स्ट्राइप्स : फॅशनच्या नव्या रेघा आखताय ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:35 PM2018-06-28T13:35:59+5:302018-06-28T13:37:33+5:30
काळ्या-पांढर्या, निळ्या पट्टय़ापट्टय़ांचा, रेघांचा शर्ट पुरुषांनीच घालायचा हे कुणी ठरवलं?
- श्रुती साठे
काही रंग हे स्त्रियांनीच वापरावेत तर काही प्रिण्ट्स हे पुरुषांनीच वापरावेत असा कित्येक वर्षाचा पायंडा! पण आपले बॉलिवूड स्टार, सेलिब्रिटी, नामांकित डिझायनर्स वेगवेगळे प्रयोग करून आपल्या समोर आणतात. पुरुषांनी गुलाबी रंगाचा शर्ट, टी -शर्ट वापरणं आतार्पयत टाळलं जायचं, पण हल्ली खूप पुरुष सेलिब्रिटी गुलाबी रंग वापरताना दिसतात.
तीच कहाणी स्ट्राइप्सची आहे! पांढर्यावर काळे, निळे स्ट्राइप्स म्हणजे पुरुषांचा फॉर्मल शर्ट असं साधं सरळ समीकरण होतं! आता जेव्हा आपल्या आवडत्या तारका स्ट्राइप्समध्ये अतिशय कम्फर्टेबल दिसतात तेव्हा वाटतं का बरं हे प्रिण्ट आपण वापरलं नाही?
आपली मराठमोळी भूमी पेडणेकर पिन स्ट्राइप्स को-ऑर्डिनेटमध्ये अतिशय खुलून दिसली. गडद निळ्यावर पांढर्या पिन स्ट्राइप्स ही रंगसंगती सुरेखच दिसते. फॉर्मल जॅकेट आणि मिनी स्कर्ट हे सारख्याच प्रिण्टचे आणि त्याला कॉण्ट्रास्ट सॅण्डल्स ही रंगसंगती हटके होती.
मिस वल्र्ड मानुषी छिल्लर एका वेगळ्याच को-ऑर्डिनेटमध्ये दिसली. क्रि म आणि खाकीची रंगसंगती असलेले स्ट्राइप्स आणि त्यावर केलेली एम्ब्रॉयडरी केलेले को-ऑर्डिनेट. भारी होता लूक. फुल स्लिव्हज जॅकेट स्टाइल स्ट्राइप्स टॉप आणि त्याच रंगसंगतीची पॅण्ट हा तिनं केलेला एक प्रयोग म्हणावा लागेल. अर्थात सोशल मीडियावर लोकांनी तिच्या या लूकला फारशी पसंती दिली नाही.
इकडे श्रद्धा कपूरने स्ट्राइप्स एकदम साध्या पद्धतीने वापरून आपल्याला एक ‘डे लूक’साठीचा पर्याय दिला. पांढरा टॅँक टॉप आणि लाइट निळ्या आणि पांढर्या स्ट्राइप्सचा पलाझो एकदम कूल लूक देऊन गेला. पलाझोला असलेली गुडघ्यार्पयतची स्लिट आणि त्यावर वापरलेले पांढरे स्नीकर्स कॅज्युअल लूक उत्तम देतात.
एखादा स्ट्राइप्स शर्ट, पलाझो, स्कर्ट आपल्याकडे नक्कीच असायला हरकत नाही. आपल्या उंची आणि बांध्याला शोभतील असे स्ट्राइप्स निवडून घातले तर नक्की फ्रेश लूक मिळेल.