मुंबईत तग धरला...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 10:37 AM2017-12-07T10:37:36+5:302017-12-07T14:45:56+5:30
मुंबईत आलो, पत्रकार व्हायचं म्हणून. सिनेमाच्या जगातही डोकावून पाहिलं, बरे-वाईट दिवस पाहिले; पण मुंबईनं जगवलं..
- पोपट रामदास पिटेकर, कल्याण
अहमदनगर येथील न्यू आर्ट्स कॉलेजमध्ये मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज या कोर्सचे शेवटच्या वर्षाचे पेपर संपल्याबरोबर दुसºया दिवशी इंटर्नशिप शोधण्यासाठी थेट नगरवरून मुंबई गाठली. मुंबईमध्ये माझं कोणी नातेवाईक वा मित्रपरिवार नव्हता. आमदार अनिल राठोड यांचे पत्र घेऊन मनोरा आमदार निवास येथे राहायला आलो. इंटर्नशिप शोधण्यासाठी बाहेर पडलो. झी-24 तास या चॅनेलमध्ये इंटर्नशिप शोधण्यासाठी गेलो. तेथे गेल्यावर माझे सिनिअर यशवंत साळवे सरांना भेटलो. त्यांनी माझा रिझ्यूम घेऊन इंटर्नशिपचं सांगतो म्हणाले. आठ दिवसांनी फोन आला की तू इंटर्नशिपसाठी ये म्हणून... इंटर्नशिप सुरू झाली. सकाळी ९ वाजता आॅफिसला जायचो ते रात्री १० वाजताच रूमवर परतायचो. हा माझा दिनक्र म ७ महिने सुरू होता. आमदार निवासामधील रूमवर गेल्यानंतर कधी झोपण्यासाठी जागा मिळायची नाही. कारण त्या मतदारसंघातील नागरिक काहीतरी काम घेऊन मुंबईला यायचे. मग काय रात्री सतरंजी घेऊन पोर्चमध्ये झोपावं लागत असे. कधी रात्री आॅफीसमधून उशीर झाला तर जेवायचे वांधे. कधी कधी जेवण पण मिळायचं नाही. घरचे महिन्याला तीन हजार रु पये पाठवाचे. त्या तीन हजार रुपयांमध्ये पूर्ण महिना काढावा लागत असे. मी जॉब लागेपर्यंत सकाळी कधीच नास्ता केला नाही. फक्त दुपारी जेवण आणि संध्याकाळी नॉरमल अंडाभुर्जी खात असे.
पैसे वाचवण्यासाठी कपडे धुणे, इस्री करणे, मुंबईमध्ये फिरणे या गोष्टी खूप टाळायचो. ७ महिने इंटर्नशिप केल्यानंतर झी-24 तासमध्ये जॉब मिळाला. मी जे पत्रकार होयचं स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण झालं. लहानपणी मुंबईबद्दल आणि टीव्हीबद्दल फक्त छान छान ऐकलं होतं, ते आता वेगळ्या अर्थानं जगत होतो. नोकरी लागल्यानंतर वर्षभरानं लग्न केलं. आणि या स्वप्नेरी दुनियेत मी आणि माझी बायको दीपाली दोघे कायमस्वरूपी राहायलो आलो.
मुंबई स्वप्नांची दुनिया आहे असं ऐकलं, वाचलं होतं. या मुंबईत कष्ट केले तर सर्व गोष्टी मिळवता येतं. या महानगरीत गेल्या ४ वर्षांपासून राहतोय. चित्रपट क्षेत्राची आवड निर्माण झाली होती. दोन वर्षांत ३५ ते ४० शॉर्ट फिल्म, ४ ते ५ डॉक्युमेंटरी केल्या. मराठी चित्रपट ‘ख्वाडा’मध्येही काम केलं. पण या चित्रपट क्षेत्रात मन रमलं नाही. म्हणून आता पुन्हा पत्रकारितेकडे परतलोय, प्रवास सुरूच आहे..