शिरोलीच्या राजनच्या अफाट जिद्दीची गोष्ट
By admin | Published: July 16, 2015 06:50 PM2015-07-16T18:50:33+5:302015-07-16T18:50:33+5:30
खेळाडू घडवून ‘खेळ जगवण्याचा’ प्रयत्न करणा-या एका खेडय़ातल्या तरुणाची अनोखी गोष्ट..
Next
सुरेंद्र राऊत
खेळाडू घडवून ‘खेळ जगवण्याचा’ प्रयत्न करणा-या एका खेडय़ातल्या तरुणाची अनोखी गोष्ट..
-----------
त्यांच्याकडे काहीही नाही. जीवनाच्या स्पर्धेत ङोपावण्यासाठी लागणा:या कोणत्याही भौतिक सुविधा, पैसा नाही. कुणाचे मानसिक पाठबळही नाही. तरीही यवतमाळ जिल्ह्यातल्या शिरोलीसारख्या दुर्लक्षित खेडय़ातला एक तरुण जिद्दीनं एक स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतो आहे.
राजन भुरे त्याचं नाव.
समोर आलेल्या प्रत्येक अडचणीला पायरी बनवायचं अशीच त्याची जिद्द. अत्याधुनिक सोयीसुविधा, खेळाडूसाठी लागणारा सकस आहार, मार्गदर्शन आणि घरातून मिळणारं पाठबळ यापैकी काहीच राजनच्या वाटय़ाला आलं नाही. अशाही स्थितीत उभं राहत या पठ्ठय़ाने राष्ट्रीय स्तरावर मॅरेथॉन स्पर्धा गाजविल्या. 81 स्पर्धापैकी 62 स्पर्धामध्ये विजेतेपद मिळविले. 2क्क्1 मध्ये पायाला झालेल्या दुखापतीने राजनचं धावणं बंद झालं होतं. पण, त्याची जिद्दच एवढी होती की तो कायमचा थांबणं शक्यच नव्हतं.
म्हणून त्यानं ग्रामीण खेळाडूंना खेळण्यासाठी मार्गदर्शन करणं सुरू केलं. शेतात राबणा:या, गुरंढोरं राखणा:या महिला, शेती करणारे पुरुष यांच्यातले गुण हेरून त्यांना राज्यस्तरीय चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तयार केलं. अर्थात साधनं तेव्हाही नव्हतीच. पण गोळ्याऐवजी गोल दगड, थाळीऐवजी चापट दगड हातात देऊन तयारी करून घेतली. धावण्यासाठी ट्रॅक बूट नव्हते, तर महिलांनी टायरी चप्पल दोरीने बांधून उघडय़ा माळरानावर सराव केला. या महिलांनीही चक्क लुगडे घालून अनवाणी पायाने मुंबईचे मैदान गाजवले. तेव्हा त्यांचा कोच कोण, असा प्रश्न अनेकांना पडला.
राजन भुरेने आज स्वत:ची क्रिकेट अकादमी उभारली आहे. त्यातले काही क्रिकेटपटू इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटसाठी सिलेक्ट झाले आहेत. अनेकजण राष्ट्रीय स्तरावरही खेळत आहेत. मुख्य म्हणजे साधनं नाहीत म्हणून रडत न बसता जे आहे ते वापरून खेळाडूंचा उत्तम सराव करून घेण्याचं काम राजन करतो आहे. स्नायू बळकट करण्यासाठी दुचाकीच्या खराब टायरचा तो वापर करतो. सराव करताना गोलंदाजाला एका स्टम्पवर खेळणा:या बॅट्समनची विकेट घ्यायला लावतो, तर बॅट्समनला तीनऐवजी सहा स्टम्प ताशी 13क् ते 14क् वेगाचा बॉल खेळण्याचा सराव करवतो. खरंतर घरची गरिबीची परिस्थिती असल्यानं राजनचं प्राथमिक शिक्षण मामाकडे झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याला नऊ किलोमीटर पायी जावं लागत असे. थायलंड, चीन, श्रीलंका येथील अॅथलेटिक्स स्पर्धा त्यानं गाजवल्या. दुर्दैव म्हणजे त्याची पत्नी 2क्क्6 मध्ये कन्सरने दगावली. ते दु:ख मनात साठवून त्यानं चार गरीब मुलं दत्तक घेतली.
आज यवतमाळातील धामणगाव मार्गावर असलेल्या त्याच्या अकादमीलगतच्या पारधी बेडय़ावरची मुलंही क्रिकेटचे धडे गिरवत आहेत. प्रचंड क्षमता आणि शारीरिक चपळता या मुलांमधे आहे. आपण प्रयत्न केले तर ही मुलं खेळात खूप प्रगती करतील, असं राजन मोठय़ा विश्वासानं सांगतो.