धारावी कुंभारवाडय़ातली दिवाळीपूर्वी ‘पणत्यांची’ दिवाळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:06 PM2018-11-01T16:06:16+5:302018-11-01T16:07:36+5:30

दिवाळी आता आपल्या उंबरठय़ावर उभी आहे. आनंदाची तोरणं दारावर चढायला आतूर आहेत. अशा वातावरणात मी भेटायला गेले मुंबईत धारावीतल्या कुंभारवाडय़ात. इथं लाखो पणत्या बनतात. इथले ‘तरुण’ हात दिवसाला 16-16 तास पणत्या बनवतात. रंगवतात. इथली ‘तरुण’ दिवाळी अशी कष्टात न्हालेली दिसते.

A special report from Dharavi Kumbharwada about making of Diya's for Diwali. | धारावी कुंभारवाडय़ातली दिवाळीपूर्वी ‘पणत्यांची’ दिवाळी!

धारावी कुंभारवाडय़ातली दिवाळीपूर्वी ‘पणत्यांची’ दिवाळी!

Next
ठळक मुद्देपणत्यांच्या समुद्रात भेटणारे उजळलेले काही दिवे आणि पणत्याही.

- स्नेहा मोरे

एकावेळी एकच माणूस कसाबसा आत जाईल एवढीशी जागा. 
चारही बाजूला लाकडाच्या गोल पात्यांवर ठेवलेल्या पणत्या. भगभगणार्‍या भट्टय़ा, धुराचे लोट, त्या धुराचा नाकात झिणझिणत शिरणारा मातकट वास. घराघरांत ठेवलेला मातीचा ढीग आणि रंग-मातीने माखलेली रंगीत माणसं.
हे चित्र आहे धारावीतल्या कुंभारवाडय़ाचं. गेली कैक र्वष धारावीत 90 फूट रोडच्या कुशीत वसलेल्या या कुंभारवाडय़ातली दिवाळी तुमच्या-आमच्या दिवाळीपेक्षा कितीतरी आधी सुरू होते.
आपल्या घरी उजळणारे दिवे इथं पणत्या म्हणून आकार घेतात. आणि त्या या वस्तीत फिरत्या चाकावरच्या या पणत्याच माणसांची दिवाळी उजळवून टाकतात.
दिवाळी तर आता आपल्या उंबरठय़ावर उभी आहे. आनंदाची तोरणं दारावर चढायला आतूर आहेत. अशा वातावरणात मी भेटायला गेले अशा माणसांना जे पणत्यांच्या रूपांत उजेड नि आनंद आपल्या घरी पाठवतात.
त्यातलंच मुंबईतलं हे एक ठिकाण म्हणजे धारावीतला कुंभारवाडा. इथं लाखो पणत्यांच्या समुद्रातून वाट काढत जाणं आणि प्रचंड घाईत कामाला जुंपलेल्या माणसांना या दिवसांत आपल्याशी बोलायला लावणं सोपं नसतं.
कसं असेल? एकेक क्षण इथं ‘दिवाळी’ जवळ येते आणि प्रत्येक पणती मला घडव - रंगव म्हणून हाका मारत असते.
त्या हाकांनाच ओ देत गल्लीबोळातून वाट काढत दिलं स्वतर्‍ला पणत्यांच्या समुद्रात ढकलून.
एका अरुंद गल्लीत पावलांमागून पाऊल टाकताना, शेकडो पणत्यांच्या नाजूक पसार्‍यातून पायवाट शोधताना पहिले भेटले अरविंद परमार. तिशीच्या आतबाहेरच असतील. त्यांचा हा पिढीजात व्यवसाय. आठवतं तसं ते सांगतात की, सुमारे किमान 160 वर्षे तरी आमचं घराणं या पणत्याच बनवत आहे. वेगवेगळे दिवे घडवत आहे. त्यांच्याशी गप्पा रंगल्या, पणत्या - त्यांचा सीझनल व्यवसाय असा विषय सुरूच होता तर ते म्हणाले, ‘बापजादेने किया है इसलिए बंद नही कर सकते, वरना रोजीरोटी के लिए और भी काम करते है!’ 
हे एक वाक्य बरंच काही सांगतं. हातातल्या पणत्यांवरचं प्रेमही आणि वाढत्या गरजांत नव्या कामातून मिळणार्‍या चार जास्त पैशांची आसही. ‘अभी देखो मेरे घर के 16 लोग रात दिन इक कर के दिया बनाते है!’ असं सांगताना मात्र परमारांच्या डोळ्यांत वेगळीच अभिमानाची चमक दिसते. त्यांच्या घरातली लहान मुलं, तरणी पोरं, आयाबाया सारेच पणत्यांना आकार देत होते.
गणपती विसर्जन झालं की लगेच या भागात दिवाळीची चाहूल लागते. पणत्या बनवण्याचं काम सुरू होतं, त्यानंतर सलग दिवाळीर्पयत दिवसाकाठी 16 तास काम चालतं. हाताला आराम नाहीच. गेल्या काही वर्षात चिनी मालामुळे काहीसा व्यवसायावर परिणाम झालाय तसा अशी खंत अरविंद व्यक्त करतात. मात्र अजूनही पणत्यांचं अप्रूप आहेच, त्यामुळं आमच्या हातांना काम आहे असं सांगत ते म्हणतात, ‘दिवाळीच्या दोन दिवस आधी मात्र आमचं काम आणि हे मार्केट बंद होतं, मग घरातल्या दिवाळीची तयारी आम्ही करतो. जिस साल बिझनेस अच्छा, उस साल दिवाली अच्छी! तो ही हमारी दिवाली बनती है, नही तो फिर सिर्फ  कुछ मीठा खिलाके दिवाली मनाते देखते है!’
