१२ मतदारांचे आभार मानणाऱ्या विकासची गोष्ट.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 07:54 AM2021-01-28T07:54:19+5:302021-01-28T07:55:01+5:30
ग्रामपंचायत निवडणुकीत गावात फक्त १२ मते पडली, पण त्या १२ जणांनी तरी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांचे जाहीर आभार मानायची जिंदादिली त्याने दाखविली.
- संदीप शिंदे
त्याने लावलेले पोस्टर राज्यात सर्वत्र व्हायरल झाले. १२ मतदारांचे जाहीर आभार, असा डिजिटल फलक त्याने लावला होता. तो फोटो तुफान व्हायरल झाला, समाजमाध्यमात अनेकांनी लिहिले की, पराभव स्वीकारावा तर तो असा. ग्रामपंचायत निवडणुकीत गावात फक्त १२ मते पडली, पण त्या १२ जणांनी तरी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांचे जाहीर आभार मानायची जिंदादिली त्याने दाखविली. अपयशही असे दिलदारीने मिरविले.
विकास शिंदे त्याचे नाव. गावाचे नाव, डोंगरकोनाळी, ता़ जळकोट जि. लातूर. त्याचे ते पोस्टर व्हायरल झाल्यावर त्याला विचारले की, लोक जिंकले की पोस्टर लावतात, तू हरलास तरी लावले, ते लावताना काय विचार केला होता?
विकास सांगतो, जीवनात यश-अपयश चालूच असते, त्यात मी पहिल्यांदाच निवडणूक लढविली होती. प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिलो, मी हिंमत तर केली या गोष्टीनेच मला कॉन्फिडन्स दिला. निवडणूक कशी लढवतात हे मी शिकलो, हारलो हे मान्य आहे. पण जे शिकलो ते तर महत्त्वाचे आहे, ते आता कुठे जाणार. मला त्याचा फायदाच होईल. मी याच गावात वाढलो-शिकलो. लहानपणापासूनच गावातील रस्त्यांची अवस्था, आरोग्याचे प्रश्न, पाण्याची टंचाई, शिक्षणाच्या सोयी हे सारे बघतोय. वाटले, आता इलेक्शन आहे तर आपण स्वत: पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी स्वत:चे पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला़ मात्र, अपेक्षित साथ मिळाली नाही, मग मी एकटाच उभा राहिलोे. शिटी हे मला निवडणूक चिन्ह मिळाले. माझ्या विजयाची शिटी वाजली नाही, पण विकासाची कधी ना कधी वाजेल, पुन्हा प्रयत्न आणि विकासासाठी संघर्ष करू, असे मी ठरवले आहे. आता नाही मिळाले यश तर नाही.’
विकास त्याचा आशावाद सांगतो.
डोंगरकोनाळी गावात एकूण मतदारसंख्या होती २४६. त्यापैकी १९२ मतदारांनी मतदान केले, त्यातील १२ मते विकासला मिळाली. विकास म्हणतो, किमान १२ लोकांना तर माझे विचार पटले, निदान त्यांनी तरी माझ्यावर भरवसा ठेवला, मग त्यांचे आभार नको का मानायला. या निवडणुकीने मला माणसे ओळखण्याची संधी दिली़ लोकांसमोर जायचे कसे, आपले विचार कसे मांडायचे हे शिकवले. मग निराश कशाला होऊ, आता हरलो असेल तर भविष्यात जिंकेनही!
-व्हायरल झालेल्या फोटोमागची कहाणी विकास असा सांगत असतो. अपयश न कवटाळता तो निवडणुकीनं दिलेला धडा असा उमेदीने शिकतोय!
( संदीप लोकमतच्या लातूर कार्यालयात वार्ताहर आहे.)