सोलापूर-पोखरापूर आणि डायरेक्ट दिल्ली

By admin | Published: March 15, 2017 06:58 PM2017-03-15T18:58:42+5:302017-03-15T19:25:03+5:30

मी मूळचा सोलापूरचा. जन्मापासून वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत मी सोलापुरातच वाढलो. सोलापूर हे एक छोटसं पण बहुभाषिक न् सांस्कृतिक शहर.

Solapur-Pokhrapur and Direct Delhi | सोलापूर-पोखरापूर आणि डायरेक्ट दिल्ली

सोलापूर-पोखरापूर आणि डायरेक्ट दिल्ली

Next

- मंदार कांबळे


नवोदय विद्यालयात शिकण्याची संधी मिळाली
म्हणून वयाच्या ११ व्या वर्षी घर सोडलं.
सोलापूर-सांगलीत शाळा-कॉलेजातले
धडे शिकवले
आणि त्या धड्यांनी
युपीएस्सीची वाट दाखवली
जी आता खुणावते आहे
त्या दिशेनं..

मी मूळचा सोलापूरचा. जन्मापासून वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत मी सोलापुरातच वाढलो. सोलापूर हे एक छोटसं पण बहुभाषिक न् सांस्कृतिक शहर. इथं चौक बदलला की भाषा बदलते. भाषेचं हे बाळकडू घेऊन मी इथल्या प्रसिद्ध अशा नूतन मराठी विद्यालय आणि हरिभाई देवकरण प्रशालेत इयत्ता पाचवीपर्यंत शिकलो.
प्राथमिक शिक्षण संपल्यावर खेड्यातील मुले हायस्कूलसाठी शहरात जातात. मी मात्र शहर सोडून पोखरापूर (ता. मोहोळ) या खेड्यातल्या माळरानावरील जवाहर नवोदय विद्यालयात दाखल झालो. शाळा जरी खेड्यात असली तरी शाळेतलं वातावरण भलतंच आधुनिक होतं. ५१ एकराचा विस्तीर्ण परिसर, अमाप झाडं, सुंदर दगडी इमारत अन् चकाचक डोर्मेट्रिज. शाळेत इंटरनेट सोडून बाकी सगळ्या सुविधा होत्या. ती इंटरनेट अन् मोबाइल फोनच्या सुवर्णक्रांतीची नुकतीच सुरुवात होती. शाळेतला शिक्षक वर्ग बहुप्रांतीय होता. इथेच हिंदी अन् इंग्रजीचे संस्कार घडले. शिक्षण, खेळ, संगीत, शिस्त आदि सगळ्याच बाबतीत ही शाळा अव्वल होती. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कल्पनेतील आधुनिक भारत घडविण्यासाठी अष्टपैलू विद्यार्थी घडवण्याचं काम ही शाळा (आणि भारतातील अन्य ५०० हून अधिक नवोदय विद्यालय) अजूनही करतेच आहे. शाळेत दरवर्षी फक्त ८० मुलांनाच प्रवेश दिला जातो. मर्यादित विद्यार्थीसंख्या आणि होस्टेल अनिवार्य असल्यामुळे ही शाळा एक मोठं कुटुंबच होती. त्यामुळे शाळेत मित्र कमी अन् भाऊ-बहीण जास्त मिळाले. आजही आम्हा सगळ्यांमध्ये तोच प्रेमाचा ओलावा कायम आहे.
विविध शैक्षणिक आणि क्रीडा स्पर्धांसाठी भारतभर फिरण्याची संधी या शाळेनं मिळवून दिली. वयाच्या सोळाव्या वर्षाआधीच मी अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, चंदीगढ, पतियाळा, नागपूर अशा शहरांना भेटी दिल्या. तिथल्या तात्पुरत्या वास्तव्यानंही बरंच काही शिकायला मिळालं. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं स्थलांतर खूप महत्त्वाचं होतं. स्वत:ला ओळखायला आणि आजमावयाला या स्थलांतरानं शिकवलं. नवीन नाती जोडायला इथंच शिकलो. महत्त्वाचं म्हणजे कितीही विपरीत परिस्थितीशी जुळवून घेण्याचं तंत्र या शालेय जीवनात आत्मसात करता आलं ज्याचा उपयोग पुढच्या प्रत्येक स्थलांतरावेळी झाला.
बारावीनंतर इंजिनिअरिंग करायचं ठरवलं होतं. अभ्यासात गती होती, पुण्याच्या सीओईपीला प्रवेश घ्यायचा हे एकच मर्यादित लक्ष. सीईटीला अपेक्षेपेक्षा थोडे कमी मार्क्स मिळाले आणि सांगलीच्या वालचंद कॉलेजमध्ये नाइलाजानं प्रवेश घ्यावा लागला. वालचंद कॉलेजमध्ये अकॅडमिक्स सोबतच इतर गोष्टींना भरपूर वाव मिळाला. कॉलेज पॉलिटिक्स हा प्रकार इथे अनुभवला. रॅगिंग हे फक्त भिंतीवर लावलेल्या वार्निंग बोर्डवरच वाचलं; पण प्रांतवाद जागोजागी दिसून यायचा. मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र (यात सोलापूर, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, पुणे, नगर हे वेगळे प्रांत) या प्रांतांतील विद्यार्थी आपापल्या प्रांतातच मित्र शोधायचे. वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा महोत्सव, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका अन् फे्रशर्स पार्टीच्या कारणानं प्रांतवाद उबाळून यायचा. सगळीच माणसं दिसतात तशी नसतात हे या कॉलेजमध्ये आल्यावर समजायला लागलं. यातून व्यावहारिक जगात आपला निभाव लागण्यासाठी काय करावं आणि काय करू नये हे शिकता आलं. शेवटच्या वर्षाला कॅम्पस प्लेसमेंटसाठी मुलाखती देताना कळून चुकलं की आयुष्यभर कॉम्प्युटर इंजिनिअर बनून जगणं आपल्याला जमणार नाही. वर्ग प्रतिनिधी, क्रीडा सचिव आणि विद्यार्थी परिषद सदस्य म्हणून काम करताना स्वत:च्या क्षमतेचा आणि जबाबदारीचा अनुभव आला. कॉलेजमध्ये असतानाच विविध सामाजिक समस्यांची जाणीव होऊ लागली. समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा इथंच मिळाली. सांगलीने जीवनाला एक दिशा दिली. कंपनी जॉइन न करता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करायचं ठरवलं अन् बार्टी (बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे)ची शिष्यवृत्ती मिळवून दिल्लीला दाखल झालो.
डायरेक्ट दिल्लीच.
राजधानी दिल्लीमध्ये येऊन राहण्याचा कधी स्वप्नात ही विचार केला नव्हता. बार्टीकडून एका नावाजलेल्या कोचिंग क्लासमध्ये प्रवेश मिळाला आणि दिल्लीच्या गजबजलेल्या करोल बाग एरियामध्ये मुक्काम पडला. एका छोट्या शहरातून थेट देशाच्या राजधानीत आल्यावर उत्सुकतेपोटी काय करू अन काय नको असे होत होतं. हे स्थलांतर म्हणजे एक प्रकारचा ‘कल्चरल शॉक’च होता. क्लासमध्ये रोज सहा ते सात तास जायचे. सुटी मिळण्याची शक्यता फार कमी. व्यावसायिकता हा गुण दिल्लीतल्या या कोचिंग क्लासमध्ये ठासून भरलाय. ‘वेळेपेक्षा महत्त्वाचं असं जगात काहीच नाही’ हे इथल्या संचालकांचं ब्रीद. लेक्चर संपून उरलेल्या वेळात दिल्लीतल्या लाल किल्ला, चांदणी चौक, इंडिया गेट, कनॉट प्लेस, कुतूबमिनार, प्रगती मैदान, पुराना किला इ. ठिकाणी भेटी दिल्या. दिल्ली मेट्रो ही राजधानीची लाइफ लाइन, मेट्रोमध्ये प्रवासाचा अनुभव सुखद असाच आहे. समाजातली गरीब-श्रीमंत ही दुरी दिल्लीमध्ये ठिकठिकाणी दिसून येते. एकाच रस्त्यावर बीएमडब्ल्यू, आॅडी, मर्सिडीज आणि पोर्शे अशा चकाचक गाड्या आणि सायकलरिक्षा ओढणारे गरीब पुरुष हा सीन दिल्लीतच दिसतो. एकावर एक चढवलेले मजले अन् दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारती, दोन इमारतींच्या मधल्याजागेमधून जेमतेम एक-दोनच लोक जाऊ शकतात.
दिल्लीतली खाद्यसंस्कृती महाराष्ट्रापेक्षा अगदीच निराळी. रोजच्या जेवणात बटाटा अन् बटर हे दोन पदार्थ अनिवार्यच. रोजच्या या खाण्यामुळे वजन वाढायला लागलं. दिल्लीतल्या हवामानात कमालीची तफावत आढळून येते. तिथला उन्हाळा सोलापूरपेक्षा कडक अन् थंडी त्याहून कडक. दिल्लीमध्ये बऱ्याच प्रकारची माणसं भेटली, काहीजण अत्यंत हुशार तर काहीजण अतिविचित्र. राजेंद्रनगरच्या चहाच्या टपरीवर बसून माणसांचं निरीक्षण करायचा एक छंदच लागला.
एकामागोमाग एक घडलेल्या या स्थलांतरानं आयुष्यात बरंच काही शिकवलंय. आता लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालो तर अजून अशी बरीच स्थलांतर आणि प्रवास वाट्याला येतील...
त्या साऱ्याची ओढ आहे..
त्या भटकंतीची ओढ आहे...
 

Web Title: Solapur-Pokhrapur and Direct Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.