अरविंदची साधारण चौथी-पाचवीत शिकणारी लेक तेवढय़ात आली. आणि आमच्या हातात कॅमेरा पाहून मस्त गप्पा मारायला लागली. ‘मुझे दिवाली में नया ड्रेस डाल के फुटू खिचना अच्छा लगता है, पर हमेशा पापा जल्दी दिलाता नही, राह देखनी पडती है!’ असं सांगत, दीदी मेरा भी फुटू निकालो ना म्हणत पोझ देत स्माइल करत ही पोरगी उभीच.
एवढय़ा पणत्यांच्या समुद्रात ही पणती अशी उजळून गेली काही क्षण आमच्यासाठी!
**
अजून आतातल्या गल्लीत शिरलो.
तेवढय़ात एक छोटुंसं पोरगं म्हणालं, दीदी, थोडा और अंदर चलो. उधर आधे दाम मे मिलेगा. बहुत फुटू भी खिचने देंगे! त्याच्या सोबत थोडं आतर्पयत चालून गेले. वाटेत वेडेवाकडे पत्रे, काचा ओलांडत तो छोटासा पोरगा पुढे नि मी त्याच्या मागे. एका घरातच धडकलो.
घरात एका बाजूला वरण-भाताचा कुकर एक तरुणी लावत होती. दुसर्‍या बाजूला पणत्यांवर कोन वर्क  करत दोन तरुण मुलं बसली होती. त्या तरण्या पोरांना हाक देणार तोच घरातून नव्वदीची म्हातारी डोक्यावर मोठय़ा थाळ्यात नुकतेच मुलानं बनवलेले मोठाले दिवे बाहेरच्या अंगणात सुकण्यासाठी घेऊन येताना दिसली, कॅमेरा पाहताच सुरकुत्यांच्या मागे लपलेलं तिचं हास्य दिलखुलासपणे ओसंडून वाहू लागलं. तिनं आग्रह करत आतल्या खोलीत नेलं. उन्हाची एक तिरीप छतातून उतरली होती. तेवढय़ा प्रकाशात तिचा मुलगा मातीने माखलेल्या कपडय़ांत  दिवे बनवायचे काम करत होता. मनजित मारू त्याचं नावं. आजोबा-पणजोबांनी 100हून अधिक वर्ष दिव्यांचा व्यवसाय केला म्हणून तोही करतोय. पस्तिशीचा मनजित म्हणाला, ‘मेरी नोकरी अच्छी है, घर पे सब दो टायम खाले इतना कमा लेता हूँ, पर क्या करू माँ को अभी भी लगता है, इतने सालो से शुरू है ये दियों काम तो मुझे भी करना चाहिए..’ अस म्हणत आई आतल्या खोलीत गेल्यानंतर तो दबक्या आवाजात पुन्हा सांगू लागला..
‘हर साल दिवाली से पहिले चार महिने पहले काम छोडना पडता है. फिर चार महिने बाद नया काम ढूँढना पडता है, पिछले बहुत सालो सें ऐसाही करता हूँ!’ 
बोलतानात त्याच्या डोळ्यात का कोण जाणे एक उदास झ्याक दिसते. तिकडं स्वयंपाक घरात डोकावलं तर त्याची प}ी दुपारच्या जेवणाची तयारी करता करता दुसर्‍या बाजूला पणत्यांवर कोन वर्क करण्याचं कामही करत होती. घराच्या कोपर्‍यात रचलेल्या दिव्यांच्या डोंगराशेजारी रांगत - रांगत दिव्यांच्या डोंगरात शिरणारा चिमुकला दिसला. मनजित सांगत होता, ‘अच्छा खासा माल बिका तो घर - घर में दिवाली होती है, वरना फिर आजूबाजू के लोग इकठ्ठे होके कुछ पैसा जमा कर के दिवाली मनाते है। पर इस साल मार्केट इतना अच्छा नही हैं, देखते है कैसी रहती है दिवाली.!’
अच्छीही होगी दिवाली म्हणत त्याच्या घरातून बाहेर पडले.
चालताना इथल्या गल्लीबोळात प्रत्येक घरातून रंगीत दिव्यांचा ढीग, मडकी, मातीचे मोठ्ठाले ढीग डोकावून पाहत होते. दुसरीकडे एवढय़ाशा गल्लीत लहानी लेकरं धावतात. रांगतात. काही जमेल तशी कामं करतात. लहान, तरुण सगळेच मुलंमुली कामाला जुंपलेले दिसतात. जो तो आपापल्या परीने 2-2 पणत्यांवर काम करतो. कुणी रंगकाम करतं, कुणी भट्टीतील दिवे काढतं. कुणी रचून ठेवतं, कुणी वाळायला ठेवतं.  इथली ‘तरुण’ दिवाळी अशी कष्टात न्हालेली दिसते.
इथं पणत्या बनतात त्या आपल्या घरी येऊन उजळतात, त्यांचे दिवे होतात.  इथं माणसांच्या कष्टांच्या समया सदैव तेवताना दिसतात.
दिवाळीच्या पोटातली ही पणत्यांची दिवाळी अशी साजरी होत राहते..

