एका अकुशल कामगाराचा जन्म होतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 12:48 PM2018-06-28T12:48:51+5:302018-06-28T12:49:01+5:30

पोटापाण्याचे उद्योग शोधायला घराबाहेर पडलो त्याआधीची एक आत्महत्या

a story of small town boy & his shattered dreams | एका अकुशल कामगाराचा जन्म होतो तेव्हा...

एका अकुशल कामगाराचा जन्म होतो तेव्हा...

Next
ठळक मुद्देनेट-सेट कधी पास झाला विचारलं. मग एका प्राध्यापकानं मला विचारलं की, ‘मागील दिवसात काय वाचलं?’ मी म्हणालो, ‘भालचंद्र नेमाडय़ांची कोसला !’ डाळिंबाचे दाणे तोंडात टाकत संस्थाचालकानं शेजारच्या प्राध्यापकाला विचारलं, ‘भालचंद्र नेमाडे कोण आहेत?’

- अरुण सीताराम तीनगोटे 

मी नुकताच नेट परीक्षा पास झालो होतो. आता बी. एड.पेक्षा अधिक काहीतरी चांगले केले आहे. तर आता मास्तर न होता थेट प्राध्यापकच होऊ, अशी अंधुक आशा मनात निर्माण झाली होती. तासिका तत्त्वावर जरी काम केलं तरी जगण्यापुरते पैसे मिळतील, असं वाटायला लागलं होतं.
बापाचा ऊर अभिमानाने भरून आला होता. बाप म्हणाला, ‘तू लढ, मी सोबत आहे.’ - मग जसा जून महिना सुरू झाला, तसा जाहिराती बघून अर्ज करायचा धडाका सुरू केला. तोर्पयत आपण पेटवत असलेला हा फटाका फुसका आहे, हे माहीत नव्हतं. एका नामांकित कॉलेजची पदभरतीची जाहिरात आली. रितसर अर्ज केला. संस्थेनं कॉल लेटर पाठवलं.   मुलाखतीच्या दिवशी सकाळीच उठलो. तयार झालो. अक्कानं शेंगदाण्याची चटणी आणि चपात्या बनवून दिल्या. अक्का - अण्णांच्या पाया पडलो. फाईल आणि सॅक घेतली. फॉर्मल पॅण्ट, त्यावर चेक्सचं शर्ट, ब्लॅक शूज घालून सकाळी 8 वाजताच मुलाखतीला निघालो. अकराच्या सुमाराला मुलाखतीच्या शहरात पोहचलो. तोर्पयत ऊन जाणवायला लागलं होतं. बस स्टॅण्डला उतरून एक प्लेट भजी खाल्ली आणि एक चहा पिलो. कॉलेजचा पत्ता विचारत विचारत कॉलेजला पोहचलो.

