मैदान गाजवायचं कि ‘डिग्ऱ्या’ घ्यायच्या?
By समीर मराठे | Published: February 18, 2019 07:34 PM2019-02-18T19:34:08+5:302019-02-19T12:22:54+5:30
खेळ कि शैक्षणिक करिअर अशी वेळ खेळाडूंच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच. कोणतीही एकच गोष्ट निवडायची म्हटल्यावर त्यांची कुचंबणा होतेच, पण त्याबाबत आता सकारात्मक विचार होऊ लागलाय. आंतरराष्ट्रीय नेमबाज मनू भाकर आणि वीजयवीर सिधू हे त्याचं अगदी ताजं उदाहरण..
- समीर मराठे
अनेक तरुणांच्या आयुष्यात शैक्षणिक करिअर कि खेळातलं करिअर, शिक्षणाला प्राधान्य द्यायचं कि खेळाला, हा प्रश्न एका टप्प्यावर उभा राहतोच. विशेषत: खेळामध्ये ज्यावेळी त्यानं थोडं नाव कमावलेलं असतं आणि पुढचे अनेक टप्पे त्याला खुणावत असतात, त्याचवेळी शिक्षणाच्याही एका महत्त्वाच्या टप्प्यावर तो उभा असतो, तेव्हा ही गोची त्याची मानसिक आणि भावनिक कुतरओढ करतेच.
याच टप्प्यावर सर्वाधिक प्रेशर्सचा सामना त्याला करावा लागतो. अनेकदा तर अशी वेळ येते की काहीतरी एकच निवडायचं!
खेळ ही अशी गोष्ट आहे, जी तुमच्याकडून सर्वस्व मागत असते. ती तुमच्याकडून वेळ मागते, डेडिकेशन मागते, जिद्द मागते, समर्पण मागते, तुमचे कष्ट मागते, दिवसांमागून दिवस, महिन्यांमागून महिने आणि बऱ्याचदा वर्षांमागून वर्षं.. एक विलक्षण शिस्तीचा प्रवास तुम्हाला आखून घ्यावा लागतो. त्यात खंड चालत नाही, अंळमटळमपणा चालत नाही.
नेमक्या त्याचवेळी तुमचं शैक्षणिक करिअरही उभं राहत असतं. तुम्ही काय आणि कोणतं शिक्षण घेतलं, त्यात किती प्राविण्य मिळवलं यावरही तुमचं भवितव्य ठरणार असतं. शाळा, शिक्षक, पालक, समाज.. खेळापेक्षाही तुझ्या शैक्षणिक करिअरमध्ये तू काय केलंस, काय कमावलंस या अपेक्षेनं तुमच्याकडे डोळे लावून बसलेले असतात.
खेळातून खरंच पुढे आपण पुढे जाऊ का, अपेक्षित यश आपल्याला मिळेल का, आयुष्य जगण्यासाठी, आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी त्याचा कितपत उपयोग होईल याचीही चिंता खेळाडूला सतावत असते.
अनेक खेळाडूंच्या आयुष्यात हा टप्पा येतोच. खेळ तुम्हाला आवडत असतो, त्यासाठी तुम्ही तुमचं सर्वस्व आनंदानं पणाला लावलेलं असतं, वेळ, शक्ती, कष्ट, फोकस.. पण याच साºया गोष्टी शैक्षणिक करिअरही तुमच्याकडे त्याचवेळी मागत असतं.
एकाचवेळी या दोन्ही गोष्टींसाठी तितकं समर्पण देणं शक्य नाही.
सचिन तेंडुलकरचंच उदाहरण. लहानपणीच क्रिकेटमध्ये त्यानं इतकं नाव कमावलेलं होतं आणि देशाच्याही त्याच्याकडून तितक्याच अपेक्षा होत्या. सोळाव्या वर्षीच पाकिस्तानबरोबर तो आपली पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळला. साहजिकच सचिनला शैक्षणिक करिअरकडे दुर्लक्ष करावं लागलं. देशात किंवा देशाबाहेर कुठे ना कुठे मॅचेस चालू असायच्या; त्याचवेळी त्याची शाळेची परीक्षाही असायची. त्यामुळे दहावीत तब्बल तीन वेळा त्याला फेल व्हावं लागलं. आत्यंतिक इच्छा असूनही त्याचं शैक्षणिक करिअर फार पुढे जाऊ शकलं नाही. सचिनला आजही त्याबद्दल खेद आहे.
ग्रामीण आणि निमशहरीच नाही, तर शहरी आणि उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील खेळाडूंपुढेही बºयाचदा हा प्रश्न येतो. कुठल्यातरी महत्त्वाच्याआंतरराष्ट्रीय स्पर्धा असतानाच शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षाही आड येतात. काही जण स्पर्धांना प्राधान्य देतात, तर काही जण परीक्षांना. निर्णय कोणताही घेतला तरी नुकसान ठरलेलंच.
यंदाही तोच प्रश्न उभा राहिला तो आंतरराष्ट्रीय शूटर मनू भाकर आणि वीजयवीर सिधू यांच्यापुढे. दोघेही खेळाडू आत्ता बारावीत आहेत. बोर्डाच्या परीक्षा तोंडावर आहेत. मात्र याच दरम्यान २५ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत तैपेई चीन येथे आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पर्धाही आहे. दोघेही या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. पण २५ मार्चला मनूचा बारावी इतिहासाचा पेपर आहे, तर २९ मार्चला वीजयवीरचा मानसशास्त्राचा. दोघांनाही या परीक्षांना मुकावं लागणार आणि अर्थातच परीक्षेत नापासाचा ठप्पाही पडणार.
