समाजसेवा हेच करिअर
By admin | Published: February 15, 2017 05:14 PM2017-02-15T17:14:36+5:302017-02-15T18:03:53+5:30
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न.
- राजू भडके
निर्माण आणि आॅक्सिजन
उत्तम पैसे मिळवून देईल असं शिक्षण आणि शिक्षणातून उत्तम पैसा कमावून देणारा जॉब.. या चक्रात फिरता फिरता तरुण मनांंमध्ये तयार होणाऱ्या अस्वस्थतेला उत्तर शोधायचा एक प्रयत्न - खरंतर प्रयोगच - गडचिरोलीला सुरू आहे. त्याचं नाव ‘निर्माण’. डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या प्रेरणेतून या प्रयोगात एकत्र येणारं तारुण्य एका विलक्षण अनुभवातून जातं.
गेल्या पाच वर्षांत ‘निर्माण’च्या एकूण पाच बॅचेसमध्ये ७०० हून अधिक मुलामुलींनी हा अर्थपूर्ण अनुभव घेतला. त्यातल्या काहींनी सामाजिक कामात उडी घेतली आहे. काही पुढलं शिक्षण-जॉब या मार्गाने गेले असले, तरी त्यांनी बदलत्या समाजाकडे पाहण्याची ‘वेगळी’ नजर कमावली आहे. समाजासाठी काही करावं असं वाटणाऱ्या साऱ्यांनाच जे प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं स्वत:पुरती शोधण्याचा प्रयत्न या निर्माणी दोस्तांनी केलेला आहे.
म्हणून त्यांनी सांगितलेली ही अवघड प्रश्नांची उकल..
त्यातला हा दुसरा प्रश्न : समाजसेवा हेच करिअर, असं ठरवलं तेव्हा भीती नाही वाटली?
फार फार तर काय होईल?
करिअरची सुरुवातीची, महत्त्वाची वर्षे समाजकामासाठी द्यायची, हा निर्णय घेताना भीती नाही का वाटली?
अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता हा तेव्हाही आणि आताही आहे. ‘निर्माण’मध्ये आलो तेव्हा डी.एड. सुरू होतं. निर्माणचं चौथं शिबिर संपता संपता डी.एड.सुद्धा पूर्ण झालं होतं. त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न होताच. शिक्षणसेवक पदासाठीच्या सर्व फेऱ्या पूर्ण झाल्या होत्या. नवीन फेरी पुढल्याच वर्षी. पण हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. मला ठरवायचं होतं की वर्षभर वाट बघून पुढल्या वर्षी शिक्षणसेवक पदाच्या फेऱ्यांना हजर राहायचं, की आयुष्यात वेगळी काहीतरी वाट शोधायची? कारण पुढल्या वर्षी नोकरी मिळेल की नाही हेही निश्चित नव्हतं आणि मिळाली तरी महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात मिळेल हेही स्पष्ट नव्हतं. मग अशा या अनिश्चिततेवर अवलंबून राहावं, की जे आपल्याला निश्चित करता येईल आणि आवडेल ते करावं असं द्वंद्व मनामध्ये सुरू झालं. आणि दुसऱ्या विचारानं यात विजय मिळवला. ठरवलं की आता जे आवडतं ते करायचं.
निर्माणमध्ये असताना ऐकलेलं नायनांचं (डॉ. अभय बंग) एक वाक्य आठवत होतं. ते स्वत:ला काहीवेळा सतत विचारलं.
‘फार फार तर काय होईल?’
पुढील तीन वर्षे देऊन तर बघूया. नाही जमलं तर परत येऊ आणि मुलांना शिकवण्याचं काम सुरू करू. आधीचा शिकवण्याचा अनुभव तर होताच, सोबत डी.एड.ची पदविकासुद्धा होती. त्यामुळे आपण काहीतरी उत्तम करू शकतो हा विश्वास होता. पण प्रश्न होता तो घरच्यांना कन्व्हेन्स करणं. ते माझ्यासाठी जरा सोपं होतं. कारण मी काय करावं यासाठी घरच्यांनी त्यांचे विचार माझ्यावर कधीही लादले नाहीत. मी काही निर्णय घेतला असेल तर तो सहज बदलणार नाही हेही त्यांना ठाऊक होतं. पण सर्वसाधारण विचारांप्रमाणे मी नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. मी त्यांना समजावलं आणि माझा विचार पटवून दिला. त्यांच्याकडेही पर्याय नव्हता. मुंबईत आलो तेही त्यांना कळवलं नव्हतं. आठवड्यानंतर फोन करून सांगितलं.
