गुडमुडशिंगीतला शामळू मुलगा ते ‘भारत श्री’ उपविजेता..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 04:50 PM2019-03-05T16:50:43+5:302019-03-05T16:52:43+5:30
व्यायाम, बॉडीबिल्डिंग वगैरे गोष्टी दुर्गाप्रसादला खरं तर माहीतही नव्हत्या, पण आपल्या मेहुण्यांकडे पाहून त्याला व्यायामाची आवड लागली. छोटंसं गाव, तिथली छोटीशी व्यायामशाळा, साधारण आर्थिक परिस्थिती, पण जिद्द अफाट होती, वाट्टेल तितके कष्ट घेण्याची तयारी होती, काहीही झालं तरी हार मानण्याची तयारी नव्हती, याच गोष्टी त्याला ‘भारत श्री’च्या उपविजेतेपदापर्यंत घेऊन गेल्या. नुकताच महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती पुरस्कार’ त्याला मिळाला आहे. आता ‘अरनॉल्ड क्लासिक’ ही जागतिक दर्जाची स्पर्धा त्याला खुणावते आहे.
- सचिन भोसले
कोणाला कधी आणि कशापासून प्रेरणा मिळेल आणि त्याचे आयुष्यच बदलून जाईल, याबाबत काहीच सांगता येत नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या दुर्गाप्रसाद दासरीचेही तसेच झाले.
व्यायाम, बॉडीबिल्डिंग वगैरे गोष्टी त्याला खरं तर माहीतही नव्हत्या. पण त्याच्या बहिणीचे पति चांगले व्यायामपटू होते. ते व्यायाम करतात म्हणून दुर्गाप्रसादलाही व्यायामाची आवड लागली. आपल्या भाऊजींचा आदर्श घेऊन शाळकरी दुर्गाप्रसादने वयाच्या तेराव्या वर्षी व्यायामास सुरूवात केली. मुळात व्यायामाची आवड आणि त्यात पुढे जाण्याची इर्षा, यामुळे या क्षेत्रात लवकरच त्यानं प्रगती केली. बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात मैदान मारण्यास सुरुवात केली. या मेहनतीचं प्रतिबिंबही लगेचंच दिसलं.
‘भारत श्री’चं दोन वेळा उपविजेतेपद, तीन वेळा ‘महाराष्ट्र श्री’ आणि तीनशेहून अधिकवेळा पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शरीरसौष्ठव स्पर्धांचे विजेतेपद.. अशा एक ना अनेक किताबांचा मानकरी ठरलेला गडमुडशिंगी (ता. करवीर, कोल्हापूर) येथील दुर्गाप्रसाद दासरी याला राज्यशासनाकडून नुकतेच शिवछत्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले.
अर्थात हा प्रवास साधा, सोपा नव्हता. दिवसरात्र, त्यासाठी त्याला घाम गाळावा लागला. परिस्थितीशी झगडावं लागलं. व्यायामासाठी कुठलीही सबब न सांगता, त्यासाठीचा वेळ काढावा लागला. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांचा भांडी उत्पादनाचा व्यवसाय आहे, त्यातून वेळ काढून तो दररोज सहा तासांचा सराव करतो.
आपल्या व्यायामाच्या वेडाचं श्रेय दुर्गाप्रसाद आपल्या बहिणीचे पति फनिचंद्र माऊली यांना देतो. दुर्गाप्रसाद सांगतो, आरोग्य सुदृढ राखण्यासाठी ते दररोज व्यायाम करायचे. ते माझ्या मनावर कोरलं गेलं आणि आपोआप मलाही व्यायामाची आवड लागली.
बहीण आणि मेहुणे दुर्गाप्रसादच्या घरी राहण्यासाठी आल्यानंतर तर व्यायामाची त्याची आवड अधिकच वृद्धिंगत झाली. व्यायामात कधीही खंड पडू न देता मेहुणे व्यायाम कायचे. त्यावेळी १४ वर्षाच्या असणाऱ्या दुर्गाप्रसादच्या मनावर हीच बाब कोरली गेली. ते व्यायाम करतात, तर मी का नाही करायचा असा त्यानं मनाशी चंग बांधला आणि व्यायामास सुरूवात केली.
