चाबूक आणि चारा या दोन गोष्टींच्या फासातून वाचली, तरच तरुणांची आंदोलनं टिकतील!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 07:30 AM2020-01-23T07:30:00+5:302020-01-23T07:30:02+5:30

जातीयवाद आणि धर्मवाद घुसवून जनआंदोलनं मोडीत काढणं, आंदोलकांमध्ये भयगंड निर्माण करून त्यांच्यात फूट पाडणं, ‘प्रस्थापितांचे’ दलाल असलेल्या तरुणांना आंदोलनात घुसवून ते खिळखिळं करणं; हे आंदोलन मोडीत काढण्याचे हे प्रमुख मार्ग ! त्यातून कसं वाचायच?

social activist Dr kumar saptarshi shares his thoughts about success of youth agitation. | चाबूक आणि चारा या दोन गोष्टींच्या फासातून वाचली, तरच तरुणांची आंदोलनं टिकतील!

चाबूक आणि चारा या दोन गोष्टींच्या फासातून वाचली, तरच तरुणांची आंदोलनं टिकतील!

Next
ठळक मुद्देगरजेपेक्षा जास्त आणि नको तिथे नको ते बोललं की आंदोलनं दिशाहीन होत भरकटत जातात.

कुमार सप्तर्षी

आंदोलनं दोन प्रकारची असतात. राजकीय आंदोलनं आणि चळवळीतून आलेली सामाजिक आंदोलनं. कुठलंही आंदोलन म्हटलं की, त्यात ऊर्जा सर्वाधिक महत्त्वाची. चळवळीतल्या आंदोलनांसाठी तर ही ऊर्जा सर्वात महत्त्वाची. त्याशिवाय कोणतंही आंदोलन उभं राहूच शकत नाही आणि त्यात जोम भरला जाऊ शकत नाही. ही ऊर्जा मिळते तरुणांकडून. तरुणांचा पाठिंबा असला आणि ते या आंदोलनांमागे सक्रिय उभे राहिले तर पाहता पाहता ही आंदोलनं मोठी होतात. पण आंदोलनं टिकायची असतील, ती भरकटू द्यायची नसतील आणि एका अंतिम टप्प्यार्पयत, निष्कर्षार्पयत ती पोहोचायची असतील, तर त्या आंदोलनांना नैतिक अधिष्ठानही हवं असतं. नाहीतर अनेकदा अशी आंदोलनं झपाटय़ानं उभी तर राहतात; पण त्यांना नैतिक बळ नसेल, तर तितक्याच झपाटय़ानं ही आंदोलनं खालीही येतात आणि आपटतात. कारण ‘पुढे काय?’ हे ना त्या आंदोलनातील कार्यकत्र्याना माहीत असतं, ना त्यांच्या नेत्यांना. सत्ताधारी राजकीय पक्षही अशी आंदोलनं कशी फसतील, याच प्रयत्नांत असतात. 
आणखी एक महत्त्वाची गोष्ट. 
आंदोलनाच्या नेत्यांचं ज्ञान, त्यांची माहिती अत्यंत अद्ययावत असायला हवी. हे नेते अभ्यासूच हवेत. देशाची, राज्याची, तिथल्या प्रश्नांची त्यांना सविस्तर जाण हवी. देशपातळीवरील आंदोलन असलं तर त्यातील नेत्याची जाण कोणत्याही अभ्यासू खासदारापेक्षा अधिक हवी आणि राज्य पातळीवरील आंदोलन असेल, तर त्याचा अभ्यास मुख्यमंत्र्यापेक्षाही अधिक हवा.
नेत्याला सर्व प्रश्नांची जाण असली, विविध विषय त्याला मुळापासून माहीत असले, या प्रश्नांशी तो समरस होऊ शकत असला, तर आंदोलनांतही एकांगीपणा, एकारलेपणा येत नाही आणि ‘मी म्हणेन तेच, तसंच’ अशा अतिरेकी अट्टहासात ते वाहवत जात नाही.
आंदोलनांत ऊर्जा तर प्रचंड आहे; पण त्यांना नैतिक अधिष्ठान नाही आणि अभ्यासू नेता नाही. त्यामुळे  फसलेली, राजकारण्यांनी, सत्ताधार्‍यांनी पाडलेली अनेक आंदोलनं मी स्वतर्‍ पाहिलेली आणि अनुभवलेली आहेत. 

