मिलिटरी अपशिंगे ...घरातील एक तरी जवान मिलिटरीत पाठवणा-या गावाची कहाणी
By सचिन जवळकोटे | Published: January 24, 2018 04:20 PM2018-01-24T16:20:35+5:302018-01-26T19:35:20+5:30
दिल्लीतल्या राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात भारताच्या सैन्यदलांतले तरुण, तडफदार जवान रुबाबात मार्चिंग करताना दिसतील, तेव्हा नजरेत अभिमान उमटेल आणि मनात कृतज्ञतेची कळकळ !!!
या गावात तरण्याबांड पोरांची संख्या कमीच. सारेच बॉर्डरवर.. गावात फेरफटका मारला तर दिसतील बहुसंख्य रिटायर्ड फौजी. सोबतीला जवान मुलाच्या प्रतीक्षेतल्या माता अन् पतीच्या सुटीची वाट बघणाऱ्या त्यांच्या बायका.
प्रजासत्ताक दिन जवळ आला, तसं गावातल्या काही घरांमध्ये लगबग सुरू झाली. सामानाची बांधाबांध दिसू लागली. अनेक घरामधली तरणीताठी पोरं ‘ड्यूटीवर जॉईन’ होण्यासाठी निघाली होती. कोणत्याही परिस्थितीत त्यांना गुरुवारच्या आत म्हणजे २५ जानेवारीच्या सकाळपर्यंत आपापल्या कॅम्पमध्ये पोहोचायचं होतं. २६ तारखेला साºया देशाला सुटी असली तरी या मंडळींना मात्र, बॉर्डरवर चोवीस तास ड्यूटी बजावायची होती. डोळ्यात तेल घालून निगराणी करायची होती; कारण ही सारी मंडळी मिलिटरीत आहेत.
या जवानांसाठी २६ जानेवारी अन् १५ आॅगस्ट हे दोन दिवस अत्यंत जोखमीचे. प्रचंड तणावाचे. याच दोन दिवसांच्या काळात दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अधिक़ त्यामुळं जवानांना या दोन तारखांना आयुष्यात कधीच सुटी नाही. आजारी असाल तरीही ड्यूटीवर हजर व्हावं लागतं. मग कुणाच्या घरी माय मरू दे नाहीतर भावाचं लग्न असू दे. नो चान्स.. नो सुटी...
‘आता पुनांदा कवाऽऽ येणार?’ खर्डा-भाकरीसह फराळाचाही डबा बॅगेत ठेवत अनिलच्या बायकोनं डोळ्यातलं पाणी आवरत प्रश्न विचारला, तेव्हा काहीच न बोलता शांतपणे त्यानं तिच्या डोक्यावर हळुवारपणे थोपटलं. अनिलकडे कसं असणार या प्रश्नाचं उत्तर?
डबडबत्या डोळ्यानं केविलवाणं होऊन बघणाºया घरच्यांचा निरोप घेत अनिल ताठ मानेनं उंबरठा ओलांडून बाहेर पडला.. कारण त्याला ‘इमोशनल’ होऊन चालणार नव्हतं. देशप्रेमाच्या तुलनेत घरचा विरह अधिक मोठा नव्हता.
होय.. देशप्रेम !!!
अशी कितीतरी घरं इथल्या पंचक्रोशीत ओळखली जातात की ज्यांच्या भिंतीचा कोपरान् कोपरा देशप्रेमानं भरलेला आहे !
अशी कितीतरी गावं आहेत की जिथलं प्रत्येक घरन् घर मिलिटरी जवानांनी भरलेलं आहे !
असे कितीतरी तालुके आहेत इथे की जिथं गावन् गाव शहीद सुपुत्रांच्या कमानी ताठ मानेनं मिरवताना दिसतं...
होय... शहिदांच्या कमानींनाही स्वाभिमान असतो, अभिमान असतो, हे जगाला दाखवून देणारा हा सातारा जिल्हा.
तीन-साडेतीन शतकांपासून शूरवीरांचा टापू म्हणून ओळखला जाणारा सातारा आता लढवय्या सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.
या जिल्ह्यात अशी कितीतरी गावं केवळ सैनिकांचीच म्हणून ओळखली जातात.
गावाचं नाव मिलिटरी अपशिंगे. घरटी एक तरी जवान मिलिटरीत. या गावात तरण्याबांड पोरांची संख्या कमीच. सारेच बॉर्डरवर.. गावात फेरफटका मारला तर दिसतील बहुसंख्य रिटायर्ड फौजी. सोबतीला जवान मुलांच्या प्रतीक्षेतल्या माता अन् पतीच्या सुटीची वाट बघणाºया त्यांच्या बायका.