(छायाचित्र  -  दत्ता  खेडेकर )

इस दिवाली का एक सपना.

कुंभारवाडय़ातल्याच शेवटच्या टोकावर झोपडय़ात राहणारा राजवीर अवघ्या 28 वर्षाचा. एका झोपडीत आजी-आजोबांकडे राहतो. दिवसा शिकतो कॉलेजमध्ये आणि पार्टटाइम काम करतो. पण आता दिवाळीत दिव्यांच्या व्यवसायासाठी त्याने नोकरी सोडलीय. राजवीर सांगतो, ‘मेरेको मेरा सपना पुरा करना है, मेरे दो सपने है, एक तो मुझे बाइक लेनी है और गाँव माँ-बाप के लिए दिवाली के लिए पैसे भेजने है. तो दो सपने पुरे करने के लिए नौकरी छोड दी.’ आता तो कुंभारवाडय़ातल्या घाऊक व्यापार्‍यांकडे दिवे बनवण्यापासून ते रंगकाम, कोन वर्क , पँकिंग ही सगळी काम करतो. दिवसातले जेवढे तास देता येतील तितके देतो आणि एकच टाइम जेवतो. गेल्या 2-4 वर्षापासून त्याला बाइक घ्यायचीय, आवडत्या बाइकचा फोटो रोज उशाशी घेऊन झोपतो.
तो आत्मविश्वासानं सांगतो, ये दिवाली को मेरा सपना पुरा करनाही है! 

फुटू मत निकालो !

याच भागात काही विदेशी तर काही देशी फोटोग्राफर्स हातात कॅमेरा घेऊन शूट करताना दिसले. मात्र त्या कॅमेर्‍यांना नाही म्हणण्याचं बळही आता इथली माणसं दाखवू लागलीत. भट्टीत काम असलेल्या एका म्हातार्‍या आजोबाचे फोटो काढत असताना ते आजोबा एका फोटोग्राफरला पटकन म्हणाले, फुटू मत निकालो. हमेशा रोजीरोटी वक्तही आते हो, वरना पुछते भी नही. और फिर दिवाली मे आके कहते हो इधर खडे रहो, उधर खडे रहो. काम करें की नही?

कुंभारवाडा दिल है !

 एका छोटय़ाशा झोपडीवजा घरात  साधारण 80च्या वयात आलेले प्रेमजी गाणं गुणगुणतं दिव्यांना आकार देत होते, उत्तम मराठीत बोलत होते. म्हणाले, मी मूळचा राजस्थानचा; पण आता 60 र्वष झाली, आमचं कुटुंब या धारावीत येऊन. मग छान हसून म्हणाले, ‘खरं सांगतो, धारावी ही खरं तर माणूस आहे, आणि कुंभारवाडा त्याचं हृदय.’ तेवढय़ात डोक्यावर आणि दोन्ही हातात मोठ्ठाल्या थाळ्यात दिवे घेऊन येणारी त्याची प}ी आली. म्हणाली, यांना कुंभारवाडय़ाचं खूपचं कौतुक कारण याच मातीनं, इथल्या दिव्यांच्या घडण्यानं आमचं जगणं घडलंय. काही वर्षापूर्वी दिवाळीला दुसर्‍याच्या दारात जाऊन गोड खायचो, उंचच उंच सोसायटय़ांच्या गेटपाशी जाऊन दिवाळी पाहायचो, आता आमची हक्काची दिवाळी साजरी करतो. आम्हाला मूल-बाळी नाही; पण आम्ही गल्लीतल्या पोरांसाठी फटाके, मिठाई आणतो. दिवाळी करतो साजरी.

(स्नेहा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत आरोग्य वार्ताहर आहे.)

 

Web Title: A special report from Dharavi Kumbharwada about making of Diya's for Diwali.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.