मुळात कुठल्याही आंदोलनांच्या आधी संघटन आवश्यक असतं. हे संघटन एका वैचारिक आणि नैतिक पायावर उभं ठाकलेलं असावं लागतं. असं असलं तर तरुणही या आंदोलनांकडे, चळवळीकडे आकर्षित होतात आणि चळवळींना बळ मिळतं. मात्र या मूलभूत गोष्टीकडेच दुर्लक्ष झालं तर चळवळी आपटायला फार वेळ लागत नाही. आमच्या काळात याच गोष्टींसाठी फार काळ लागायचा. तरुणांना चळवळीची भूमिका पटवून द्यावी लागायची. त्यासाठी सातत्यानं त्यांच्या संपर्कात आणि त्यांचे प्रश्न घेऊन लढावं लागायचं.
आजच्या विद्यार्थी आंदोलनांसाठी ही बाब मात्र बर्‍यापैकी सोपी झाली आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं आपली भूमिका तरुणांर्पयत पोहोचायला वेळ लागत नाही. ही भूमिका पटली की तरुणही मग झपाटय़ानं या चळवळींच्या पाठीशी उभे राहतात आणि चळवळी वाढत जातात. कॉलेजवयीन मुलांमध्ये आज हे सोशलायझेशन खूप झपाटय़ानं होतं आहे. अंगात ऊर्जा असते. बंडखोरी वयात आणि रक्तातच असते. एखादी गोष्ट पटली, तर कोणाच्याही, अगदी पालकांच्या धाकालाही न जुमानण्याची अंगभूत प्रवृत्ती असते. भूमिका पटली, तर त्या बाजूनं उभं राहायला मग तरुण कचरत नाहीत. आजच्या तरुणांचा अंतर्गत संवाद चांगला आहे. त्यांच्या माहितीचा आणि ज्ञानाचा स्तर चांगला आहे. एकजूट चांगली आहे. उत्स्फूर्तपणे ते आंदोलनांमध्ये सहभागी होतात. या आंदोलनांमध्ये सर्व धर्माचे लोक सहभागी आहेत. अनेक आंदोलनांत अहिंसाही दिसते आहे. विद्यार्थी आंदोलनांसाठी ही जमेची बाब आहे. यातूनच मग तरुण विद्याथ्र्याचं नेतृत्वही उभं राहतं. कन्हैयाकुमार अशाच आंदोलनांतून पुढे आला आहे आणि टिकलाही आहे.
आंदोलनं मोठी व्हायला लागली की, सत्ताधारी ती फोडायचा प्रय} करतात. आजच नाही, गेल्या अनेक वर्षापासून हेच चालू आहे. जणू तो नियमच आहे. कारण हीच आंदोलनं त्यांचं आसन डळमळीत करीत असतात. त्यामुळे पहिला आघात होतो तो आंदोलनांच्या नेतृत्वावर. पहिला हातोडा पडतो तो मनोबलावर. नेत्यांचं आणि कार्यकत्र्याचं मनोबल खच्ची करण्याचा प्रय} केला जातो. पहिल्यांदा नेत्याची जात पाहिली जाते आणि वाद पेटवला जातो. भेदाभेद, फाटाफुटीवर भर दिला जातो. पोलिसांचा, कायद्याचा ससेमिरा मागे लावला जातो. ‘अभ्यास, करिअर सोडून कशाला ही कटकट?’, म्हणून पालकही मग विद्याथ्र्याच्या बोकांडी बसतात आणि त्यांना आंदोलनांपासून दूर करण्याचा प्रय} करतात.
अनेकदा तर नेत्यालाच फूस लावली जाते. सत्ताधारी, राजकीय पक्षांकडून त्याला पदाचं आमिष दाखवलं जातं. अनेक नेते या आमिषांना फसतातही. त्यांना पद तर दिलं जातंच; पण त्याचे पंख मात्र पद्धतशीरपणे छाटले जातात. त्याला कामच करू दिलं जात नाही. पद घे आणि गप्प बस. ना त्याला बोलू देत, ना त्याला पुढे जाऊ देत. हे नेतृत्व मग आपोआप संपतं.