या गावच्या कैक पिढ्या युद्धात गेलेल्या. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यनिर्मितीत ज्या मावळ्यांनी प्राण पणाला लावून झुंज दिली, त्यातले कितीतरी आक्रमक लढवय्ये याच गावचे. ब्रिटिशकालीन महायुद्धातही या गावातले कैक जवान धारातीर्थी पडलेले. अनेक पिढ्या जायबंदी झाल्या. शहिदांची यादी तर भली मोठी. तरीही या गावची देशप्रेमाची परंपरा अखंडितच राहिली आहे.
‘देशाच्या बॉर्डरवरचा असा एकही पॉइंट राहिला नसेल जिथं या गावच्या सुपुत्रानं ड्यूटी बजावली नसेल,’ असं मोठ्या कौतुकानं सांगणाºया या गावच्या शौर्याची गाथा आजही अखंड चालू आहे.
या गावातल्या आजीबाई शांताबाई कदम सांगत होत्या, ‘माजा सासरा मिल्ट्रीत. मालकबी तिथंच. ल्योकानंतर नातवानंबी त्योच ड्रेस अंगावरती चढीवला. मिल्ट्रीच्या कपड्यावरती कशी इस्त्री मारायची असतीया आन् त्यांच्या बुटाला किती पॉलिश लावायचं असतंया.. ह्येबी मला संमदं ठौक झालंया...’, शांताबाईच्या चेहºयावरच्या सुरकुत्याही जणू लष्करी शिस्तीच्या असाव्यात. अगदी सरळसोट. एका खाली एक़
गावाबाहेर उभारलेली शहिदांची कमान हा तर सातारा जिल्ह्याच्या अस्मितेचा स्वतंत्र विषय. देशासाठी प्राणाचं बलिदान करणाºया जवानाचा विरह दु:खदायकच. मात्र त्याच्या नावानं वेशीवर बांधली जाणारी भली मोठी कमान म्हणजे शौर्याची प्रतिकृती.. अभिमानाची वास्तू.. अशी कमान लाभलेले गावकरी पंचक्रोशीत ताठ मानेनं फिरतात. शहीद जवानाचा छोटासा पुतळाही गावच्या फाट्यावर अभिमानानं उभा करतात.
वाठारचा तरुण शशिकांत मोठ्या उत्साहानं बोलत होता, ‘या कमानी आम्हाला नुसतंच जगणं नव्हे तर मरणाची नवी भाषाही शिकवितात. तरुणांनी अमर होऊन कसं मरावं, हे सांगतात. आमच्याकडची कितीतरी छोटी-छोटी गावं केवळ एखाद्या शहीद जवानामुळं जगाच्या नकाशावर आलीत. कितीतरी वाड्या-वस्त्यांना त्यांच्यामुळं स्वतंत्र ओळख मिळाली... अन् हाच आदर्श घेऊन आम्हीही मिलिटरीत भरती होतोय.’
देशाच्या लष्करात ‘मराठी माणूस’ हा सर्वाधिक लढवय्या अन् चिवट जवान म्हणून ओळखला जातो. पाकिस्तान, चीन अन् बांगला देशाच्या युद्धातही महाराष्ट्रातल्या जवानांनी मर्दुमकी गाजविलेली. यातही सातारी तरुणांचा झेंडा नेहमीच फडकत राहिलाय ! म्हणूनच की काय, ‘लागीर झालं जीऽऽ’मधला मिलिटरीमन ‘अज्या’ लोकप्रिय ठरलाय सगळीकडं ! ‘शितली’सारख्या सातारी तरुणीला नवराही मिलिटरीतलाच हवा असणार, यात कायबी वेगळं वाटत न्हाई हिथं कुणाला ! विशेष म्हणजे या मालिकेचं चित्रीकरणही सातारा जिल्ह्यातच सुरू आहे सध्या !!
डॉक्टरच्या मुलानं डॉक्टर व्हावं.. वकिलाच्या पुत्रानंही वकीलच व्हावं, तसंच जवानाच्या मुलानंही लष्करातच भरती व्हावं, अशी परंपरा जपणारी अनेक घराणी इथं बघायला मिळतात. मात्र आता या परंपरेत एक मोठ्ठा बदल होऊ घातलाय. लष्करातल्या साध्या जवानालाही आपला मुलगा पुढं जाऊन अधिकारी व्हावा, ही धारणा वाढत चाललीय. म्हणूनच की काय, सातारा सैनिक स्कूलमध्ये आपल्या मुलांना दाखल करण्यासाठी दरवर्षी प्रचंड चढाओढ सुरू असते. या स्कूलमध्ये खास बाब म्हणून पंचवीस टक्के जागा केवळ या जवानांच्या मुलांसाठीच राखीव ठेवल्या गेल्या आहेत.
