चिंध्या पांघरूण सोनं विकताय?- ते कोण आणि का घेईल ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 04:36 PM2019-06-13T16:36:17+5:302019-06-13T16:37:03+5:30

सॉफ्ट स्किल्स फार महत्त्वाचे असं सगळेच म्हणतात. मात्र सॉफ्ट स्किल्स म्हणजे नेमकं काय? बदलत्या काळात कोणत्या स्किल्सना ‘सॉफ्ट’ म्हणायचं?

soft skills are changing,better understand how to use it! | चिंध्या पांघरूण सोनं विकताय?- ते कोण आणि का घेईल ?

चिंध्या पांघरूण सोनं विकताय?- ते कोण आणि का घेईल ?

Next
ठळक मुद्देकरिअर घडवणारं आणि बिघडवणारं हे प्रकरण सोपं नाही, ते का?

- डॉ. भूषण केळकर

सॉफ्ट स्किल्स हा शब्द हल्ली सर्रास वापरला जातो.
हा शब्द इतका सहज वापरता येतो की, त्यातलं सगळ्यांना सगळं कळतं असंही अनेकांना वाटतं. मात्र प्रत्यक्षात तसं नाही.
मला सॉफ्ट स्किल्स म्हटलं की, सुधाकर गायधनी यांच्या काही ओळी आठवतात. 
आम्ही चिंध्या पांघरूण 
सोनं विकायला बसलो, 
गिर्‍हाईक फिरकता फिरकेना।
सोनं पांघरूण 
चिंध्या विकत बसलो,
गर्दी पेलता पेलवेना !!
मला तर वाटलं की, ‘सॉफ्ट स्किल्स’ म्हणजे नेमकी काय, याचं ‘सार’ 60 वर्षापूर्वीच या कवितेनं सांगून टाकलं आहे. 
तुम्हाला आठवत असेल, ऑक्सिजन पुरवणीतूनच मी ‘इंडस्ट्री 4.0’च्या विषयावर संवाद साधला होता. काळ कसा वेगानं बदलतो आहे याविषयी आपण बोललो. या बदलत्या काळात टिकायचं तर आपल्याकडे कुठले सॉफ्ट स्किल्स हवेत याविषयी आता बोलू. 
सॉफ्ट स्किल्स ही गोष्ट किंवा संकल्पना खरं तर आता घासून घासून गुळगुळीत झाली आहे. लाइफ स्किल्स, सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स इत्यादी नावांनी ते ओळखले जातात. परंतु मला वाटतं की, या कौशल्यांविषयी वरवर बोलण्यापेक्षा आपण त्याच्या गाभ्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. एकत्रितपणे !
सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय नाही?
मला वाटतं की सॉफ्ट स्किल्स म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यापूर्वी आपण सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय ‘नाही’ हे आपण आधी पाहू. म्हणजे ते काय ‘आहे’ हे कळायला अधिक मदत होईल. आणि आपल्या संवादाला टोक आणि सहजता येईल.
1) गोडगोड बोलणं, पुढं पुढं करणे आणि यांसारख्या अनेक गोष्टी यांचा संबंध ‘सॉफ्ट स्किल्स’शी जोडला जातो. आपण हे लक्षात घेऊ की सॉफ्ट स्किल्स यापेक्षा खूप वेगळे आहेत.
2) संभाषण कौशल्यं म्हणजे सॉफ्ट स्किल्स असं काहीजण मानतात. आणि त्याचा अर्थ काय काढतात तर  फाडफाड इंग्रजी बोलता येणं. मी तुम्हाला ठामपणे आणि शपथेवर सांगतो, हो अगदी स्टॅम्प पेपरवर  लिहून द्यायलापण तयार आहे की, केवळ इंग्रजी छान येणं म्हणजे चांगलं संभाषण कौशल्य नव्हे. इतकंच नाही तर इंग्रजी जेमतेम असणार्‍या अनेक लोकांचं कम्युनिकेशन स्किल्स किंवा संभाषण कौशल्य हे विलक्षण परिणामकारक असल्याचा अनुभव मी स्वतर्‍ घेतलाय आणि तोही जगभर !
3) तुम्हाला एक उदाहरण देतो इंग्लंडमध्ये मी आयबीएमसाठी रिक्रूटमेण्ट करत असताना इंजिनिअर असणार्‍या एका मुलाला विचारलं की, तुझा फायनल इअर प्रोजेक्ट काय होता ते मला विस्तृतपणे सांग. हा मुलगा पूर्णपणे गोंधळलेला होता त्याच्याच प्रोजेक्टविषयी सांगायला कुठून सुरुवात करावी हे त्याला कळेना, त्यामुळे पुढचं सगळं गाडच अडलं. अर्थात त्याची निवड आम्ही केली नाही.
आता बघा हा मुलगा होता इंग्लंडमधला ! मी त्याची इंग्रजीतून मुलाखत घेत होतो. माझं सारं शिक्षण झालं मराठीतूनच. त्याची मातृभाषा इंग्रजी तरी त्याला उत्तर देता आलं नाही कारण त्याला इंग्रजी येत होतं; पण संभाषण कौशल्य त्याच्याकडे नव्हतं.
4) मित्रमैत्रिणींनो, ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की, इंग्रजी त्याची मातृभाषाच नव्हती तर पितृभाषा होती, काकाभाषा होती, आत्याभाषा होती आणि आजी-आजोबा भाषासुद्धा होती. ती त्याच्या रोमारोमात होती ! तरी त्याच्या तोंडातून शब्द फुटेना.  म्हणून म्हणतो की हे सॉफ्ट स्किल्स प्रकरण इतकं साधं नाही.
5) चांगला पाडलेला भांग, छान कपडे आणि फाड्फाड् इंग्लिश ‘सकट’ भारी स्मार्ट ‘दिसणं’, या खूप पलीकडे आहेत ती सॉफ्ट स्किल्स. चांगली सॉफ्ट स्किल्स तुम्हाला आत्मविश्वास देतील, यशस्वी बनवतील आणि एखाद दुसरी नोकरीच नाही तर उत्तम ‘करिअर’ देतील.
6) म्हणून आपल्याला सॉफ्ट स्किल्सची नीट ओळख करून घ्यायची आहे ती ‘लंबी रेस का घोडा’ होऊन करिअरचा अश्वमेध जिंकण्यासाठी !!


(लेखक आयटी तज्ज्ञ आणि करिअर काउन्सिलर आहेत.)
 

Web Title: soft skills are changing,better understand how to use it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.