अलीकडे दोन प्रकारचं नेतृत्व दिसतं. आतून आलेलं नेतृत्व आणि बाहेरून आलेलं नेतृत्व. बाहेरून आलेल्या नेतृत्वामध्ये बर्‍याचदा चमकोगिरी दिसते. राडेबाजी करणं, तमाशा करणं, डांबर फासणं. असले उद्योग यात केले जातात. अशावेळी मुद्दाम माध्यमांना कळवलं जातं. माध्यमांचे प्रतिनिधी येईर्पयत हे लोक थांबतात. पत्रकार ‘कव्हर करायला’ आले की मग राडा करतात. माध्यमांमधून हे ‘लाइव्ह’ फोटो, फुटेज प्रसिद्ध होतात. त्यांना आपसूक प्रसिद्धी मिळते; पण अशा आंदोलनांचा जीवही तेवढाच असतो. अशी आंदोलनं टिकत नाहीत, वाढत नाहीत आणि त्यातून हातीही काहीच येत नाही.
आंदोलनांत हिंसा होऊ न देणं हा कळीचा मुद्दा आहे. आजकालच्या जगभरातल्या आंदोलनांत हे सूत्र बर्‍यापैकी पाळलं जाताना दिसतं आहे. हॉँगकॉँग, इजिप्त. इत्यादी ठिकाणची आंदोलनं तर व्हॉट्सअ‍ॅप आणि इंटरनेटच्या माध्यमांतून उभी राहिली आणि चालवली जात आहेत.
हिंसा केली, तर दडपशाहीला आमंत्रण मिळतं. ही संधी द्यायचीच नाही. आमच्या काळांतील आंदोलनांत हे सूत्र आम्ही कटाक्षानं पाळलं होतं. मुळांत आमच्या आंदोलनांत आम्ही कधीच पोलिसांच्या विरोधात गेलो नाही. ‘पोलीसही माणूसच आहे आणि त्याच्यातही माणुसकी आहे’ या तत्त्वानंच आम्ही त्यांच्याशी वागायचो. मुळांत पोलिसांच्याच अनेक प्रश्नांना आम्ही हात घातला होता. त्याकाळी पोलीस हाफ चड्डीत असायचे. त्यांना फुल पॅण्ट मिळावी, यासाठीही आम्ही आंदोलन छेडलं होतं. 79च्या सुमारास पुलोद सरकारनं पोलिसांसाठी पहिल्यांदा फुल पॅण्ट आणली.
आंदोलनाचं नेतृत्व बोलभांड नको आणि पैशाची अकारण उतमातही तिथे नको. गरजेपेक्षा जास्त आणि नको तिथे नको ते बोललं की आंदोलनं दिशाहीन होत भरकटत जातात. आमच्या वेळी आम्ही जी आंदोलनं केली, त्याला बर्‍याचदा पैसाही जनतेनंच पुरवला. जिथे कुठे लहान-मोठी सभा झाली, की जमलेल्या लोकांना आम्ही विचारायचो, एक चहा तरी आम्हाला पाजणार की नाही? सभेतले लोक मग आमच्या चादरीत चाराणे, आठाणे  टाकायचे. स्टेज, हॅँडबिलं आणि इतर काही खर्च लोकांच्या या पैशांतूनच व्हायचा. 
जातीयवाद आणि धर्मवाद घुसवून जनआंदोलनं मोडीत काढायची, हे सत्ताधार्‍यांचं प्रमुख शस्र असतं. याशिवाय आंदोलकांमध्ये भयगंड निर्माण करणं, त्यांना ठोकून काढणं, त्यांच्यात फूट पाडणं, त्यांच्यावर विविध कलमं लावणं, फूस लावणं, ‘चाबूक आणि चारा’ दाखवून तरुणांना फोडणं, ‘प्रस्थापितांचे’ दलाल असलेल्या तरुणांना आंदोलकांमध्ये घुसवणं आणि त्या माध्यमातून आंदोलन खिळखिळं करणं. आंदोलन मोडीत काढण्याचे हे प्रमुख मार्ग. आजही ते वापरले जातात.
या सगळ्यातून आपलं आंदोलन वाचवायचं तर आणखी एक महत्त्वाचं - महात्मा गांधी या माणसाशी कायमची दोस्ती करायची ! शस्रनिरपेक्ष पुरुषार्थ काय असतो, हे गांधीनं जगाला शिकवलं. आत्मसुधारणेचा अतिशय महत्त्वाचा मार्ग त्यात आहे. जमावाला हिंसेपासून दूर ठेवायचं असेल, तर त्यासाठीही गांधीचा, गांधी आंदोलनांचा अभ्यास करायलाच हवा. त्याशिवाय सर्व धर्माची माहिती हवी. त्यांचा अभ्यास हवा. सभेत, कार्यकत्र्यापुढे त्या त्या धर्मातील नुसती वचनं जरी अधूनमधून दिली, तरी सर्व धर्माचे कार्यकर्ते जोडले जातात, हे आंदोलन आपलं, आपल्यासाठी आणि बहुसमाजहितासाठी आहे हे त्यांच्या मनावर बिंबवलं जातं. मी तुझा आणि तुझ्या धर्माचाही आदर करतो, हे कार्यकत्र्याना कळलं की इतर कुठल्या आमिषांना ते सहजी बळी जात नाहीत.