या स्कूलमध्ये गेल्या एकवीस वर्षांपासून अध्यापनाचं कार्य करणारे गुरुदेव माने सांगत होते, ‘या शाळेत येणाºया विद्यार्थ्यांपैकी सत्तर टक्के मुलांच्या प्रवेशामागं एकच कारण असतं, ते म्हणजे देशप्रेम. त्यानंतर आपल्या घराण्याची लष्करी परंपरा जपणारे बाकीचे वीस-तीस टक्के असतात. इथून शिकून पुढं लष्करात भरती होणारा तरुण किमान सुभेदाराच्या पुढच्या हुद्द्यावरच असतो. इथले अनेक तरुण आजपावेतो खूप मोठ्या अधिकारपदापर्यंत पोहोचलेत. शहीद कर्नल संतोष महाडिक याच सैनिक स्कूलचे.’
शहीद पतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वय ओलांडून गेल्यानंतरही मोठ्या जिद्दीनं लष्करात भरती होणाºया स्वाती महाडिकांमुळं तर साताºयाच्या अनोख्या परंपरेकडं बघण्याचा जगाचा दृष्टिकोन पुरता बदलून गेलाय. केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही लष्करात शौर्य गाजवू शकतात, हे अधोरेखित झालंय. त्यामुळंच की काय, साताºयात मुलींसाठीही स्वतंत्र सैनिक स्कूल असावं, ही मागणी सध्या जोर धरू लागलीय.
औंधच्या कुस्ती आखाड्यात शड्डू ठोकायला आलेल्या पाच पहिलवानांचा नुकताच अपघाती मृत्यू झाला. त्यातल्या मालखेडच्या सौरभ मानेला लष्करात जायचं होतं. आपल्या लाल मातीतल्या ताकदीचा दणका शत्रू सैन्याला द्यायचा होता. मात्र त्याच्या अपमृत्यूनं अवघं घर सुन्न झालं. आकांताला बांध उरला नाही. यावेळी रडता रडता त्याची तरुण बहीण सौरांगिनी एक वेगळाच निश्चय करून गेली. ‘भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लष्करात भरती होणार,’ ही तिची घोषणा अवघ्या गावाला थक्क करून गेली. विशेष म्हणजे, सळसळत्या रक्ताचा तरणाबांड मुलगा हिरावल्यानंतरही मुलीला लष्करात दाखल करण्यासाठी तिचे आई-वडीलही तयार आहेत... यातच इथल्या मातीतल्या मराठी माणसाच्या रक्तात भिनलेली देशसेवा दिसते !!
बॉर्डरवर देशसेवा करताना या जवानांना कौटुंबिक सुखाला पुरतं वंचित व्हावं लागतं. भुर्इंजचा श्रीकांत गिरी हे बोलकं उदाहरण. या तरुणाचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालं. अक्षता पडल्यानंतर चौथ्याच दिवशी त्याला ड्यूटीवर जॉईन व्हावं लागलं. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये सुटी मिळाली तीही जेमतेम चार दिवस ! त्यानंतर राजस्थानच्या बॉर्डरवर ड्यूटीला जाताना सुरतजवळ रेल्वे डब्यात एका अज्ञात माथेफिरूनं हल्ला चढविला. त्यात जखमी झालेल्या श्रीकांतला काही दिवस तिथल्याच मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यावे लागले. त्यावेळी श्रीकांतच्या पत्नीची इकडं काय हालत झाली असेल, याची कल्पना करणं शक्य नाही होणार कुणाला!!
...त्यानंतर सुरतहून थेट पुन्हा राजस्थानात ड्यूटीवर हजर झालेला श्रीकांत नुकताच गावी आला. त्याच्या अपघातानंतर रोज तळमळणारी पत्नी आणि घरचे लोक त्याला तब्बल दोन महिन्यांनंतर भेटले !!
... मात्र, त्यानंतरही तो आता घाईघाईनं परत गेलाय, कारण कोणत्याही परिस्थितीत प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर बॉर्डरवर ड्यूटी बजावयाचीय.
खरंच.. मानाचा मुजरा या तमाम जवानांना!
( लेखक ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचे प्रमुख आहेत.)