स्ट्रेस येतो, तो नक्की कशाचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 02:22 PM2019-10-10T14:22:19+5:302019-10-10T14:22:53+5:30
आपण नक्की काय शोधतो? कशाच्या मागे पळतो?
- रवींद्र पुरी
सोमवारची सकाळ होती. आठवडय़ाचा पहिला दिवस, त्यामुळे ऑफिसला वेळेवर पोहोचायची घाई. ऑस्ट्रेलियामध्ये वेळेला तसं फार महत्त्व. मला घरातून निघायला थोडा वेळच झाला; पण मुंबईमध्ये ज्याला ट्रेन पकडायची सवय तो जगात कुठेही ट्रेन पकडू शकतो. मी धावत पळत आलो आणि शिस्तीत ट्रेन पकडली. बाहेर तापमान 6 डिग्री सेल्सिअस होतं; पण तरीही मी घामाघूम झालेलो. एक दोन स्टेशन गेल्यानंतर वाटलं मनामध्ये थोडं चलबिचल होतंय. थंडीमध्ये धावल्यामुळे होत असेल असं वाटलं. लक्ष विचलित करण्यासाठी बॅगमधील पुस्तक काढलं आणि वाचायचा प्रयत्न केला. एक पान वाचल्यानंतर जाणवलं की आज वाचायची इच्छा नाही. पुस्तक बंद केलं आणि डोळे मिटून पडलो. कदाचित 15-20 मिनिटे झाली असतील. थोडंसं मळमळल्यासारखं वाटलं. परत डोळे मिटले. अचानक चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून डोळे उघडले. ट्रेन कुठल्यातरी स्टेशनवर थांबलेली. मला फक्त लोकांचे पाय दिसत होते आणि क्षणार्धात छातीमध्ये डाव्या बाजूला काहीतरी टोचल्यासारखे झाले. डोळे उघडले तेव्हा स्ट्रेचरवर होतो. हिरव्या कपडय़ातील पॅरामेडिक माझ्याशी बोलत होता. त्याने विचारले, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? मी आय एम गुड म्हणायचा प्रयत्न केला; पण जाणवलं की ओठ व्यवस्थित हालत नव्हते. आजूबाजूला बघितले. मी प्लॅटफॉर्मवर स्ट्रेचरवर होतो आणि बाजूला दोन पॅरामेडिकल होते. छातीला हाताला पायाला इसीजीसाठीचे लेबल लावलेले होते.
काहीतरी झाले हे जाणवत होतं. मला अॅम्बुलन्समधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. डॉक्टर आले. इसीजी बघितला. पुढचे 3-4 तास मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्यांनी काही टेस्ट केल्या. चार तासानंतर नर्सने सांगितले की सगळं व्यवस्थित आहे. घरी आलो. दिवसभर आराम केला त्रास असा काहीच नव्हता. फक्त माझे रिपोर्ट बघून डॉक्टरांनी सांगितल की, स्ट्रेस रिलेटेड अटॅक होता.
दुसर्या दिवशी पुन्हा ऑफिसला गेलो. नशीब अटॅक हार्ट अटॅक नव्हता. घरच्यांची आठवण येऊन डोळ्यात पाणी आले. ऑफिसमध्ये पोहोचल्याबरोबर माझा जवळचा मित्र लगबगीचे माझ्याकडे आला. मी त्याला काल मेसेज टाकला होता.
माझा हा मित्र मूळचा हाँगकाँगचा. दुपारी बोलणं झालं, जे झालं ते त्याला सांगितलं. तो थोडा हसला आणि म्हणाला, तुला एक गोष्ट सांगतो. ती गोष्ट अशी होती. आमच्या दोघांसारखे दोन मित्र होते. लहान होते. खोडकर. त्यांना शाळेमध्ये खोडी करावीशी वाटली. त्या रात्री त्यांनी तीन मेंढय़ा पकडल्या. त्यांच्यावर 1, 2 आणि 4 असे नंबर टाकले. त्या तीन मेंढय़ा त्यांनी त्यांच्या शाळेच्या आतमध्ये सोडल्या आणि गेट बंद केले.
दुसर्या दिवशी सकाळी नेहमीच्या वेळेनुसार शाळा उघडली. शिक्षकांना सर्वत्र मेंढय़ांच्या लेंडय़ा दिसल्या. आवाज आला. त्यांनी मेंढय़ा शोधल्या. त्यांना 1, 2 आणि 4 नंबर असलेल्या तीन मेंढय़ा मिळाल्या. त्या नंबरकडे बघून सगळ्यांनी असा निष्कर्ष काढला की शाळेमध्ये एकूण चार मेंढय़ा आहेत. त्यातील तिसरी मेंढी अजून सापडलेली नाही. ती शोधायची म्हणून त्यांनी शाळेलाच सुटी दिली.
आयुष्यातही असंच होतं. आपल्याला 1, 2 आणि 4 क्रमांकाच्या मेंढय़ा मिळाल्या हे आपण विसरून जातो. तिसरी का मिळाली नाही म्हणत तीच शोधत राहतो. बर्याचवेळी तिसरी मेंढी अस्तित्वातही नसते. पण आपण तीच शोधतो.’
मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ येईल किंवा स्ट्रेस वाढेल तेव्हा विचारा स्वतर्ला आपण कितवी मेंढी शोधतोय.