आई-बाप जिवंतपणी आपल्याच मुलांचं श्राद्ध घालतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 03:42 PM2019-06-13T15:42:06+5:302019-06-13T15:42:31+5:30

ऑनर किलिंगच्या घटना घडतात, बातम्या होतात, समाज माध्यमात संताप व्यक्त होतो मात्र पुढे काय? हे प्रकार थांबत का नाहीत?

special ground report about honer killing in Ahamdnagar district in Maharashtra! why love becomes enemy for parents? | आई-बाप जिवंतपणी आपल्याच मुलांचं श्राद्ध घालतात?

आई-बाप जिवंतपणी आपल्याच मुलांचं श्राद्ध घालतात?

ठळक मुद्देऑनर किलिंगचं रक्त लागलेल्या अहमदनगर जिल्ह्यांतल्या गावखेडय़ात भेटलेले काही क्रूर प्रश्न

- साहेबराव नरसाळे

गावाच्या पूव्रेस एक स्मशानभूमी़ त्या स्मशानभूमीत दशक्रिया विधीचा कार्यक्रम सुरू आह़े शाळा मास्तर आणि मास्तरीण असलेली त्याची पत्नी आपल्याच तरण्याताठय़ा मुलीचं पिंडदान घालत आहेत़ तिच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून अख्ख्या गावाला गोड जेवण देत आहेत़ ती त्यांची एकुलती एक मुलगी़ अकाली गेली म्हणून आईवडील शोक करताहेत.
 .. अर्थात ती खरंच गेली नव्हती, तर त्यांच्यासाठी ती ‘मेली’ होती़ तिच्या जिवंतपणीच आई-बापानं तिचं पिंडदान घातलं आणि आख्खं गाव मिटक्या मारत तिच्या पिंडाचं गोड जेवण जेवलंही !
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातलं हे गाव़ गावातल्या एका मुलीनं प्रेमविवाह केला होता़ शिक्षक असलेल्या पतीसोबत तिनं सुखी संसार थाटला होता़ फक्त तिचा पती तिच्या जातीचा नव्हता़ इथच माशी शिंकली अन् तिच्या बापानं गावभर दवंडी पिटली, ‘आमची मुलगी मेली हो!’
‘ऑनर किलिंग !’ यापेक्षा भयानक काय असू शकतं?
सामाजिक प्रतिष्ठेसाठी स्वतर्‍च्या मुलीचं जिवंतपणीच पिंडदान घालणारा बाप? मुलगी मेल्याचं सांगत रडून रडून स्वतर्‍तली माया आटवणारी आई? 
विश्वास तरी कसा ठेवायचा? 
पण हे खरं आह़े ती मुलगी आणि तिचा पती जिवंत आहेत़ उच्चशिक्षित आहेत. दोघेही शिक्षक आहेत़ स्वतर्‍चं जग त्यांनी निर्माण केलंय; तेही  ‘ऑनर किलिंग’च्या या आगीत होरपळूऩ 
म्हणायला ती मुलगी जिवंत आहे; पण अग्निडागाचे चटके सोसत जगतेय. 
****
नेवासा (जि़ अहमदनगर) येथे मुलीनं आंतरजातीय विवाह केला म्हणून बापानंच मुलीला मारून टाकलं़ आपल्याच हातानं तिचं सरण पेटवलं़ त्याचवेळी तेथे पोहोचलेल्या जावयाला ‘ते बघ़़ ते सरण जळतंय ना ते तुझ्या बायकोचं आहे, असं सांगण्याचं धारिष्टय़ही त्याच बापानं दाखवलं़ कायद्याची भीतीही त्याला उरली नाही़  एव्हढा मोठा असतो अहंकार? एव्हढी मोठी असते प्रतिष्ठा? जी आपल्याच लेकराला  किडय़ा-मुंग्यांना रगडावं तसं ठेचून मारण्यार्पयत क्रूर बनवते.
****
 नगर तालुक्यातील एका खेडेगावातील 15 वर्षाची मुलगी़ वयाने तिच्या पेक्षा चार वर्षानी मोठा असलेल्या मुलाच्या प्रेमात पडत़े पंढरीच्या पांडुरंगाला साक्षी ठेवून लग्नगाठ बांधतात़ दोन वर्षे संसार करतात़ इकडे आई-बापांनी मुलगी मेली म्हणून सोडून दिलेली असते आणि एक दिवस तीच मुलगी नवर्‍याशी पटत नाही, म्हणून निम्या रात्री आई-बापाचं दार ठोठावत़े त्यावेळी ती असते 17 वर्षाची़ बगलेत तहानेलं बाऴ आई-बाप तिला घरात घेतात़ पण ते बाळ त्यांना नको असतं़ त्याला मारून टाक, अनाथालयात सोड असा पालकांचा हट्ट़ शेवटी ती मुलासह एका बालगृहात येऊन राहत़े तिथेही बाळ मारून टाक आणि तुझं उर्वरित आयुष्य सुखानं जगायला मोकळी हो, असा सल्ला मिळतो़ आई-बापांनी नाकारलं, नवर्‍यानं टाकलं आणि बालगृहातही पोटच्या गोळ्याला लोकं मारायला टपलेत, या भावनेनं ती रात्रीच बालगृहातून पळ काढत़े 
***
निघोजचे जळीतकांडही प्रेमविवाह केल्यानंतर पती-पत्नीत उडालेल्या भांडणाचाच आगडोंब आह़े मनं जुळण्याअगोदरच एक होण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं हे फलित़ 
***
अशा अनेक कहाण्या असतात़ त्यामुळे पालकही मुला/मुलींच्या प्रेमावर विश्वास ठेवायला तयार नसतात़ मुलं/मुली जे सांगतात ते प्रेम की निव्वळ शारीरिक आकर्षण हे समजणंच पालकांसाठी अवघड होऊन बसतं़ आणि त्यात समाजाची इज्जत. जातीचे रेटे. समाजाचा धाक हे सारं इतकं करकचून बांधून घातलं की मुलामुलीचं प्रेम म्हटलं तरी पालकांच्या अंगाची लाहीलाही होत़े एकतर त्या मुलाला मारहाण करून तिचा नाद सोडायला सांगितला जातो किंवा मुलीचं शिक्षण थांबवून तिला घरात कोंडलं जातं़ नंतर पालकांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न लावून दिलं जातं़ त्यांची मनं जुळतातच असंही नसतं़ मन मारून समायोजन करण्यातला हा प्रकाऱ  
***
नेवासा, जामखेड (जि़ अहमदनगर), बीड, बुलढाणा, धुळे, सोलापूर येथील हत्याकांड याच अहंकारापोटी, खोटय़ा प्रतिष्ठेपोटी घडलेत़ जागांची, माणसांची नावं तेवढी बदलतात. ‘ऑनर किलिंग’चे प्रकार होतातच. 
का होत असेल असं? 
एरव्ही मुला/मुलींनं न सांगताही त्यांचं मन जाणणार्‍या आई-बापांना प्रतिष्ठेच्या बुरख्याआड यातलं काहीच दिसत नसेल का? तुला अमुकतमुक बनायचंय, तू आमचं नाक आहेस, घराचा दिवा/ पणती आहेस, मुलगी घराची इज्जत आणि मुलगा घराचा मानसन्मान, अशी प्रतिष्ठेची शिकवण लहानपणापासून दिली जात़े आणि त्यापलीकडे तरुण मुलामुलींनी काहीही करणं आजही समाजाला मान्य नाही.
हे सारं कुठवर चालणार?
कोण थांबवणार?
प्रश्न आहेतच.
उत्तरं.. ती तरुण मुलंमुली शोधतील का?