***

तरुण मित्रांनो, तुमची आंदोलनं फसू द्यायची नसतील, तर...

1- एकमेकांना आधार देत आंदोलन पुढे न्यायचं.
2- बकाबका बोलणं टाळून सामूहिक ऊर्जा आंदोलनांतून दिसेल, असं पाहायचं.
3- शांतपणे आणि डोकं ठिकाणावर ठेवून आंदोलन दीर्घकाळ चालू ठेवायला हवं, याची जाणीव कधीही विझू द्यायची नाही. 
4- कार्यकर्ते, नेत्यांमध्ये शंका, मतभेद असतील तर ते हे भेदाभेद चर्चेतून मिटवत राहाणं कधीही थांबवायचं नाही.
5- पोलिसांना स्वतर्‍हून कधीच डिवचायचं नाही.
6- प्रत्येक कार्यकत्र्याला बोलण्याची संधी द्यायची. कार्यकत्र्याच्या शंकांचं निरसन आंदोलनाला मोठं बळ पुरवतं, याचा विसर पडू द्यायचा नाही.
7 - आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट र्‍ गांधी नावाच्या माणसाचा हात कधीही सोडायचा नाही.

आम्ही रस्त्यावर उतरलो होतो, तेव्हा..


युक्रांदच्या काळात आमच्या आंदोलनांत हिंसाचार होऊ नये, यासाठी एक अभिनव मार्ग आम्ही चोखाळला होता. आंदोलनांत आम्ही बर्‍याचदा हात बांधून रस्त्यावर बसायचो. हिंसाचाराला कुठे थाराच नव्हता. त्यामुळे पोलिसांनाही काही करता यायचं नाही. लाठय़ा-काठय़ा माराव्या लागायच्या नाहीत. आंदोलनांत एकही मृत्यू व्हायला नको, याकडे आमचा कटाक्ष असायचा. आंदोलन करताना आम्ही रस्त्यात बसून राहायचो आणि आंदोलक विद्याथ्र्याना सांगायचो, बैठं शवासन करा. त्याचबरोबर आम्ही घोषणा द्यायचो, ‘तुमची आमच्या शरीरावर सत्ता चालेल; पण आमच्या आत्म्यावर नाही.’
आंदोलकांना पांगवणं पोलिसांना अशक्य व्हायचं. त्यांना आंदोलकांना थेट उचलूनच न्यावं लागायचं. गर्दीला झोडपून काढून आंदोलन मोडून काढणं सोपं असतं. लाठय़ा-काठय़ा उगारल्या, गोंधळ झाला की आंदोलन बंद पाडणं सोपं असतं, काही पोलीस हे काम करू शकतात; पण बसलेल्या कार्यकत्र्याला उचलताना पोलिसांची जास्त शक्ती खर्च होते. एकेक कार्यकर्ता उचलायला चार-पाच पोलीस लागायचे. शेवटी पोलिसांनी आम्हाला ‘उचलायला’ पहिलवान ठेवायला सुरुवात केली होती. पोलीस कमिशनरही आम्हाला म्हणायचे, ‘तुमच्या आंदोलनांत आमचे पोलीस फार दमतात हो !’..

(युवक क्रांती दलाचे संस्थापक असलेले लेखक  ज्येष्ठ विचारवंत आणि कार्यकर्ते आहेत.)

शव्दांकन : समीर मराठे

Web Title: social activist Dr kumar saptarshi shares his thoughts about success of youth agitation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.