नटराजनमध्ये लपलेल्या जेपीची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 07:58 AM2020-12-10T07:58:16+5:302020-12-10T08:00:22+5:30
त्याचा संघर्ष आणि कृतज्ञता ही यशस्वी होण्यापलिकडची एक मिसाल आहे!
-अभिजित पानसे
कृतज्ञता हा फार मोठा गुण आहे. कुणी आपल्याला मदत केली तर त्याची याद आपल्या यशाच्या काळात सोबत असणं, ठेवणं हे सगळ्यांनाच जमतं असं नाही; पण ऑस्ट्रेलियात भारतीय राष्ट्रीय क्रिकेट टीमच्या जर्सीमध्ये खेळणारा एक खेळाडू कृतज्ञता काय असते, याची सध्या एक वेगळीच गोष्ट सांगतो आहे. टी नटराजन नावाचा हा मध्यमगती डावखुरा बॉलर. आयपीएलमध्ये स्वतःचं नाणं खणखणीत वाजवून आता तो भारतीय टीममध्ये विंटेज जर्सी घालून खेळतोय. आता खरंतर सारं जग त्याला जेपी नटराजन म्हणून ओळखतं. त्याच्या टी शर्टवर जेपी हे इनिशिअल्स असतात. आजवर खेळलेल्या सर्व सामन्यांत, स्पर्धेत त्याच्या टी शर्टवर जेपी असं लिहिलेलं असतंच. नटराजनने जेपी या अक्षरांचा टॅटूही केलेला आहे.
अनेकांना प्रश्न पडतो की टी. नटराजन नाव असलेल्या या खेळाडूच्या जर्सीवर जेपी असं का लिहिलेलं असेल?
तर त्याचीच ही गोष्ट.
तामिळनाडूमधील सालेम जिल्ह्यातील चिनप्पमपट्टी गावात नटराजनचा जन्म झाला. तिथे तो सरकारी शाळेत शिकला. चिनप्पमपट्टी गावात क्रिकेट क्लब चालवणाऱ्या मालकाचं नाव जयप्रकाश. तोच हा जेपी. त्याचंच नाव टी नटराजन आपल्या जर्सीवर लावतो.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले नटराजन. त्याचे आई-वडील न्याहारीसाठीचे पदार्थ विकत. त्यांनीही आई-वडिलांच्या फूड स्टॉलवर काम केलंय. चिनप्पमपट्टीच्या क्रिकेट क्लबवर खेळत असताना क्लबचा मालक जयप्रकाशने नटराजनची अर्थात नट्टूची गुणवत्ता हेरली. जयप्रकाश यांनी नटराजनच्या घरी जाऊन थंगासरू आणि शांता या त्याच्या आई-वडिलांना पटवून दिलं की नटराजनचा संपूर्ण क्रिकेटचा खर्च ते स्वतः करतील. त्याच्यात गुणवत्ता आहे. तो यात यश मिळवू शकतो.
आपल्या डावखोऱ्या बॉलिंगने प्रभावित करत २०१५ मध्ये नटराजनने तामिळनाडू रणजी संघात जागा मिळवली; पण त्याच्या बॉलिंग ऍक्शनला सदोश ऍक्शन म्हणत बॉलिंग करण्यास मनाई करण्यात आली. मानसिकरीत्या तो अस्वस्थ झाला.
आपल्या बॉलिंग ऍक्शनवर अतोनात मेहनत घेऊन नटराजनने २०१६ मध्ये तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये नाव कमावलं. त्यानंतर इतर काही लीगमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीच्या भरवशावर संघाला सामने जिंकून दिले. अशाच एका सामन्यात त्याने सुपर ओवरमध्ये सहाही अचूक यॉर्कर टाकत सामना जिंकून दिला. त्यानंतर टी नटराजनला सर्व यॉर्कर किंग म्हणू लागले. अर्थात तोवर नटराजन हे नाव सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत व भारतीय क्रिकेट संघ निवड समितीपर्यंत पोहोचलं नव्हतं.
२०१७ मध्ये नटराजनसाठी झगमगाट असलेल्या आयपीएलचा दरवाजा उघडला तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाद्वारे. त्यावर्षी त्याने काहीही विशेष कामगिरी केली नाही. नंतर त्याच्या डाव्या हाताच्या कोपराची शस्त्रक्रियाही झाली. वर्षभर त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. २०१८ मध्ये सनरायजर्स हैदराबादने त्याला विकत घेतलं. स्विंग बॉलर भुवनेश्वर कुमार व चाणाक्ष प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरनच्या देखरेखीखाली नटराजनची बॉलिंग आणखी खुलली.
२०२० मध्ये कोरोनाच्या सावटाखाली खेळल्या गेलेल्या आयपीएलमध्ये नटराजनने विलक्षण कामगिरी केली. आपल्या यॉर्करवर एबी डिविलीयर्सपासून अनेक रथी महारथींना बोल्ड केले. तो सुपर ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. २०२० हे अनेकांना न आवडणारं वर्ष नटराजनसाठी मात्र अत्यंत चांगलं ठरलं. भारतीय क्रिकेट टीममध्ये त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळाली. पहिल्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. दोन्ही सामने भारताने हरल्यावर प्रयोग म्हणून शेवटच्या सामन्यात नटराजनला संधी मिळाली.
ट्वेन्टी ट्वेन्टी ओव्हरची मालिका सुरू झाल्यावर नटराजनला ‘होमली'' फीलिंग मिळालं. त्याने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेऊन भारताला सामना जिंकून देण्यात मोलाची मदत केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने १९४ रन केले असताना नटराजनने आपल्या स्पेलमध्ये फक्त २० रन दिले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हार्दिक पांड्याला मिळाला असता त्यानेही सामनावीर नटराजनच असं म्हटलं.
‘‘या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील नटराजन हा भारताचा ''फाईंड'' आहे!" हे क्रिकेट इतिहासातील एक सर्वोत्तम बॉलर ग्लेन मॅकग्रा याने नुकतंच म्हटलं आहे.
तर असा हा जेपी नटराजन. संघर्ष आणि कृतज्ञतेसोबत घेऊन पुढे निघाला आहे.
( अभिजित ब्लॉगर आहे.)
abhijeetpanse.flute@gmail.com