मुंबईला काम सुरू झालं. पण जे करायचं होतं ते अजूनही काही सापडलं नव्हतं. एके दिवशी निर्माणचे समन्वयक दत्ता बाळसराफ म्हणाले की, ‘तू शिक्षणातला माणूस आहेस. इथे भांडवलशाहीत अडकू नकोस. पानसेंकडे (प्रा. रमेश पानसे) जा.’ मी ग्राममंगलमध्ये ऐन्याला कामाला सुरु वात केली आणि तिथून जे करायचं होतं त्याला सुरु वात झाली होती. मी स्वत:ला दिलेली तीन वर्षांची मुदत केव्हाच संपली. कधीही परत जाण्याचा विचार मनात आला नाही. ग्राममंगल, प्रथम, सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया यांसारख्या शिक्षणातील नावाजलेल्या संस्थांसोबत काम करण्याची संधी मिळाली. खूप काही शिकलो. अजूनही शिकतो आहे. ते सुरूच राहील. माझे मित्र जि. प. शाळांमध्ये सरकारी नोकरीत आहेत. पण मला कधीही मी घेतलेल्या निर्णयाचा पश्चात्ताप होत नाही. उलट आवडीचं काम करीत असल्यानं आनंद, समाधान आणि नवी उमेद मिळते आहे. त्यावेळी ती रिस्क घेताना भीती नाही वाटली. या प्रवासात निर्माणचे मित्रमैत्रिणी आणि इतर जिवलग माणसं कमावली. ती आयुष्यभराची शिदोरी. त्यावेळी जो प्रश्न मी स्वत:ला विचारला तोच प्रश्न आजही पुढे जाताना, काही अडलं तर स्वत:ला विचारतो आणि पुढे जातो..
...फार फार तर काय होईल?
- अमोल पाटील
..म्हटलं करूनच पाहू!
इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर मला महावितरणमध्ये जॉब मिळाला आणि जळगावच्या शहरी भागात पहिलं पोस्टिंग मिळालं. पण निर्माण शिबिरानंतर मनात एक विचार जोम धरू लागला होता, जिथे माझी गरज आहे आणि जिथे माझ्या शिक्षणाचा सर्वाधिक उपयोग होऊ शकेल, अशाच ठिकाणी जॉब करावा. माझ्या इनपुटमधून मला काय आउटपुट मिळतंय आणि अधिकाधिक आउटपुट कसं मिळेल याचा विचार माणूस सहसा करतोच. आणि त्यात गैर काहीच नाही. काही लोकांसाठी ते पैशाच्या मोबदल्याच्या स्वरूपात असतं, माझ्यासाठी ते कामातून मिळणाऱ्या समाधानाच्या रूपात होतं. मुळात समाधान वगैरे संकल्पना खूप सापेक्ष आणि अमूर्त स्वरूपात असतात. त्याची मोजदाद करता येत नाही, ते अनुभवावंच लागतं. काठावरून शेळ्या हाकलून ते मिळत नाही.
त्यामुळे खरंतर मागचा पुढचा जास्त विचार न करता मी निर्णय घेतला.
‘करके देखो’ ! ..म्हटलं करूनच पाहू!
त्यामुळे गडचिरोलीमध्ये पोस्टिंग मिळावी म्हणून मी प्रयत्न सुरू केले. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील गट्टा या गावी मला पोस्टिंग मिळाली.
गडचिरोलीतल्या साडेपाच वर्षांत एकदाही तोटा झाल्याचं मला आठवत नाही. आम्ही इलेक्ट्रिफाय केलेली पहिली तीन गावं- हरेंडा, भेंडीकन्हार आणि एडंपायली. गावात पहिल्यांदा वीज आल्यानंतर गावकऱ्यांना झालेल्या आनंदाचं गणित कुठे फायदा-तोट्यात बसवायचं! हळूहळू एक एक करत २० गावांत वीज आली. गावकऱ्यांना खूप कौतुक वाटलं. पुढे मग रूढार्थाने फायदा वगैरे म्हणून गणल्या जाणाऱ्या गोष्टी घडल्या. वर्तमानपत्रात नाव छापून आलं, शासकीय व्यवस्थेकडून प्रशस्तिपत्रक मिळालं. तसं अॅप्रिसिएशन सर्टिफिकेट मिळवणारा मी पहिलाच एम्प्लॉयी होतो.
‘माझ्या करिअरचं काय होणार?’ हा विचार तर कधीच मग मनात आला नाही. उलट आपल्या कामाचे काहीतरी मोठे मूर्त स्वरूपातले रिझल्ट्स दिसत आहेत, हे बघून पुढच्या कामाचा उत्साह वाढत गेला.
प्रोफेशनल करिअरपलीकडचे फायदे तर दर दिवशी दिसायचे. मला एक व्यक्ती म्हणून समृद्ध करून जायचे. आदिवासी लोकांकडून पुष्कळ शिकायला मिळाले. आदिवासी आणि आपल्या जीवनाचे पॅरामीटर्स परस्पर भिन्न. आपण कुठल्याशा प्रकारच्या, न दिसणाऱ्या अशा लाइफ सिक्युरिटीजमागे धावत असतो. आदिवासी लोकांकडे आपल्यासारखे इन्श्युरन्स नाहीत, म्हातारपणासाठी जमवलेली पुंजी नाही, की डझनभर पॉलिसिज नाहीत. आजचा दिवस तेवढा जगायचा, गरजा कमीत कमी ठेवायच्या. आदिवासींची ही समाधानी वृत्ती माझ्यात थोड्याफार प्रमाणात तरी रु जली.
कॉस्ट -बेनिफिट अॅनालिसिस मी आता थोडंफार समजू लागलोय. पण गट्ट्यामधल्या माझ्या करिअरच्या महत्त्वाच्या वर्षांचं हेच विश्लेषण केलं तर पर्सनल आणि प्रोफेशनल करिअर दोघांमध्ये मला फक्त आणि फक्त फायदेच मिळाले आहेत. असे काही मूर्त आणि अमूर्त फायदे तुम्हीसुद्धा अनुभवून बघा. चला तर मग, ‘करके देखो!’