के. श्रीकांत Be The Hero
By admin | Published: April 2, 2015 06:13 PM2015-04-02T18:13:45+5:302015-04-02T18:13:45+5:30
सकाळी उठल्यापासून त्यादिवशी त्याचं डोकं ठणकत होतं. तो म्हणतच होता, डोकं दुखतंय! त्याच्या अकॅडमीत नस्ती दुख
Next
>-चिन्मय लेले
सकाळी उठल्यापासून त्यादिवशी त्याचं डोकं ठणकत होतं. तो म्हणतच होता, डोकं दुखतंय!
त्याच्या अकॅडमीत नस्ती दुखणीखुपणी सांगून सरावाला दांडी मारता येत नाही ! नस्ते लाड अजिबात खपवून घेतले जात नाहीत.
त्यादिवशी सराव संपला आणि कपडे बदलायला गेलेला ‘तो’ चेंजिंग रूममधेच कोसळला ! बेशुद्धच पडला, धावत-पळत त्याला दवाखान्यात आयसीयूत हलवलं. एक्स्पर्ट डॉक्टर्स आले, सर्जन आले. तातडीचे उपचार सुरू झाले. त्याचे प्रशिक्षक हतबल उभेच, होणार काय हे माहिती नव्हतं!
त्यातून तो सावरला, पण गेले सात महिने त्याच्यासाठी एक रोलर कोस्टरची राइडच होती! पोटात गोळा आणणारी, श्वास गच्च रोखून धरणारी, ही त्याची गोष्ट!
किदंबी श्रीकांत
त्याचं नाव!
पुरुष बॅडमिण्टनच्या जगात भारतीय नाव एका अत्युच्च स्तरावर नेऊन ठेवण्याचं काम नुकतंच श्रीकांतनं केलं! सायना नेहवाल वर्ल्ड नंबरवन झाली, त्याच दिवसात श्रीकांतने जिंकून जागतिक क्रमवारीत नंबर ४वर झेप घेतली.
मात्र इथवरचा या मुलाचा प्रवास सोपा नव्हता; आज त्याची कामगिरी असामान्य वाटत असली तरी अत्यंत सामान्य-कठीण आणि महावेदनादायी अनुभवातून श्रीकांतनं जशी वाट काढली ती पाहता त्याच्या जिद्दीला एक कडक सलाम ठोकायला हवा!
आंध्र प्रदेशातल्या गुंटूरचा हा मुलगा. वडील शेतकरीच, आई गृहिणी. त्याचा भाऊही बॅडमिण्टन खेळतो! आपल्या मुलाची बॅडमिण्टनची ओढ पाहता आईवडील त्या गोपीचंदच्या अकॅडमीत घेऊन आले. तिथं प्रवेश मिळणं महाकठीण, मात्र श्रीकांतला प्रवेश मिळाला. गुंटूर-हैदराबाद अंतर २६७ किलोमीटर. त्यामुळे श्रीकांत अकॅडमीतच रहायला आला. त्या अकॅडमीच्या पलीकडे त्याला जगच उरलं नाही!
तो शिकत होता, सराव करत होता, काही सामने जिंकत होता, काही हारत होता. इंडोनेशियातली एक स्पर्धा संपवून परतला आणि त्याला मेंदूज्वरानं गाठलं. ते इन्फेक्शन एवढं मोठं होतं की, तो कोसळलाच! आजारातून वाचला मात्र शारीरिक मानसिक दृष्ट्या खचला होता.
मागच्या जुलैची ही गोष्ट.
श्रीकांत सांगतो, ‘आठवडाभर मी दवाखान्यात होतो. आपलं कसं होणार असा जिवाला घोर लागला होता. मात्र गोपीसर बाजूला उभे होते. त्यांनी धीर दिला. एवढंच नव्हे तर मी बरा झाल्यावर मला स्पर्धेलाही पाठवलं. त्यातून माझा आत्मविश्वास परत आला, जमेल आपल्याला असं वाटलं आणि जमलं!’
आज जरी सारं जग त्याचं कौतुक करत असलं तरी गेले सात महिने त्याची वाट सोपी नव्हती. एकतर मेंदूज्वरासारखा गंभीर आजार, त्यातून कोसळलेला आत्मविश्वास आणि पुन्हा कोर्टवर परतणं!
गोपीचंद सरांनी धीर दिला, पाठिंबा दिला त्यानंतर तो पुन्हा बॅडमिण्टन कोर्टवर उतरलाही. मात्र राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धा यासारख्या बड्या स्पर्धेत तो काही फार प्रभाव दाखवू शकला नाही. चिनी खेळाडूंपुढे तर मात्रा चालणंही अवघड होतं!
स्वत: पुलेला गोपीचंद सांगतात, ‘दिवस अवघड होते, फिजिकली आणि इमोशनली तो ढेपाळत होता. हरत होता, खेळत होता. पण मैदानावरचं हारणं प्रत्यक्षात नव्हतं, तो चोख सराव करत होता. कॉन्सनट्रेट करण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या सार्या अवघड प्रवासानंतर ‘ही इज बिकम अ स्मार्ट प्लेअर नाऊ!’
हा स्मार्टनेस त्यानं केवळ गुणवत्तेच्या नाही तर अचूक सराव आणि ढोर मेहनतीच्या जिवावर कमावला आहे.
वर्षभरापूर्वी तो कुठं होता?
त्याचं रॅकिंग होतं, ४७. आज तो वर्ल्ड नंबर फोर आहे. चायनाच्या मातब्बर खेळाडूला त्यानं मात दिली आहे.
बॅडमिण्टनच्या कोर्टवर चायनीज खेळाडूला मात देणं ही आजच्या घडीला सोपी गोष्ट नाही. ते श्रीकांतनं करून दाखवलं!
मॅच जिंकल्यानंतर त्याला विचारलंच पत्रकारांनी तर तो म्हणाला, ‘मला जिंकण्याची भीती वाटत नाही, मला फक्त उत्तम खेळायचं होतं, ते मी खेळलो!’
कमी बोलणारा, शंभर टक्के फोकस्ड राहण्याचा प्रयत्न करणारा हा २२ वर्षांचा मुलगा. गेले काही वर्षे त्याला गोपीचंद अकॅडमी बाहेरचं जग माहिती नाही!
आज जगाला एक तेजस्वी खेळाडू दिसतोय, एक चॅम्पियन दिसतो आहे, मात्र त्या चॅम्पियन श्रीकांतच्या वाट्याला आलेली लढाई?
त्यानं दिलेला लढा?
ती फाईट मोठी होती, त्यातला पहिला एक टप्पा फक्त त्यानं आता सर केला आहे!
जिंकण्याचा प्रवास आत्ता कुठं सुरू झाला आहे.
गुंटूरच्या एका शेतकर्याचा पोरगा आता डोळ्यात वर्ल्ड नंबर वन बनण्याचं स्वप्न हक्कानं पाहू शकतोय.
म्हणून तर त्याच्या फेसबूक पेजचं कव्हर पिक्चर म्हणतंय, ‘इट्स माय टाइम, बी हीअर, बी द हिरो!’