मूठभर बदामाची मऊ किमया
By admin | Published: March 16, 2017 10:38 PM2017-03-16T22:38:56+5:302017-03-16T22:38:56+5:30
हल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं? या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच.
- डॉ. निर्मला शेट्टी
कोरडी रखरखीत त्वचा
आणि राठ केसांवरचा उपाय
कोणत्या दुकानात नाही तर
मूठभर बदामात
नक्की सापडेल!
हल्ली शहरांमध्ये जागोजागी कॉस्मेटिक्सची दुकानं आहेत. समजा ही दुकानं नसती तर काय झालं असतं? या प्रश्नासरशी मनात थोडी भिती येतेच. कारण ही दुकान नसती तर आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी कोणी घेतली असते?
खरंतर या प्रश्नाचं उत्तर म्हणून आणखी एक प्रश्न. पूर्वी ही कॉस्मेटिक्सची दुकानं नव्हती तेव्हा आपल्या आई आजीचं काय नुकसान होत होतं? आपल्या केसांची आणि त्वचेची काळजी त्या कशा घेत होत्या? त्या तर स्वयंपाकघरात जे उपलब्ध असेल ते चेहेऱ्याला आणि केसांना लावून मोकळ्या व्हायच्या.
रोजच्या वापरातल्या भाज्या आणि फळांची ताकद जी आपल्या आई आजीला माहित होती ती आपल्याला का नाही? आयत्या कॉस्मेटिक्सच्या पर्यांयामुळे या नैसर्गिक उपायांच्या ताकदीकडे आपलं दुर्लक्ष होतय हेच खरं.
भाज्यांमध्ये-फळांमध्ये एक नैसर्गिक ताकद असते. शरीरस्वास्थ्यं राखण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्या आहारात भाज्या आणि फळं महत्त्वाची असतात. तशीच सुंदर दिसण्यासाठीही यांचा उपयोग होवू शकतो.
ज्याकाळी आजच्यासारख्या शेकडो कॉस्मेटिक क्रीम्स नव्हत्या त्याकाळी बायका आपल्या स्वयंपाकघरातलीच साधनं वापरुन सौंदर्याची निगा राखत. लिंबू, टमाटा, बटाटा ही तर अगदी हक्काची साधनं. ते वापरुन त्वचा आणि केस सुंदर ठेवण्याचे अनेक प्रयोग केले जात. आपणही हे प्रयोग सहज करू शकतो.
आता बदामाचंच उदाहरण घेवू. आपल्या घरात बदाम हे नेहेमी असू द्यावेत. मान्य आहे की बदाम महाग असतात. पण तरीही त्याच्या वापराचे फायदेही खूप आहेत. त्यादृष्टीनं बदाम वापरायला लागलं की न परवडणारे बदाम इतर उपायांपेक्षा खूप किफायतशीर वाटू लागतात.
त्वचा निस्तेज दिसू लागली, तरूण वयातही चेहेऱ्यावर सुरकुत्या आणि डोळ्याखाली काळी वर्तुळं दिसू लागली, त्वचा कमालीची कोरडी झाली की समजावं आपल्याला बदाम वापरण्याची तातडीनं गरज आहे.
रोज सकाळी दोन किंवा तीन भिजवलेले बदाम खाल्ल्यास शरीराला आवश्यक असलेली जीवनसत्त्वं, खनिजं, कॅल्शियम आणि प्रथिनं मिळतात. बदामाचेही प्रकार असतात. कडसर बदाम हे खाण्यासाठी वापरू नयेत. या बदामात प्रूसिक नावाचं अॅसिड असतं. ज्याचा उपयोग तेल आणि अत्तरं बनवतांना केला जातो.
बदाम खावून जसं शरीराचं पोषण होतं तसंच ते केसांना आणि त्वचेला लावलं तर त्यांचंही पोषण उत्तम होतं.
राठ केसांसाठी बदामाचं दूध
केस राठ झाले असतील, केसांची चमक गेल्यासारखं वाटत असेल तर केसांच्या मुळांना पोषक तत्त्वंच मिळत नाहीत हे समजून घ्यावं. ही पोषकता बदामाच्या दुधात असते.
हे बदामाचं दूध करणंही एकदम सोपं. त्यासाठी अर्धा कप बदाम आदल्या रात्री पाण्यात भिजत घालावेत. सकाळी भिजलेले बदाम सोलावेत. सोललेले बदाम कपभर पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. गाळणीनं बदामाचं दूध गाळून घ्यावं. दुधात बदामाचा रवाळपणा अजिबात राहता कामा नये. या मिश्रणात आता दोन चमचे बदामाचं तेल घालावं. हे लोशन थोडं थोडं हातावर घेवून त्यानं केसांच्या मुळांची हलक्या हातानं मालिश करावी. केसांच्या मुळापासून केसांच्या टोकापर्यंत हे लोशन लावलं गेलं पाहिजे. लोशन लावल्यानंतर अर्धा तास सुकू द्यावं. नंतर सौम्य हर्बल शाम्पूनं केस धुवावेत. कंडीशनरसाठी कोरफडीच्या गराचा उपयोग करावा.
निस्तेज त्वचेसाठी बदामाची पेस्ट
चेहरा निस्तेज होवून त्यावरच्या सुरकुत्या वाढत असतील तर बदामाची पेस्ट लावणं उत्तम. ही पेस्ट करताना बदाम पाण्यात भिजवण्यापेक्षा उकळून घ्यावेत. बदामाची सालं काढून घ्यावीत. असे अर्धा कप सोललेले बदाम दूध घालून वाटून घ्यावेत. बदामाची ही मऊसर पेस्ट चेहरा आणि मानेला लावावी. चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास या पेस्टने चेहऱ्याला मसाज करावा. यामुळे त्वचेखालच्या तैलग्रंथी जागृत होतात आणित्वचेचा कोरडेपणा कमी होतो. हात आणि पायाची त्वचा कोरडी असणाऱ्यांनी बदामाची पेस्ट लावल्यास त्याचा फायदा होतो.