जिद्दी स्वरूपचं अचूक लक्ष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:42 PM2019-03-01T17:42:48+5:302019-03-02T16:20:37+5:30

कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर. जन्मत:च दिव्यांग. परिस्थितीनंही कायमच मार्गात अडथळे उभे केले. आईवडिलांनी मोलमजुरी करून त्याला वाढवले, कालांतराने वडिलांचे छत्रही हरपले, पण स्वरुप डगमगला नाही. सगळ्या अडथळ्यांवर मात करीत लक्ष्याचा अचूक वेध तो घेत राहिला. राष्ट्रीय, आंतरष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धांत आपला दबदबा निर्माण केला. त्याचं फळ त्याला मिळालं. महाराष्ट्र शासनानं शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारानं नुकतंच त्याला गौरवलंय!..

Struggle of disabled shooter gave him shri Shiv Chhatrapati award | जिद्दी स्वरूपचं अचूक लक्ष्य!

जिद्दी स्वरूपचं अचूक लक्ष्य!

Next
ठळक मुद्देमाझ्या दिव्यांगपणाचा मी कधीच बाऊ केला नाही. आहे त्या परिस्थितीत झगडायचं, संघर्ष करायचा, मेहनत घ्यायची हेच मी केलं, करतोय, त्याचं फळ मला मिळालं..

- सचिन भोसले
लहानपणापासूनच स्वरूप दिव्यांग. जन्मत:च पोलिओसारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या ‘स्वरूप’चे पुढे काय होणार, याची चिंता त्यामुळेच त्याच्या आईवडिलांना होती.
त्यात तीन वर्षांपूर्वी स्वरूपचे वडिलांचे छत्र हरपले. आई सविता यांनी मोठ्या हिमतीने उदरनिर्वाह चालविला. स्वरूपनेही आपली जिद्द सोडली नाही. आहे त्या परिस्थितीशी जिनिडरपणे सामना करायचा आणि पुढे जायचं असं त्यानं ठरवलं.


शालेय शिक्षणानंतर घड्याळदुरुस्तीच्या अभ्यासक्रमासाठी त्यानं प्रवेश घेतला. हीच त्याच्यासाठी मोठी कलाटणी ठरली. तेथे भेटलेल्या अन्य दिव्यांगांच्या साथीने तो आघाडीचा नेमबाज बनला. वेगवेगळ्या स्पर्धा त्यानं गाजवलं आणि नेमबाजीत आपल्या नावाचा दबदबा तयार केला. याच नेमबाजीच्या जोरावर राज्य शासनाने त्याला ‘शिवछत्रपती ’ पुरस्काराने गौरविले.
उन्हाळकर कुटुंबीय मूळचे कोकणातील. नोकरी-व्यवसायाच्या शोधात त्यांचे संपूर्ण कुटुंब कोल्हापूरमध्ये दाखल झाले. आर. के. नगर येथील खडीच्या गणपती मंदिरामागे ते राहू लागले. स्वरूप त्यावेळी अवघ्या दोन वर्षांचा होता. त्याचे वडील शहरातील एका तेलाच्या दुकानात काम करू लागले; तर आई आर. के. नगरातील खडीचा गणपती मंदिराच्या बाहेर कापूर-साखर विकून संसाराला हातभार लावू लागली.
अत्यंत विपरित अशा परिस्थितीत, एकाच वेळी संसाराचा गाडा हाकायचा आणि दिव्यांग स्वरूपची काळजी घेणं; या दोन्ही गोष्टी खूपच कठीण होत्या, शरीर-मनाची परीक्षा पाहणाऱ्या होत्या; तरीही या कुटुंबानं जिद्द सोडली नाही आणि आयुष्याची लढाई मोठ्या हिंमतीनं लढली. आई सविता यांची तर मोठीच कसरत झाली. घरकाम शिवाय कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असताना, स्वरुपच्या शिक्षणाकडेही त्यांनी लक्ष दिलं. स्वरूपला चालता येत नसल्यानं त्याला उचलून घेत शाळेतून ने-आण करावी लागायची. त्याचा धाकटा भाऊ ओंकारही यात मागे नव्हता. तोदेखील त्याला पाठीवरून घेऊन जात असे.
अशा परिस्थितीत आर. के. नगर येथील देशभक्त रत्नापाणा कुंभार येथील शाळेतून स्वरूपने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले; तर इयत्ता अकरावी-बारावीचे शिक्षण त्याने कॉमर्स कॉलेजमधून घेतले.
बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणासाठी आईने त्याला सायबर येथील एक कौशल्य अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन दिला. विविध अभ्यासक्रमांपैकी त्याने घड्याळदुरुस्तीच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. तेथे त्याला इतर दिव्यांगांची ओळख झाली. त्या ओळखीमुळे तो नेमबाजी या खेळाकडे वळला.
प्रथम दुधाळी येथील शूटिंग रेंजवर प्रशिक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने नेमबाजीचे धडे गिरवले. यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. दरम्यान त्याचे वडिलांचे छत्र हरपले. परिस्थिती आणखीच बिकट झाली. तरीही स्वरूप आण या कुटुंबानं परिस्थितीशी आपला संघर्ष सुरूच ठेवला.
सध्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहकायार्मुळे तो पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाज गगन नारंगच्या मार्गदर्शनाखाली नेमबाजीचा सराव करतोय..
स्वरूप सांगतो, माझ्या दिव्यांगपणाचा मी कधीच बाऊ केला नाही. आहे त्या परिस्थितीत झगडायचं, संघर्ष करायचा, मेहनत घ्यायची हेच मी केलं, करतोय, त्याचं फळ मला मिळालं..

वडिलांची उणीव
स्वरूपचे वडील महावीर उन्हाळकर एका दुकानात काम करायचे. स्वरूपच्या आईच्या दुकानासाठी नारळ किंवा अन्य साहित्याचे कितीही ओझे असले तरी ते सायकलवरूनच आणत. संसारासाठी आणि मुलाच्या शिक्षणासाठी, त्याच्या करिअरसाठी त्यांनी अतोनात मेहनत घेतली. नेमबाजी स्पर्धेसाठी स्वरूपची अमेरिकेला निवड झाली, हे ऐकताच त्यावेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले होते. आपल्या आणि त्याच्या कष्टांचं चिज झालं असं वाटून त्यांचे डोळे भरून आले होते. आज तो जगभरातील विविध देशांत जाऊन पदकांची कमाई करीत आहे; पण त्याचे आजचे यश पाहण्यासाठी त्याचे वडील आता हयात नाहीत, अशी खंत स्वरूपची आई सविता उन्हाळकर यांनी व्यक्त केली.

मला इथेच थांबायचं नाही!
मला नियमित आॅलंम्पिकमध्ये सहभागी होवून देशासाठी पदक जिंकायचे आहे. माझे यश पाहण्यासाठी वडील हयात नाहीत. त्यांनी व आई, भाऊ ओंकार याने घेतलेल्या कष्टाचे चीज झाले, पण मला इथेच थांबायचे नाही, मला अजून बरंच काही करून दाखवायचं आहे. माझ्या दिवंगत वडिलांना तीच माझी श्रद्धांजली असेल, असं स्वरूप सांगतो.

(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)
sachinbhosale912@gmail.com

क्रमश:
श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा आणखी मजकूर वाचा याच ठिकाणी..
http://www.lokmat.com/oxygen/ वर..

Web Title: Struggle of disabled shooter gave him shri Shiv Chhatrapati award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.