प्रथम गडमुडशिंगी या आपल्या छोट्याशा गावातील जीममध्ये त्यानं व्यायामास सुरूवात केली. रोजच्या मेहनतीमुळे शरीर लवकरच पिळदार झाले. तेथील प्रशिक्षक व मित्र मंडळींनीही तुझे शरीर एखाद्या कसलेल्या शरीरसौष्ठवपटूला साजेसे आहे, या क्षेत्रात आणखी प्रगती करायची असेल, तर शहरातील ज्येष्ठ प्रशिक्षक बिभीषण पाटील यांच्या व्यायामशाळेत तू प्रवेश घे असा सल्ला त्याला दिला. त्यांचा सल्ला मानून दुर्गाप्रसादनं बिभीषण पाटील यांच्या व्यायामशाळेत प्रवेश घेतला.
पहिल्याच दिवशी भारत श्री उपविजेता विजय मोरे यांना तिथे सराव करताना त्यानं पाहिलं. त्यांचं पिळदार, आकर्षक शरीर पाहून त्यानं मोरे यांना विचारलं, सर, मला तुमच्यासारखं शरीर बनवायचं आहे. त्यासाठी मला काय करावं लागेल?
नवख्या दुर्गाला त्यांनी सांगितलं, खंड न पाडता, नियमित सराव, ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्याची पहिली गुरूकिल्ली आहे. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे योग्य, शास्त्रीय पद्धतीनं सराव. या दोन गोष्टींकडे तू लक्ष दिलंस, तर तुझी बॉडीही माझ्यासारखी होईल.
त्यांचा हा सल्ला शिरोधार्य मानून २००२ साली दुर्गाप्रसादनं व्यायामास सुरूवात केली. यानंतर त्यानं मागे वळून पाहिलंच नाही. कठोर मेहनत घेतली. यशाचे अनेक टप्पे तो पार करत गेला आणि २००८ पासून खऱ्या अर्थानं तो व्यावसायिक शरीरसौष्ठवपटू म्हणून कार्यरत झाला.
दुर्गाप्रसादनं २००९ ला ‘ज्युनिअर महाराष्ट्र श्री,’ तर २०११ ते २०१३ दरम्यान सीनिअर महाराष्ट्र श्री’चा किताब पटकावला. २०१६, २०१७ च्या ‘भारत श्री’ स्पर्धेत सलग दोन वर्षे कांस्यपदकाची कमाई केली; तर २०१८ मध्ये मुंबईत झालेल्या आंतरराष्ट्रीय डायमंड स्पर्धेत कांस्यपदक पटकावले.
या कामगिरीची दखल घेत राज्य शासनानं त्याला शिवछत्रपती पुरस्कार जाहीर केला.
या प्रवासात भारतश्री उपविजेते विजय मोरे, डॉ. संजय मोरे, बिभीषण पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन त्याला लाभलं. याशिवाय आपले मेहुणे आणि घरच्यांचाही अतिशय कृतज्ञतेनं तो उल्लेख करतो. त्यांच्याशिवाय हे यश मिळणं शक्य नव्हतं, असं म्हणत कृतज्ञतेचा नमस्कारही त्यांच्याप्रति अर्पण करतो..
‘अरनॉल्ड क्लासिक’ ही जागतिक दर्जाची स्पर्धा दुर्गाप्रसादला खुणावते आहे. तो म्हणतो, कोणत्याही शरीरसौष्ठवपटूच्या जीवनातील महत्वाचा टप्पा असणारी ही जागतिक स्पर्धा जिंकणं हे माझं स्वप्न आहे. यासाठी भारतातर्फे माझी निवडही झाली आहे. कोणत्याही खेळात प्रामाणिक असणं आणि त्या खेळावरचं प्रेम महत्त्वाचं असतं. या दोन गोष्टी असल्या की यश आपोआप मिळतं. बॉडीबिल्डिंगच्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांसाठी माझाही तोच सल्ला आहे.
जसा व्यायाम, तसा आहार!
दुर्गाप्रसाद दररोज सकाळी तीन आणि सायंकाळी तीन असा सहा तास व्यायामाचा सराव करतो. जसा व्यायाम, त्याप्रमाणे आहारही त्याला लागतो. रोज दिड किलो मासांहार, अर्धा किलो मासे, २५ अंडी, एक लीटर ज्यूस आणि ग्रीन सॅलड असा आहार त्याला लागतो..
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
sachinbhosale912@gmail.com
क्रमश:
श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा आणखी मजकूर वाचा याच ठिकाणी..
http://www.lokmat.com/oxygen/ वर..