आदिवासी गावात जाऊन काम करणार्‍या जिंदादिल तरुणाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:43 PM2019-11-28T12:43:55+5:302019-11-28T12:44:16+5:30

मी मूळचा ग्रामीण भागातला, शहरांत कधी रुळलोच नाही; पण एकदम आदिवासी भागात जाऊन काम करायचं ठरवलं आणि आदिवासी जगण्याचं समृद्ध दालनच मला खुलं झालं!

 The story of a young man working in a tribal village | आदिवासी गावात जाऊन काम करणार्‍या जिंदादिल तरुणाची गोष्ट

आदिवासी गावात जाऊन काम करणार्‍या जिंदादिल तरुणाची गोष्ट

Next
ठळक मुद्दे जैवविविधता व पर्यावरण संवर्धन यावर असेच काम चालू ठेवणार आहे.

- संजय घोरपडे (निर्माण 7)

माझं गाव रेंदाळ. कोल्हापूरपासून जवळच. गावात उद्योगधंदा असल्यामुळे कोणाला काही काम नाही असं कधी दिसलं नाही. प्रत्येक माणूस काही न काही काम करत असतो हेच मला लहानपणापासून दिसले. मी ग्रामीण भागातच वाढलो. शहरी भागात कोणी जास्त नातलग नव्हते. आजोबा जवळच्याच गावातून व्यवसायासाठी रेंदाळमध्ये स्थायिक झाले. प्रामाणिकपणा आणि सरळ मार्गी जीवन हे बाळकडू मला त्यांच्याकडूनच मिळाले. आपली गरज काय आणि इच्छा काय यातला फरक मी त्यांच्याकडूनच शिकलो. 
माझं दहावीर्पयत शिक्षण गावीच झालं. जैवतंत्नज्ञानात पदवी आणि जैव रसायनशास्नत पदव्युत्तर शिक्षणासाठी मी शहराकडे निघालो. शहरी जीवन आणि समाज यांची ओळख होऊ लागली. शिक्षण घेत असताना इचलकरंजी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या शहरांचा संबंध आला. गावच्या जत्रेतली सारखी गर्दी. ग्रामीण भागात ज्या गोष्टी दिसायच्या त्या शहरात मला शोधूनपण सापडल्या नाहीत. खेडय़ातील ती हिरवीगार शेती, पक्ष्यांचा किलबिलाट, कौलांतून येणारा धूर, रस्त्यावरून जाणारी जनावरं. झाडं, शांतता असं वातावरण अनुभवलं असल्यामुळे शहराची ओढ कमीच राहिली. हे जरी खरं असलं तरी ग्रामीण भागातील समस्या चांगल्याच जवळून पाहिल्या होत्या. शुद्ध पाणी, आरोग्य आणि शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, महिलांच्या समस्या, रस्ते असून नसल्यासारखे. त्यामुळे एक ठरवलं होतं की आपल्या शिक्षणाचा उपयोग सर्वसामान्य लोकांना झाला पाहिजे, ना की मोठमोठय़ा कंपन्यांच्या मालकांना. ‘निर्माण’मुळे माझ्या विचारांना जास्त स्पष्टता येण्यास मदत झाली. 
 लहानपणापासून सारखं वाटायचं की निसर्गासाठी काहीतरी करायचं आहे; पण काय? ती संधी ‘बायफ’ या सेवाभावी संस्थेमुळे मिळाली. गडचिरोली जिल्ह्यामधील एटापल्ली तालुक्यामधून मी कृषिजैवविविधतेचा अभ्यास सुरू केला. कोल्हापूरपासून नागपूरमार्गे एटापल्ली 1200 किलोमीटर आहे. या आधी विदर्भ कसा आहे, हे फक्त पुस्तकात वाचलं होतं. आता मात्न प्रत्यक्ष त्याचे दर्शन घेताना, काम करताना एक हुरूप वाटत होता. विदर्भाच्या वातावरणात मी सूट होईल का, असाही प्रश्न पडायचा; कारण येथे उष्मा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत जास्तच असतो. पण मी लवकरच त्या वातावरणाला जुळवून घेऊ शकलो. मी आदिवासी माडिया, गौड समुदायाबरोबर काम सुरू केले. 
 यादरम्यान महत्त्वाचे काही मुद्दे शिकायला मिळाले.  आदिवासी लोकांना स्थानिक ठिकाणामधील जैविक साधनसंपत्तीबद्दल असलेले पारंपरिक ज्ञान, गावाच्या हद्दीत येणारे शेत आणि त्याबद्दलचे पारंपरिक ज्ञान, विविध प्रकारची पिके, जंगलाविषयी असलेली माहिती त्याचबरोबर विविध प्रकारच्या वनस्पतींच्या वापराबाबतची माहिती व वैदूचे ज्ञान तसेच बियाणे साठवणीच्या पूर्वपारंपरिक पद्धती व पूर्वापार चालत आलेले लोक आणि त्याचा भोवतालचा परिसर या लोकांनी सर्व गोष्टी जपून ठेवल्या आहेत आणि त्याचा आजर्पयत ते वापर करत आहेत. 