चांगला भला मोठा कॅम्प्स होता. अगदी पहिलीपासून ते उच्चशिक्षणार्पयत सोय होती. मग कार्यालयाजवळ जाऊन चौकशी केली. पुन्हा एक फॉर्म भरून दिला आणि मग वाट पाहत बसलो. 
थोडय़ा वेळात आणखी काही उमेदवार आले. गर्दी आणि अस्वस्थता वाढू लागली. पण मुलाखती काही सुरू होईनात. मला भूक लागू लागली. पण म्हटलं एकदा मुलाखत झाली की मोकळे.. मग बघू पोटापाण्याचं !
साधारण बाराच्या आसपास संस्थाचालकांचं आगमन झालं. तोवर माध्यमिकच्या मुलांच्या प्रार्थना आटोपल्या होत्या. पण संस्थाचालकांचं आगमन होताच जो कुणी बसलेला होता, तो साहेबांच्या आदरार्थ उभा राहिला. मग आम्हीपण मेंढरासारखे उभे राहिलो. मला वाटलं की आता मुलाखती सुरू होणार. मग तासाभरात आपण मोकळे. 
मी शिपायाकडे सहज चौकशी केली की,  
‘आता काय..?’
तर तो म्हणे, ‘आता साहेब जेवणार.’
मग सगळ्या कर्मचार्‍यांची नुसती धावपळ. कुणी ताट घेऊन जातंय तर कुणी वाटय़ा. आम्ही आपले हैराण. जवळपास तासभर साहेब जेवले. मला तर कळेना की यांचा साहेब हा माणूस आहे की बैल. मनात म्हणलो की, ‘याने आता रवंथ करत बसू नये.’ 
मग मी पुन्हा शिपायाकडे. 
शिपाई म्हणे, ‘आता साहेब थोडा आराम करणार.’   
मी पुन्हा मनात म्हणालो, ‘आम्ही मात्न उन्हात मरणार.’    
सगळे उमेदवार पार कंटाळून गेले. माझ्या शेजारी एक मागासवर्गीय उमेदवार होता. तो त्याच गावातला होता. आणि सलग तिसर्‍या वर्षी मुलाखतीला आला होता. त्याने सांगितलं, ‘ही संस्था फार चांगली आहे. इथे डोनेशन न घेता उमेदवार भरतात. फक्त उमेदवार याच जिल्ह्यातला पाहिजे.’   
 मला वाटलं, चला ! म्हणजे आपला पत्ता कटला. 
तुमच्या घरात किती मतदान करणारी माणसं आहेत, याचा हिशोब लावून प्राध्यापकांची भरती होते, असंही तो सांगत होता.
मग मी म्हणालो की, ‘तुझं काम कसं झालं नाही अजून?’
- तर तो म्हणे, ‘आमच्या जातीच्या माणसांना शक्यतो घेत नाहीत.’
मग मी पुन्हा मनातच म्हणालो, आपण या जिल्ह्याचे नाहीत आणि आपण अनुसूचित जातीतले आहोत. म्हणजे आपण अपात्न आहोत. नेट-सेट काय कुणीही पास होऊ शकतो. विशिष्ट जातीत आणि विशिष्ट जिल्ह्यात जन्म घेता आला पाहिजे.
माझं अवसान पार गळून गेलं.
मग माझं मन मुलाखतीतून निघून गावातल्या घरी गेलं. पाठ थोपटणारा बापाचा हात आठवला. माझा निकाल ऐकून डोळ्यात पाणी आलेली माय आठवली. मग आपली मराठी साहित्याची आवड, पुस्तकं  वाचण्याचा किडा, कवी होण्याचे भिकेचे डोहाळे आठवले. आणि मग आपल्या वांझोटय़ा यशाच्या पश्चाताप झाला. 
पेटलेली स्वप्नं पुन्हा विझली. 
आपली सुरुवातच चुकली आहे असं वाटून गेलं. 
तितक्यात माझं नाव पुकारलं गेलं. मी फाइल हातात घेऊन सुकलेल्या चेहर्‍यावर उधारीचा उत्साह घेऊन ‘आत येऊ का सर?’ असं म्हणून आत शिरलो.
वातानुकूलित ऑफिस होतं. मोठंच्या मोठं गोल टेबल. भव्यच ! समोरच्या बाजूला संस्थाचालक. त्याच्यासमोर एक डाळिंबाच्या दाण्याचं ताट. दोन्ही बाजूला कमीत कमी पाच-पाच प्राध्यापक. 
आपण आणि संस्थाचालक समोरासमोर. 
हे म्हणजे टम्म फुगलेला बैल आणि बेशरम खाल्ल्यानं कंबर टेकलेली बकरी समोरासमोर.
मला नाव - गाव विचारलं गेलं. 
नेट-सेट कधी पास झाला विचारलं. माझ्या गावातल्या संस्थाचालकांची माहिती आणि त्यांच्या संस्थेविषयी विचारलं.
मग एका प्राध्यापकानं मला विचारलं की, ‘मागील दिवसात काय वाचलं?’
मी म्हणालो, ‘भालचंद्र नेमाडय़ांची कोसला !’
डाळिंबाचे दाणे तोंडात टाकत संस्थाचालकानं शेजारच्या प्राध्यापकाला विचारलं,
‘भालचंद्र नेमाडे कोण आहेत?’
मग तो प्राध्यापक म्हणाला, ‘मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत. कादंबर्‍या लिहितात.’    
- मग मला संस्थाचालक आणि  प्राध्यापक दोघांच्याही अक्कलेचा अंदाज आला.
प्राध्यापकानं विचारलं, ‘कोसला इतक्या उशिरा का वाचली?’  
मी म्हणालो की, ‘चांगली कादंबरी ही सतत समकालीन असते. आणि मानवी मन सर्वकाळ अस्तित्वाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतच असतं. मी वर्षात एकदा तरी कोसला वाचतोच.’
मग मला माझ्या विषयातलं विशेष काही कळत नाही असं न बोलता फक्त नजरेनं सुचवून त्यांनी मला बाहेर थांबायला सांगितलं.
मी थकल्या मनानं बाहेर येऊन बसलो. 
शिपाई म्हणाला की, ‘थोडय़ा वेळात निकाल लागेल.’   
आम्ही वाट पाहत बसलो. 
थोडय़ा वेळानं शिपाई बाहेर येऊन निवड झालेल्या उमेदवारांची नावं सांगून गेला. आणि अर्थातच त्यात माझं नाव नव्हतं. मराठी विषयासाठी निवडलेल्या उमेदवाराचं अजून पदव्युत्तर शिक्षणच सुरू होतं आणि तो उच्च जातीतला होता, त्यांच्या घरात तब्बल अकरा मतदार होते. 
- मग आम्ही मुस्कटात मारलेलं तोंड घेऊन जागेवरून उठलो.
तितक्यात संस्थाचालक महोदय बाहेर आले. निवड झालेला पोरगा त्यांच्या पाया पडला. 
मीही मनातल्या मनात संस्थाचालकाचं नरडं दाबलं. काही डाळिंबाचे दाणे त्याच्या जिभेसोबत बाहेर पडले. 
मी अपराधी माणसासारखा हसलो.
 प्राचार्यानं पळत जाऊन गाडीचं दार उघडलं. मला वाटलं तो आता संस्थाचालकाच्या ढुंगणाचा मुका घेईल. पण त्यानं मनावर नियंत्नण ठेवलं आणि मग मी एका प्राध्यापकाच्या ज्ञानाचा बौद्धिक आविष्कार पाहायला मुकलो.
- प्राध्यापक होण्याची हीच महत्त्वाची पात्नता आहे. बाकी सब झूट असं मात्न वाटून गेलंच.
संस्थाचालक गाडीत बसून राजेशाही गुडबाय करून निघून गेला आणि आम्ही उतरलेली उन्हं अंगावर घेत बस स्टॅण्डकडे निघालो. 
पोटाला डब्यातल्या जेवणाची आठवण झाली. पण मनाला जेवायची इच्छा नाही झाली. 
- त्या दिवसापासून मी प्राध्यापक व्हायचा नाद सोडून दिला. आणि पोटापाण्याचे उद्योग शोधायला घराबाहेर पडलो.
अशाप्रकारे एका प्राध्यापकानं जन्मापूर्वीच आत्महत्या केली आणि एका अकुशल कामगाराचा जन्म झाला..! 


( लेखक एका खासगी कंपनीत अत्यल्प वेतनावर रोजंदारी कामगार आणि सार्वकालीन संघर्षरत कलाकार आहेत.)
 

Web Title: a story of small town boy & his shattered dreams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.