`भांडकुदळ

By admin | Published: April 22, 2016 08:53 AM2016-04-22T08:53:53+5:302016-04-22T08:53:53+5:30

ऑनलाइन जरा कुठं आपल्या मताच्या विरोधी मत दिसलं की तुटूनच पडायचं. अर्वाच्य शिव्या द्यायच्या, टोकाची भाषा वापरत वैयक्तिक टीका करायची, धमक्या द्यायच्या हे सारं काय सांगतं? - आपले सभ्यतेचे मुखवटे ऑनलाइन उसवताहेत, इतकंच!!

`Spooky | `भांडकुदळ

`भांडकुदळ

Next
>एकानं जरा तिखट शब्दात फेसबुकवर आपलं मत रोखठोक मांडलं होतं. फक्त मत, ना कुणावर टीका ना टिप्पणी.
मात्र त्यावर कमेण्ट म्हणून काहीजणांनी जे लिहिलं होतं ते वाचवत नव्हतं.
अर्वाच्च शिव्या, घाणोरडी भाषा, निर्भर्त्सना, ओंगळवाणो शब्दप्रयोग, निंदानालस्ती, टोकाची व्यक्तिगत टीका, शाब्दिक हिंसेनं लडबडलेल्या त्या कमेंट्स. वाचून प्रश्नच पडला की इतका संताप, इतका विखार पेटावा असं त्या तरुणानं काय स्टेटस टाकलं होतं? तर काहीच नाही ! त्यानं फक्त त्याचं मत लिहिलं होतं. पण त्यावर कमेंट करणा:यांनी मात्र त्याचा जवळपास ऑनलाइन खून पाडला होता.
**
एक स्त्रीवादी मैत्रीण सांगत होती, ‘‘मोकळेपणानं लिहिलं, विचार मांडले की फ्रेंड लिस्टमधले अनेक पुरु ष अत्यंत असभ्य भाषेत मेसेजेस पाठवतात. पर्सनलवर अश्लील मेसेजेस करतात. घाणोरडय़ा शिव्या देतात. ‘आज रात आती है क्या..’ असं विचारण्यार्पयत अनेकांची मजल जाते. वरवर हे सारे पुरुष सभ्यतेचे मुखवटे चढवून वावरणारे पण आतून असले घाणोरडे. माणसाचं अंतर्मन आणि त्यातली घाण सोशल नेटवर्किगमुळे अशी बघायला मिळते आहे.’’
**
अशीच अजून एक मैत्रीण. स्त्रीवादी वगैरे नाही. नोकरदार, संसारी बाई. व्हॉट्सअॅप ग्रुपमधला एक मित्र तिला त्याच्या प्रेमसंबंधांतील ताणताणाव नेहमी सांगत असे. अर्थात प्रत्यक्ष नाही, तर मेसेजेसमधून. आपला मित्र अडचणीत आहे, त्याला योग्य सल्ला दिला पाहिजे या हेतूने तीही त्याच्याशी बोलत असे. हळूहळू मित्रने त्याच्या आणि त्याच्या प्रेयसीच्या लैंगिक जीवनाचा तपशील सांगायला सुरु वात केली. काहीशा अवघडलेल्या या मैत्रिणीने त्यावर आक्षेप घेतल्याबरोबर मित्रने तू कशी मैत्रीसाठी नालायक आहेस, फालतू आहेस असा पाढा लावला. 
हिला कळेना, कालर्पयत जो मित्र मैत्रीला आदर्शवत मानत होता तो अचानक इतका असभ्य कसा बोलू लागला?
**
व्हॉट्सअॅपवर तर कितीतरी ग्रुप्स असतात. प्रत्येकाच्या त्या ग्रुप्समध्ये पुरोगामी, कडवे जहाल, डावे-उजवे, फिल्मी, कलाप्रेमी असे अनेक ग्रुप्स असतात. त्यात चर्चा काय होते. कधी या टोकाची, कधी त्या. अनेकदा वाद, भांडणं, भयंकर विधानं आणि बेलाशक चुकीच्या माहितीची भलामण. 
आणि त्यावरून होणारी (नळावरची कमी वाटावीत) अशी प्रचंड संतापी भांडणं.
अशा कितीतरी घटना सांगता येतील, जिथे माणसांच्या मनातला टोकाचा द्वेष, घाणोरडय़ा भावना, संताप अनपेक्षितपणो व्यक्त होताना दिसतात. 
हे असं का होत असावं?
एरवी समोरासमोर, प्रत्यक्ष ज्या गोष्टी लोक एकमेकांना सांगणार नाहीत त्या सगळ्या गोष्टी ते सोशल नेटवर्किंगवरून बरळतात. आणि ते बरळताना कसलाच धरबंध नसतो. 
आणि मग प्रश्न पडतो की, एरवी सभ्य वाटणारे हे चेहरे सोशल नेटवर्किगवर इतके असभ्य का वागू लागतात? दिसतात?
विचार पटले नाहीत म्हणून एखाद्याला अत्यंत वाईट भाषेत बोलणं, शिव्या घालणं हे बौद्धिकतेचं लक्षण नाही. पण आताशा स्वत:ला बुद्धिमान समजणा:या लोकांमध्येही हा असमंजसपणा ठासून भरणं सुरू झालेलं दिसतं. अनेकदा तेही आपलंच खरं करण्यासाठी पातळी सोडून भाषेचा प्रयोग करतात.
खरंतर प्रत्यक्ष जगात वावरण्याचे काही संकेत आपण सारेच पाळतो. प्रत्येक समाजाप्रमाणो हे संकेत बदलतात. एकमेकांना भेटताना कसं भेटायचं, कसं बोलायचं, स्त्रियांशी कसं वागायचं याचे प्रत्येक समाजाचे काही संकेत असतात. आणि त्या त्या समाजातील लोक त्या संकेतांना धरून वागत असतात. 
पण सोशल नेटवर्किंगवर असे कुठलेही सामाजिक संकेत सध्या नाहीत. प्रत्यक्ष वागण्यात जो सभ्यपणा असतो तो आभासी जगात प्रतिक्रिया देताना गळून पडतो. शिवाय प्रतिक्रि या दिल्यानंतर लगेच कुणी तुमच्या अंगावर थेट धावून येणार नसतं. त्यामुळे काहीही आणि कुठल्याही थराला जाऊन बोललं तरी चालतं असा सर्वसाधारण समज होऊन बसला आहे. 
त्यामुळे घरबसल्या इतरांवर तोंडसुख घेणं सोपं होतं.
माणसाच्या मनातल्या पशूला मोकाट फिरण्याची संधी इंटरनेटवर मिळते. खोटे चेहरे घेऊनही इथं वावरता येतं आणि सुसाट बोलता येतं. इथं वाट्टेल ते करता येऊ शकतं. आणि त्यामुळेच इथले शाब्दिक व्यवहार अनेकदा विकृत स्वरूप धारण करतात. 
आणि मग प्रत्यक्षातला माणूस आणि आभासी जगातला माणूस यांच्यातलं अंतर जाणवायला लागतं.
प्रश्न फक्त एवढाच- मुखवटा नक्की कुठं चढवलेला असतो आणि कुठं गळून पडलेला असतो..
 