गडचिरोली हा महाराष्ट्रातील आदिवासीबहुल व अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे. एटापल्ली, सिरोंचा व भामरागडमध्ये जास्त प्रमाणात जंगल टिकून आहे. गडचिरोलीमध्ये गोंड, कोलाम, माडिया, प्रधान इत्यादी जमातीचे लोक आहेत. त्यांच्या बोलीभाषा गोंडी, माडिया या आहेत. विविध गौण वन उपज जमा करणे (बांबू व तेंदू पाने) व विक्री करून आदिवासी लोक उदरनिर्वाह करतात; पण जगण्यासाठी शेती हा मुख्य स्नेत आहे. नैसर्गिक शेती व वरच्या पाण्यावर होणारी शेती हे मी आदिवासी लोकांकडून शिकत आहे. आदिवासी लोक वापरत असलेली स्थानिक पिकं खूपच महत्त्वाची आहेत. आदिवासी लोक सामूहिक पद्धतीने शेती करतात, म्हणजे शेती करत असताना भात लागवडीपासून ते मळणीर्पयत ते प्रत्येकाच्या  शेतात जाऊन  काम करतात. काम झालं की सर्वाना जेवण दिले जाते त्याला आदिवासी लोक ‘होरा’ म्हणतात. आजही आदिवासी लोक हे आनंदाने करत असतात. आदिवासी लोक नैसर्गिक जीवन जगतात. शिकारी, शेती हेच यांचे जीवन; पण याच संस्कृतीमुळे आजही आपली जैवविविधता येथे टिकून आहे व संगोपन होत आहे याचीही प्रचिती आली.
गडचिरोलीमधील जंगल महाराष्ट्रामधील इतर भागांपेक्षा जास्त घनदाट आणि संरक्षित आहे तरीही अन्नधान्य, तेलबिया, जंगलातून मिळणारे खाण्यायोग्य अन्न, औषधी वनस्पती हे स्थानिक वाण नष्ट होत आहेतच. शेतकरी सुधारित वाणांची अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी लागवड करीतच आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना बियाणांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. तसेच रासायनिक खतांचा भडिमार आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान न मोजता येणारे आहे. त्यामुळेही जैवविविधता धोक्यात येत आहे. त्यामुळेच पारंपरिक बियाणे लागवड आणि गडचिरोलीमधील नैसर्गिक शेती याचा प्रचार-प्रसार करणं हे प्रामुख्यानं काम करत आहे. सध्या मधुमक्षिका पालन आणि  सेंद्रिय शेती याची सांगड घालून कसे काम करता येईल, याचा अभ्यास करत आहे. विशेषतर्‍ म्हणजे याच वर्षी महाराष्ट्र शासनाने ‘मध केंद्र योजना’ आणली आहे. यासाठी दहा कोटीचे बजेटही तयार केले गेले आहे. मधमाशी आणि शेती हे एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे याविषयी काम करायला पाहिजे हे सध्याच्या पर्यावरणासाठी महत्त्वाचे  आहे. 
बायफ संस्थेचं काम गडचिरोलीमधील एटापल्ली आणि भामरागडमध्ये माडिया, गौंड लोकांसोबत लोकसहभागातून जैवविविधता संवर्धन, पुनर्जीवन काम अनेक गावांत चालू झाले. स्थानिक लोकांना सहभागी करून प्रोत्साहन देऊन त्या परिसरातील उपलब्ध असलेली पारंपरिक व स्थानिक वाणाची विविधता व त्यासंबंधीचे ज्ञान व नोंदी घेण्याचे उद्दिष्ट ठेवून करण्यात आले. स्थानिक वाणाचे दस्तऐवजीकरण करणे, आदिवासी संस्कृतीमध्ये सण, उत्सवात सहभागी होऊन संस्कृती व बियाणांबद्दल जास्तीत जास्त माहिती घेण्याचे कार्य केले. स्थानिक प्र-जातीची निवड त्यांच्या काही गुणधर्मानुसार केली - जसे की दाण्याचा आकार, दाण्याचा रंग, झाडाची उंची, पीक, लोळण्याची क्षमता, किडी व रोगांना प्रतीकारकता, दुष्काळात तग धरून ठेवण्याची क्षमता, लोंबीची रचना इ. पिकांच्या वाढीची, गुणधर्माची शास्त्नीय माहिती देण्यात येते. 
यापुढेही मला माझ्या आयुष्यात गवसलेल्या दिशेने आणि त्याच ऊर्जेने मी माझे जैवविविधता व पर्यावरण संवर्धन यावर असेच काम चालू ठेवणार आहे.
                                   

                                                                                     
 

Web Title:  The story of a young man working in a tribal village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.