स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियानं (साई) मात्र ही बाब विचारात घेऊन थेट सीबीएसई बोर्डालाच विनंती केली, की या दोघा खेळाडूंचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या दोघांची परीक्षा नंतर घेण्यात यावी.
‘साई’चं हे पाऊल निश्चितच आशादायक आहे. ‘साई’ची ही विनंती बोर्ड मान्य करील अशी दाट शक्यता आहे. कारण गेल्या वर्षी असाच प्रकार शूटर अनिश भनवालाच्या बाबतीतही घडला होता. त्याची दहावीची परीक्षा होती, ‘साई’ने बोर्डाला विनंती केल्यानंतर त्याचे दहावीचे पेपर नंतर घेण्यात आले होते.
क्रीडा खाते स्वत:हून खेळाडूंच्या शैक्षणिक करिअरकडे लक्ष देतंय, त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची काळजी घेतंय, ही खेळ आणि खेळाडूसाठी नक्कीच सकारात्मक बाब आहे. अलीकडच्या काळात विद्यापीठ आणि बोर्ड त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करतंय, हीदेखील खूपच महत्त्वाची बाब. त्यामुळे अनेक खेळाडूंना खेळ आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाचवेळी सुरू ठेवणं शक्य होतंय.
काही वर्षांपूर्वी मात्र अशा सुविधांअभावी खेळाडूंचं खूप मोठं शैक्षणिक नुकसान झालं आणि आपल्या कुठल्यातरी करिअरवर पाणी सोडावं लागलं.
आता तसं घडणार नाही, अशी अपेक्षा अशा घटनांमुळे जागी झालीय..
कविता राऊत म्हणते, खेळ हवाच,
पण शिक्षणही; नाहीतर तुम्ही ‘लटकणार’!
मूळची नाशिकची असलेली भारतीय ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतच्या बाबतीतही स्पोर्ट्स करिअर की शैक्षणिक करिअर हा प्रश्न अनेकदा निर्माण झाला. देशासाठी खेळत असल्यानं अनेकदा शैक्षणिक करिअरकडे तिला दुर्लक्ष करावं लागलं. कारण ज्यावेळी तिची कुठली महत्त्वाची परीक्षा असायची, त्याचवेळी देशातर्फे कुठल्यातरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही तिचा सहभाग असे. त्यामुळे त्या त्या प्रत्येक वेळी तिला परीक्षेला मुकावं लागलं.
याचसंदर्भात कविताशी संपर्क साधला. कविताचं म्हणणं होतं, देशासाठी खेळणं माझ्यासाठी केव्हाही महत्त्वाचं होतं. त्यामुळे मी त्यालाच प्राधान्य दिलं. पण त्यामुळे माझ्या शैक्षणिक करिअरचंही खूपच नुकसान होतं. काही वेळा तर एखाद्या विषयाचा पेपर दिला आणि त्यानंतर लगेच कुठल्यातरी स्पर्धेला रवाना व्हावं लागायचं. त्यामुळे माझी ती परीक्षा राहून जायची. याच कारणामुळे अनेकदा माझ्या मार्कशिटवर ‘नापासा’चा शिक्काही मला पाहावा लागला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्पर्धासाठी मैदानावर रोज कित्येक तास घाम गाळावा लागत असला तरी शिक्षणातही मला तितकाच होता. काहीही झालं तरी मला किमान ग्रॅज्युएशन तरी करायचंच होतं. आजवर ज्या ज्या विषयांचे पेपर मी दिले, त्या प्रत्येकात उत्तीर्ण झाले, पण इतर विषयांचे पेपरच देता न आल्याने नापासाचा ठप्पा पडलाच.
शैक्षणिक करिअर महत्त्वाचं कि स्पोर्ट्सचं करिअर महत्त्वाचं, हे माझ्याइतकं चांगलं कोण सांगू शकणार? कारण त्याचा अनुभव मी घेतलाय आणि त्यानं मी पोळलेही आहे.
दहावीची परीक्षा मी उत्तीर्ण झाले २००२ला, पण मला ग्रॅज्युएट व्हायला २०१८ साल उजाडावं लागलं. बीए व्हायला दहावीनंतर तब्बल १६ वर्षं मला लागली.
तुम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धांत नाव गाजवलेलं असल, पण तुमचं शिक्षण कमी असलं, तुम्ही ग्रॅज्युएट नसलात तर काहीच फायदा नाही, याचा विदारक अनुभव मी घेतला आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत गोल्ड मेडल मिळवलेलं असून, आॅलिम्पिकसारख्या जगातल्या सर्वोच्च स्पर्धेत सहभाग असूनही सरकारी नोकरीत मला ‘क्लास थ्री’ची पोस्ट मिळाली. याचं कारण एकच, माझं ग्रॅज्युएशन नव्हतं. खरं तर आंतरराष्ट्रीय स्पर्धांत नाव कमावलेल्या खेळाडूंना क्लास वनची पोस्ट देण्याची तरतूद आपल्याकडे आहे, पण कोणीच त्याकडे गांभीर्यानं पाहात नाही. आजही माझी पोस्ट ‘क्लास टू’चीच आहे! त्यामुळे खेळ कि शिक्षण असा पेच तुमच्यासमोर उभा राहिला तरी, कोणताच पर्याय कमी नाही किंवा तोच योग्य असं म्हणता येत नाही. तुमच्याकडे दोन्ही गोष्टी हव्यातच. तरच त्याचा काही फायदा! नाहीतर तुम्हाला अधांतरीच लटकत राहावं लागणार! शासनानं आपल्या धोरणात मात्र त्यासाठी सकारात्मक बदल करायला हवा आणि तशी अंमलबजावणीही!
sameer.marathe@lokmat.com
(लेखक लोकमत वृत्तपत्रसमुहात उपवृत्तसंपादक आहेत.)