*****************

आईवडील-भाऊबहिणी
प्रेमात व्हिलन का होतात?

‘ऑनर किलिंग’च्या घटनांमध्ये सर्रास बाप, भाऊ ‘व्हिलन’ दिसतात़ ते खरोखरच इतके क्रूर का होतात? अशी कोणती शक्ती असते की ती आपल्याच मुलाचा बळी घेण्यास बापाला भाग पाडते? यातील अनेक घटनांचा अभ्यास केल्यानंतर, पोलीस अधिकार्‍यांशी बोललण्यानंतर निघालेले हे काही निष्कर्ष र्‍-
1. जात, आर्थिक पत, प्रतिष्ठा आणि पुरुषी मानसिकता हे घटक ‘ऑनर किलिंग’ला कारणीभूत ठरतात़ एकीकडे जात हा घटक कमकुवत करायचा असेल तर आंतरजातीय विवाह झाले पाहिजेत़ त्यांची संख्या वाढली पाहिजे, असा मतप्रवाह मांडला जातो़ पण जातीचा पगडा, त्याला चिकटून आलेल्या प्रतिष्ठेची अप्रतिष्ठा करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही़ त्यामुळेच ‘ऑनर किलिंग’च्या 70 टक्के घटनांमध्ये जात हा घटक प्रमुख कारण असतो, असे पोलिसांचे म्हणणे आह़े
2. मुलीने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला तर कुळाला बट्टा लागला, पोरीनं घर बाटवलं, असं जाहीरपणे बोललं जातं़ त्या घराशी रोटी-बेटी व्यवहार बंद होतात़ एकप्रकारे त्या कुटुंबावरील हा बहिष्कारच़ असे बहिष्काराचे अनेक प्रकार समाजात पहायला मिळतात़ काही समाजात तर बहिष्कृत केलेल्यांचे नवे समाज निर्माण झालेत.
3. जातीचा प्रभाव ‘ऑनर किलिंग’च्या घटनांना बळ देतो़ यामध्ये त्या कुटुंबाची आर्थिक पत हे कारणही महत्त्वाचे ठरत़े जर मुलगा आर्थिक बाबींनी संपन्न असेल, मुलीला त्या घरात कशाचीच कमी पडणार नाही, असं पालकांचं ठाम मत झालं तर पालक दोघांनाही स्वीकारतात़ मात्र मुलगा सर्वच बाबींनी कमकुवत असेल तर ‘ऑनर किलिंग’चा धोका वाढतो. अशा घटनांमध्ये मुलगा, मुलगी दोघांचाही बळी जातो़ 
4. ‘ऑनर किलिंग’च्या 100 पैकी 99 घटनांमध्ये मुलीचा बळी गेलेला असतो, असे पोलीस सांगतात़ 


(साहेबराव लोकमतच्या अहमदनगर आवृत्तीत उपसंपादक आह़े)

Web Title: special ground report about honer killing in Ahamdnagar district in Maharashtra! why love becomes enemy for parents?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.