बराक ओबामांच्या प्रेमाची गोष्ट
By admin | Published: June 22, 2016 06:58 PM2016-06-22T18:58:13+5:302016-06-22T18:58:13+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं हे पुस्तक. तसं जुनं. १९९५ साली प्रसिद्ध झालेलं. वयाच्या ऐन पस्तिशीत लिहिलेलं हे पुस्तक.
Next
>- माधुरी पेठकर
ड्रीम्स फ्रॉम माय फादर.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं हे पुस्तक. तसं जुनं. १९९५ साली प्रसिद्ध झालेलं. वयाच्या ऐन पस्तिशीत लिहिलेलं हे पुस्तक.
त्या पुस्तकात ओबामा आपल्या आईकडून मिळालेल्या प्रेमाच्या ताकदीविषयी जे सांगतात ते फार मनस्वी आहे.
ओबामांवर त्यांच्या वडिलांचा जेवढा प्रभाव होता तितकाच आईच्या विचारांचाही. त्यांच्या आईनेच जीवनातल्या सर्वात शक्तीशाली प्रवाहाशी अर्थात प्रेमाशी त्यांचा परिचय करून दिला होता. व्यक्ती व्यक्तीमधलं प्रेम किती ताकदवान असतं याची ओळख स्टॅनली अॅन अर्थातच ओबामांच्या आईनं त्यांना करून दिली होती.
ओबामांच्या आईनं स्वत: ती अनुभवलीही होती. आपल्या पहिल्या भेटीविषयीचा किस्सा आपला मुलगा बराकला सांगतांना त्या खूप मिश्किल झाल्या होत्या. त्यांना हसूच आवरेना. कारण त्यांचा प्रियकर म्हणजे ओबामांचे वडिल त्यांच्या पहिल्याच भेटीत उशिरा पोहोचले होते. त्यांनी स्टॅनलीला विद्यापीठाच्या आवारातच भेटायला बोलावलं होतं. भेटीच्या ठरलेल्या वेळेनुसार स्टॅनली जागेवर पोहोचल्या. पण सिनिअर ओबामांचा पत्ताच नव्हता. उशीर झाला म्हणून वाट बघायची नाही हे स्टॅनलीला पटत नव्हतं. अवतीभोवती खूप सुंदर वातावरण असल्यामुळं स्टॅनली तिथल्याच एका बाकावर पहुडल्या. वाट पाहता पाहता त्यांचा डोळा लागला. तास दीड तास उलटून गेला. जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिला कळलं की सिनिअर ओबामा आपल्या मित्रांसमवेत पोहोचले होते. स्टॅनलीचा संयम त्यांना तिच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेसा होता. मात्र त्याही वेळी सिनिअर ओबामा मित्रांना ठामपणे सांगत होत, ‘मी म्हटलं नव्हतं, ती चांगली मुलगी आहे, नक्की माझी वाट पाहत थांबेल!’
पण काही वर्षानंतर सिनिअर ओबामांचं स्टॅनलीवरचं लक्ष कमी झालं. त्यामुळे स्टॅनली एकटी पडली. गोंधळली. पण त्याही अवस्थेत ती सिनिअर ओबामांकडे लोकांच्या अपेक्षेच्या नजरेतून पाहायला लागली होती. स्टॅनलीच्या मते प्रेमात पडताना त्या विशिष्ट व्यक्तीच्या अंधुकशा सावल्यांनाही आपण आपल्यामध्ये प्रवेश देवून आपला एकटेपणा तोडायला परवानगी देत असतो. पण याच अंधुकशा सावल्यांचं रूपांतर पुढे स्वच्छ प्रतिमेत होतं. व्यक्ती कळायला लागते. तसे सिनिअर ओबामाही तिला कळले. त्या निराशेच्या अवस्थेतही स्टॅनलीला जगण्याची ताकद प्रेमानेच दिली. आपण ज्या नजरेतून आपल्या जोडीदाराकडे बघतो तीच नजर तिनं आपल्या मुलांनाही दिली.
स्टॅनली आणि सिनिअर ओबामा यांच्यातल्या दुराव्यानं स्टॅनलीच्या चेहेºयावरच्या प्रसन्नतेत जराही फरक पडला नाही. बराक ओबामांना आपल्या आईचा जसा हा चेहरा आठवतो तसाच वडील गेल्यानंतर आईची झालेली अवस्थाही आठवते. वडील गेल्याची बातमी कळल्यावर काही अंतरावर उभ्या असलेल्या ओबामांच्या कानी पडलेली आर्त किंकाळी त्यांना आईच्या मनातल्या वडिलाविषयींच्या प्रेमाविषयी खूप काही सांगून गेली.
आईच्या प्रेमाविषयी असलेल्या याच भावनेचा आणि दृष्टिकोनाचा परिणाम बराक यांच्यावरही झाला. आपली पत्नी मिशेल हिला समजून घेताना, तिच्यासोबत आपलं नातं अधिक दृढ करताना ओबामांना आईनं दिलेल्या प्रेमाच्या दृष्टिकोनाचाच उपयोग होतो.
ओबामा आपल्या पत्नीविषयी बोलताना म्हणतात की, जेव्हा मी पहिल्यांदा मिशेलला पाहिलं तेव्हा ती मला अतिशय कणखर व्यक्ती भासली. तिला तिच्याविषयीची पूर्ण समज होती. आपण कोण आहोत, कुठून आलो आहोत याविषयीची स्पष्ट जाणीव तिला होती. पण तिच्या डोळ्यातून एक प्रकारची असुरक्षितताही झिरपत असलेली मला दिसली. त्या उंच, सुंदर आणि आत्मविश्वासू स्त्रीमधल्या या दोन्ही गोष्टींकडे मी आकर्षित झालो.
आमच्या नात्यातलं सत्य म्हणजे मी तिच्यासोबत अतिशय आनंदी आहे. आता मिशेल माझ्या पूर्ण ओळखीची झाली आहे. मी तिला आणि ती मला चांगले जाणून घेवू शकतो. खरंतर यामुळेच मी तिच्यावर पूर्ण विश्वास टाकला आहे. माझ्या पूर्ण ओळखीची वाटणारी मिशेल मला गूढ कोड्यासारखीही वाटत असते. ओळख आणि गूढ यामधला हा अजब तणावच आमच्या नात्यामध्ये एक ताकद आणत असतो. याआधारावरच आम्ही आमच्यातलं विश्वासाचं, सुखाचं आणि एकमेकांना आधार देणारं नातं समृध्द केलं आहे.
प्रेमाची अशी ताकद, त्याचं असं समंजस रुप या पुस्तकातून उलगडत जातं..