इमोटीचा भावनिक लोचा
 
हल्ली संवादासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी ऑनलाइन संभाषणात बहुतेकदा इमोटीकॉन वापरले जातात. मात्र संशोधक म्हणतात, माणसाच्या ख:या भावना हे इमोटीकॉन व्यक्त करू शकत नाही. अनेकदा माणसांना सांगायचं असतं वेगळंच आणि माणसं या इमोटीकॉन्सद्वारे व्यक्त होतात ते भलतंच.
त्यातून अनेकदा गैरसमज आणि गोंधळ निर्माण होतात. आणि संवाद भलतंच स्वरूप धारण करतो.
 
बोलू नये ते बोलण्याची मुभा
 
इंग्लंडमधल्या बर्मिगहॅम विद्यापीठात कम्युनिकेशनचे प्राध्यापक म्हणून काम करणा:या डेव हार्ट यांच्या अभ्यासानुसार, संवाद साधण्याच्या पद्धती सोशल नेटवर्किगमुळे पूर्णपणो बदलल्या आहेत. सोशल मीडिया आपल्याला अशा गोष्टी बोलण्याची संधी देतं ज्या आपण एरवी प्रत्यक्षात कधीही बोलत नाही. बोलू शकत नाही.
डेव यांच्या अभ्यासाचं म्हणणं हेच की, आपल्या प्रत्येकातल्या सुप्त राक्षसाला सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून बाहेर पडण्याची संधी मिळते. आणि एकमेकांचे विचार ऐकताना, त्या विचारांशी असहमती व्यक्त करताना आपण सभ्यता सोडून देतो.
का?
विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 
 
 
 
- मुक्ता चैतन्य
 
muktachaitanya11@gmail.com
( लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
 
 

Web Title: `Spooky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.