेबल-खुर्चीत बसून घरात कोणी नसताना काहीबाही पहावं लागायचं ते सारं मोबाइलच्या रूपात आता खिशात आल्यामुळे अंथरुणात, कॉलेजात, प्रवासात, इतकंच काय तर शौचालयातही ते सारं सहज पाहता येतं. साहजिकच लैंगिक मजकुराचा भडिमार होताय. व्हिडीओ चित्रे, संदेश, पोर्न हे केवळ बघणंच नाही तर स्मार्टफोनच्या मदतीने एकमेकांना पाठवणंसुद्धा सोपं झालंय. सोशल मीडियाच्या विस्फोटाने आपल्याला हवा तो मुखवटा घालून समोरच्या व्यक्तीची दिशाभूल करणं अधिकच सोपं झालंय. त्यामुळे एकमेकांच्या संमतीने घडून येणारे संबंधसुद्धा केवळ शारीरिक आणि त्या क्षणी आनंद देणारे न राहता ते चित्रित करणं एकमेकांना पाठवणं, बदनामी करणं हे सहज शक्य झालंय.
कायदा-पालक
आणि जबाबदारीचं भान!
भारत हा सर्वात तरुण लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये आघाडीवर आहे. आजचा तरुण नक्कीच अधिक विचारी, खुल्या विचारधारेचा आणि वेगवान आहे. त्यामुळे एकनिष्ठतेच्या कल्पना आणि व्याख्या वेगवेगळी रूपं घेतात. पर्यायानं लैंगिक नातेसंबंध लग्नाआधी असणं, एकाहून अधिक लैंगिक जोडीदार असणं, स्व-समाधानाची लैंगिक साधनं वापरणं, कौमार्यासंबंधी आग्रही नसणं हे या पिढीसाठी नवीन नाही. किंवा इतरांना बसतात तसे त्यासंदर्भातले धक्के तरुण मुलांना बसत नाहीत. त्याबरोबरीने ही पिढी स्वतर्च्या पसंतीबद्दल, निवडीच्या हक्काबद्दल सुस्पष्ट आहे. भिन्नलिंगी संबंध असू देत वा समलिंगी किंवा उभयलिंगी या निवडीबद्दल ही मुलं समोरच्या व्यक्तीचा आदर करतात. त्यांना यामध्ये कमीपणा किंवा विचित्रपणा वाटत नाही.
परंतु आपल्या जवळच्यांना, आईवडील आणि इतर हितचिंतकांना ही निवड समजावणे, त्यांची मान्यता मिळवणं, पाठिंबा मिळवणं यासाठी झुंजावं लागतंच. हे सर्व करत असताना त्यांनी स्वतर्ला आणि आपल्या जोडीदाराला शारीरिक-मानसिक किंवा कायदेशीरदृष्टय़ा गोत्यात आणू नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या आधीच्या पिढीसाठी हा बदल सोपा नाही. लैंगिक क्रांती म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही असाच बदल आहे. तो समजून घेण्यासाठी सर्वप्रथम ‘आमच्या वेळी असं नव्हतं’चे गाणे बंद करावं लागेल आणि मुलं आपल्याशी मोकळेपणे बोलू शकतील, किमान अडचणीच्या वेळी आपली मदत/सल्ला घेऊ शकतील असं वातावरण जाणीवपूर्वक निर्माण करावं लागेल. आदिमानवाच्या काळापासून लैंगिकता हा मानवी जीवनातील वैशिष्टय़पूर्ण हिस्सा आहे. कारण इतर प्राणिमात्रांप्रमाणे तो केवळ प्रजननाशी संबंधित नसून आनंदाशी, समाधानाशी निगडित आहे. साहजिकच त्याला एक सामाजिक आणि नैतिक वलय आहे. त्या वलयाची निषिद्धता तोडून त्यावर चर्चा, विचारमंथन आणि साक्षरता येण्याची याहून योग्य वेळ नसेल!
(लेखिका मुंबईच्या नायर रुग्णालयात मानसशास्त्रज्ज्ञ
आहेत.)